Home » शांततेचे नोबेल मिळवणारी निहोन हिडांक्यो

शांततेचे नोबेल मिळवणारी निहोन हिडांक्यो

by Team Gajawaja
0 comment
Nihon Hidankyo
Share

शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून जपानच्या निहोल हिडांक्यो या समाजसेवी संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे. दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर अमेरिकेने केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात बळी पडलेल्यांची ही संघटना आहे. निहोन हिडांक्यो जगभर अणुबॉम्ब हल्ल्याच्या परिणामाची माहिती करुन देते. अण्वस्त्रांविरुद्ध मोहीमही चालवली जाते. याच कार्याबद्दल संस्थेला 2024 चा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. जगाला विनाशकारी शस्त्रांपासून मुक्त करण्यासाठी निहोन हिडांक्योचे मोठे योगदान आहे. यावर्षीच्या नोबेल पुरस्कारासाठी जगभरातून 286 नामांकने आली होती. त्यातून रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल समितीने निहोन हिडांक्योची निवड केली आहे. (Nihon Hidankyo)

जपानी संस्था निहोन हिडांक्यो यांना 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्यावर ही संस्था नेमके काय काम करते, याची चौकशी सुरु झाली. दुस-या महायुद्धानंतर सुरु झालेल्या निहोन हिडांक्योचे सध्याच्या काळातले कार्य खूप महत्वाचे आहे. जग आता तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अशावेळी अण्वस्त्रांचा वापर हा मानवासाठी किती संहारक आहे, याबाबत जागृती करण्याचे काम निहोन हिडांक्यो करीत आहे. निहोन हिडांक्यो ही जपानी संघटना हिरोशिमा आणि नागासाकी येथील अणुबॉम्ब बळींची आणि त्यात होरपळलेल्या लाखो जपानी नागरिकांची ताकद समजली जाते. या संस्थेला जपानी स्थानिक भाषेत हिबाकुशा’ म्हणूनही ओळखले जाते. या संस्थेच्या कार्याची दखल घेत शांततेचे नोबेल मिळाल्यामुळे जपानी नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत. तर नॉर्वेजियन नोबेल समितीने सांगितले की, हिबाकुशांना अणुमुक्त जग निर्माण करायचे आहे. आता जगभरात सुरु असलेल्या युद्धाच्या वातावरणात हिबाकुशाचे कार्य अधिक प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. तसेच या कार्यात अनेकांचा सहभागही आवश्यक आहे. (International News)

त्या सर्वांना या पुरस्कारानं अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचेही नोबेल समितीतर्फे सांगण्यात आले आहे. हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबॉम्बमधून वाचलेल्यांनी बनवलेल्या या तळागळातील चळवळीला हिबाकुशा म्हणूनही ओळखले जाते, ही चळवळ काळाजी गरज असल्याचे नोबेल समितीने जाहीर केले. अण्वस्त्रमुक्त जगाची स्थापना करण्याच्या समर्पणाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत आहे. 1956 मध्ये, स्थानिक हिबाकुशा युनियन पॅसिफिकमध्ये अण्वस्त्र चाचण्यांना बळी पडलेल्या नागरिकांना सोबत घेऊन ही संघटना स्थापन करण्यात आली. (Nihon Hidankyo)

जपान A- आणि H-बॉम्ब बळी संघटना असे त्याचे नाव होते. नंतर जपानी भाषेत निहोन हिडांक्यो असे नाव दिले गेले. या संस्थेचे सदस्य त्यांच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करतात आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित शैक्षणिक मोहिमा विकसित करतात. याद्वारे अण्वस्त्रांच्या विरोधात काम करण्यासाठी आराखडे तयार करतात आणि काम करतात. जपानमध्ये 6 ऑगस्ट 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात अमेरिकेने हिरोशिमा शहरावर ‘लिटल बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अणुबॉम्ब टाकला. सकाळी 8.15 वाजता बॉम्बचा स्फोट झाला, ज्याने 15,000 टन टीएनटीच्या बरोबरीची शक्ती सोडली. यामुळे भयंकर नाश झाला, इमारती जमीनदोस्त झाल्या आणि संपूर्ण शहरात मोठी आग लागली. हिरोशिमानंतर अवघ्या तीन दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने ‘फॅट मॅन’ हा दुसरा अणुबॉम्ब रात्री 11.02 वाजता नागासाकी शहरावर टाकला. या हल्ल्यामुळे बराच विध्वंस झाला आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय, त्याच्या किरणोत्सर्गाच्या दीर्घकालीन परिणाम अनेकांना भोगावे लागले. जपानमधील एक पिढी या अणुबॉम्बच्या हल्ल्यात नष्ट झाली. (International News)

======

हे देखील वाचा :  अणुहल्ल्याच्या धमकीसह किम जोंगची युद्धात एन्ट्री !

======

तर पुढच्या अनेक पिढ्यांवर या अणुहल्ल्याचे परिणाम दिसून आले. या सर्वांसाठी निहोन हिडांक्यो ही संस्था मदतीचा हात घेऊन उभी असते. या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली होती. हजारो लहान मुले अनाथ झाली. इमारती नष्ट झाल्यानं निवा-याचा प्रश्न उभा राहिला होता. या सर्वांचे जपानच्या भविष्यावर मोठे परिणाम झाले. या अणुहल्ल्यातून जे वाचले होते त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. या सर्वातून सावरण्यासाठी आणि नवीन उभारी देण्यासाठी निहोन हिडांक्यो या संस्थेनं मोठं काम केले आहे. 1901 ते 2023 दरम्यान, 111 व्यक्ती आणि 30 संस्थांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीला तीन वेळा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्त कार्यालयाला दोनवेळा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे. (Nihon Hidankyo)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.