राजस्थान ही शौर्यभूमी म्हणून ओळखली जाते. तशीच ती भगवान शंकराची नगरी म्हणूनही ओळखली जाते. याच राजस्थानमध्ये महाराणा प्रताप यांचे पूर्वज महाराणा कुंभा यांनी बांधलेले शिवमंदिर प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध अशा कुंभलगड किल्ल्यावर असलेले भगवान महादेवाचे नीलकंठ मंदिर आता या अधिक महिन्यात आणि श्रावण महिन्यात भक्तांनी गजबजलेले राहणार आहे. जवळपास 600 वर्ष जुन्या असलेल्या या भगवान नीलकंठ महादेवाचे शिवलिंग प्रत्यक्ष महाराणा कुंभा यांनी मौल्यवान काळ्या टचस्टोनने बनवल्याची आख्यायिका आहे. महाराणा कुंभा हे अतिशय पराक्रमी योद्धे होते. भगवान शिवाचे ते परमभक्त होते. त्यांनी पुजलेल्या या भगवान नीलकंठावर अभिषेक करण्याची संधी शिवभक्तांना ठराविक काळात मिळते. ही संधी अधिक महिना आणि श्रावण महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे या सर्व सोमवारी येथे भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी होत आहे. (Neelkanth Mahadev Temple)

श्रावण महिन्यातले सोमवार हे शिवभक्तांसाठी खास असतात. भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आणि शिवपिंडीला अभिषेक घालण्यासाठी भक्तांची शिवमंदिरात गर्दी होते. अशीच गर्दी सध्या राजस्थानमधील कुंभलगड किल्ल्यात देशभरातून आलेल्या शिवभक्तांची होत आहे. राजस्थानमधील कुंभलगड किल्ला हा महाराणा प्रताप यांच्या पूर्वजांनी बांधलेला आहे. महाराणा प्रताप यांचे पूर्वज महाराणा कुंभा हे महाप्रतापी होते. त्यांच्या युद्धकथा आजही राजस्थानमधील घराघरात सांगितल्या जातात. या महाप्रतापी महाराणा कुंभा यांची ओळख ही एक शिवभक्त म्हणूनही होती. महाराणा कुंभा यांनी भगवान शंकराची रोज पूजा करता यावी म्हणून कुंभलगड किल्ल्यात भव्य शिवमंदिर बांधले होते. या शिवमंदिरातील भव्य शिवलिंग आजही शिवभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. शिवभक्त महाराणा कुंभ हे श्रावण महिन्याच्या सोमवारी या मंदिरात शिवलिंगासमोर तांडव नृत्य करत असल्याच्या आख्यायिका या भागात सांगितल्या जातात. त्यामुळे कुंभलगडावर देशभरातील शिवभक्त गर्दी करीत आहेत. (Neelkanth Mahadev Temple)
सुमारे 600 वर्षांपूर्वी, 1468 मध्ये, कुंभलगड किल्ल्यावर महाराणा कुंभा यांनी नीलकंठ महादेव मंदिर बांधले. हे मंदिर सुरुवातीपासून तेथील शिवलिंगासाठी प्रसिद्ध झाले. हे मोठे शिवलिंग कसौटी दगडापासून बनवले गेले आहे. हा एक मौल्यवान दगड आहे. म्हणूनच नीळकंठ महादेव मंदिर हे इतर शिवमंदिरांपेक्षा खूप खास आणि वेगळे आहे. शिवलिंगाचा आकार प्रचंड आहे. हे शिवलिंग 4 फूट लांब आणि 2 फूट गोलाकार आहे. महाराणा कुंभा यांनी आपल्या देखभाली खाली या संपूर्ण मंदिराची उभारणी केल्याची माहिती आहे. तसेच शिवलिंग स्वतः महाराणा कुंभा यांनी तयार केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर प्राचीन स्तंभ आणि शिखर शैलीमध्ये एका कमानीवर बांधलेले आहे. मंदिरासाठी वापरण्यात आलेल्या दगडावर सुंदर कोरीवकाम केले आहे. नीळकंठ महादेव मंदिराबाहेर शिवलींगासारखीच भव्य अशी नंदी महाराजांची मुर्ती आहे. महाराणा कुंभा यांनी स्वतः या मंदिरातील मुर्तींची निर्मिती केल्यामुळे त्या भव्य आहेत. स्वतः महाराणा कुंभा हे सात फूट उंच होते. ते जेव्हा या नीलकंठ महादेवाची पूजा करायचे तेव्हा शिवलिंगासमोर कुठलेही आसन न घेता बसत असत. त्यामुळे महाराणा कुंभा यांचे डोळे नेहमी शिवलिंगाला समांतर असल्याची माहिती आताही या मंदिरातील पुजारी देतात. महाराणा कुंभा यांनी स्थापिलेल्या या शिवपींडीला तेव्हापासून नित्यनेमानं अभिषेक होत आहे. गेली 600 वर्ष या पिंडीवर अभिषेक होत असून श्रावण महिन्यात तर भक्तांची मोठी गर्दी या किल्ल्यावर होते. (Neelkanth Mahadev Temple)
=========
हे देखील वाचा : पाण्यात होणार व्यक्तींचे अंत्यसंस्कार
=========
या मंदिराला 600 वर्ष झाली तरी मंदिराचे बांधकाम भक्कम आहे. मंदिराच्या इमारतीत एकूण 36 कलात्मक खांब बांधण्यात आले आहेत. या मंदिराच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी वास्तशास्त्र अभ्यासकही येथे येतात. नीलकंठ मंदिराच्या वरच्या भागात 6 शिखरे आहेत. ज्यामध्ये गर्भगृहाच्या वरचे शिखर सर्वात मोठे आहे. गर्भगृहाच्या छताच्या आतील भागात कमळाची रचना आहे. मंदिराची उंची जमिनीपासून सुमारे 41 फूट आहे. मंदिराच्या पश्चिम दरवाजावर शिलालेख आहे. कुंभलगड किल्ल्याचा दरवाजा ओलांडल्यावर आतमध्ये गणेशाची मूर्ती आहे. 1443 मध्ये महाराणा कुंभा यांनी मंडोर जिंकले. तेथून गणेशमूर्ती त्याची प्रतिष्ठापना किल्यावर करण्यात आली. नीलकंठ महादेवाचे दर्शन करण्यासाठी आलेले भक्त आधी या दक्षिणाभिमुख गणेशाचे दर्शन घेतात. नीलकंठ महादेवाच्या मंदिराबरोबरच (Neelkanth Mahadev Temple) कुंभलगड किल्ल्यात 360 मंदिरे आहेत. त्यातील 300 मंदिरे जैन समाजाची आहेत. याशिवाय येथे अन्य 60 मंदिरे बांधली आहेत. सध्या अनेक मंदिरांचे अवशेष येथे आहेत, ते पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. कुंभलगड किल्ल्याची संरक्षण भिंतही वास्तुशास्त्राचा अजोड नमुना मानला जाते. ही भिंत सुमारे 34 किलोमीटर लांब आहे. देशातील पहिली आणि आशियातील दुसरी सर्वात लांब भिंत म्हणून त्याचा गौरव करण्यात येतो. आता संपूर्ण श्रावण महिना हा कुंभलगड किल्ला शिवभक्तानी गजबजलेला राहणार आहे.
सई बने