Home » निक्की हेलींचा पाकिस्तानला इशारा…

निक्की हेलींचा पाकिस्तानला इशारा…

by Team Gajawaja
0 comment
Nikki Haley
Share

2024 मध्ये अमेरिकेत होणा-या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी जाहीर केलेल्या निक्की हेली (Nikki Haley) यांनी पाकिस्तानला जाहीर धमकी दिली आहे.  मुळ भारतीय वंशाच्या निक्की हेली यांचा अमेरिकेत राजकीय वर्तुळात दबदबा आहे.  आता भावी अध्यक्षीय निवडणुकीत त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यातच निक्की यांनी अमेरिका हे काही एटीएम नसून दहशतवादी संघटनांचे घर असलेल्या पाकिस्तानला आता पैसे देणे थांबवले पाहिजे, अशी आपली भूमिका जाहीर केली आहे.  निक्की यांच्या या भूमिकेवर अनेक प्रतिक्रीया येत आहेत. अर्थात पाकिस्तानला निक्की (Nikki Haley) यांच्या या भूमिकेमुळे धडकी भरली आहे, कारण पाकिस्तानला गेल्या काही वर्षात सर्वाधिक मदत अमेरिकेनेच केल्याचे निक्की यांनी दाखवून दिले आहे.  मात्र पाकिस्तान दहशतवाद्यांना कायम आश्रय देत असून या देशावर आपल्या देशातील नागरिकांचा पैसा आता त्या खर्ची घालणार नाही, ही भूमिका निक्की यांनी घेतली आहे.  

युनायटेड नेशन्समध्ये अमेरिकेच्या राजदूत आणि दक्षिण कॅरोलिना जिल्ह्यातील दोन वेळा गव्हर्नर राहिलेल्या 51 वर्षीय हॅली यांनी 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.  तेव्हापासून निक्की यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकांची चर्चा होत आहे. ज्या देशांना अमेरिका मदत करते, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे जाणणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.  अमेरिका हे जगभरातील देशांचे एटीएम होणार नाही,  असे सांगून निक्की यांनी  राष्ट्रपती या नात्याने आम्ही आमचे परराष्ट्र धोरण योग्य राहील याची काळजी घेऊ आणि ज्या देशात दहशतवाद आहे, तिथे आमच्या देशातील नागरिकांच्या करांचे पैसे जाणार नाहीत याची काळजी घेऊ असे सांगितले आहे.  रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हेली यांनी पाकिस्तानवर तिखट शब्दात हल्ले  केले आहेत. पाकिस्तानमध्ये किमान डझनभर दहशतवादी संघटनांचे घर असून अमेरिकेकडून यापुढे पाकिस्तानला अजिबात आर्थिक मदत मिळू नये, असे मतही त्यांनी मांडले आहे.  येवढे करुनच निक्की (Nikki Haley) थांबल्या नाहीत तर त्यांनी CutEveryCent हा हॅशटॅग चालवला आहे.  

याआधीही निक्की (Nikki Haley) यांनी पाकिस्तानला देण्यात येणा-या आर्थिक सहाय्यावर टिका केली होती. अमेरिकेने गेल्या वर्षी 46 अब्ज डॉलरची विदेशी मदत खर्च केली.  ही मदत चीन, पाकिस्तान आणि इराकसारख्या देशांमध्ये गेली. आपला पैसा कुठे जात आहे हे जाणून घेण्याचा अमेरिकन करदात्यांना अधिकार आहे, असे निक्की यांनी स्पष्ट केले आहे. निक्की (Nikki Haley) यांच्या म्हणण्यानुसार, बायडेन प्रशासनाने पाकिस्तानला लष्करी मदत केली आहे. ज्या देशात दहशतवादी रहातात आणि चीनसारखा देश ज्याचा मित्र आहे, त्यांना मदतीची गरजच काय हा प्रश्न त्यावर निक्की यांनी विचारला आहे. निक्की यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचेही जोरदार समर्थन केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सुमारे 2 अब्ज डॉलरची लष्करी मदत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता आम्ही पुन्हा त्याच देशास मदत करीत आहोत, यापुढे मी अध्यक्ष झाल्यास हा पैसा नक्की रोखून धरेन असे आश्वासनही निक्की यांनी दिले आहे.   

फक्त पाकिस्तानलाच निक्की (Nikki Haley) यांनी तंबी दिली असे नाही तर त्यांनी चीनवरही प्रखर शब्दात हल्ला चढवला आहे. निक्की हेली यांनी कोरोनासाठी चीनला जबाबदार धरले आहे. जगानं चिनला मदत करण्याचे थांबवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 2024 मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय वंशाच्या अमेरिकन निक्की हेली,  आपल्या या धडाकेबाज भुमिकांमुळे चर्चेत आल्या आहेत. निक्की हेली यांचे पूर्ण नाव निम्रत निक्की रंधावा आहे.  त्यांचा जन्म 20 जानेवारी 1972 रोजी दक्षिण कॅरोलिना येथे झाला. त्याचे पालक भारताच्या पंजाब राज्यातून अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यांचे वडील अजित सिंग रंधवा आणि आई राज कौर रंधावा हे मुळे अमृतसरचे.  निक्कीचे वडील प्रथम कॅनडाला गेले आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झाले.  दक्षिण कॅरोलिना येथील वुरहीस महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.  निक्कीची (Nikki Haley) आई राज रंधवा या  पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका होत्या.  तर निक्की यांच्या भावाने अमेरिकन आर्मीमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केले असून इराक युद्धातही काम केले आहे. 2004 मध्ये  निक्की यांनी दक्षिण कॅरोलिनासाठी निवडणूक लढवली.  त्यात त्यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सर्वात जास्त काळ सदस्य असलेल्या लॅरी कून यांचा पराभव केला. आजही निक्की यांनी मालमत्ता करात सवलत आणि शैक्षणिक सुधारणांसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला जातो.  2006 मध्ये आणि पुन्हा 2008 मध्ये दक्षिण कॅरोलिनाची महापौर होणा-या निक्की या पहिल्या भारतीय-अमेरिकन होत्या.  

========

हे देखील वाचा : पुतिन यांच्या प्रियसीचा भव्य महल आला जगासमोर…

========

निक्की (Nikki Haley) यांचे पुस्तकही खूप गाजले आहे. ‘विथ ड्यू रिस्पेक्ट: डिफेंडिंग अमेरिकन विथ ग्रिट अँड ग्रेस’ या पुस्तकातही त्यांनी पाकिस्तानला देण्यात येणा-या आर्थिक मदतीवर आक्षेप घेतला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये, निक्की यांनी भारतीय-अमेरिकन समुदायाला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे मित्र असल्याचा उल्लेख केला.  भारत आणि अमेरिका मिळून जागतिक शक्ती असल्याचा उल्लेख केला होता. सध्या पाकिस्तान अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत आहे.  पाकिस्तानी नेते देशाला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी अमेरिकन डॉलर्स जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात निक्की हेली यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे अवघ्या पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढणार हे नक्की. 

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.