अमेरिकेने ज्या पद्धतीनं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना आपल्या ताब्यात घेतले, त्याच्या आता अनेक सुरस कथा सांगण्यात येत आहेत. अवघ्या ३० ते ४० मिनिटात अमेरिकेच्या लष्करी जवानांनी थेट अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला आपल्या ताब्यात घेत, विमानांच्या सहाय्यानं अमेरिकेत आणलं. यासाठी १५० विमानांचा ताफा वापरण्यात आला. दुस-या महायुद्धानंतर अशाप्रकारची ही पहिल्यांदाच धाडसी मोहीम पार पडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये सामील झालेल्या सर्व लष्करी जवानांचे कौतुक करत व्हेनेझुएलावर आपली सत्ता असल्याचे जाहीर केले. मात्र हे सर्व सहज शक्य झाले का, तर अजिबात नाही. कारण या मोहीमेसाठी अमेरिकेच्या गुप्तचर संघटना गेले काही महिने व्हेनेझुएलाच्या प्रत्येक महत्त्वाच्या शहरामध्ये लक्ष ठेऊन होत्या. ( Nicolas Maduro )

Nicolas Maduro
खुद्द अध्यक्ष मादुरो यांच्या निवासस्थानात मोठ्या प्रमाणात सीआयएचे एजंट दाखल झाले होते. मादुरो यांच्या सोबत ३०० जवान कायम असत, पण मादुरो यांना जेवढ्या झटपट अटक झाली, ते पाहता या ३०० जवानांमधील अनेक जवान अमेरिकेला सामील झाले असल्याचे आता उघड होत आहे. याशिवाय व्हेनेझुएलामधील काही नेत्यांनीही अमेरिकेला या कारवाईसाठी मदत केल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. खुद्द व्हेनेझुएलाच्या उपाध्यक्षा आणि मादुरो यांच्या अटकेनंतर अध्यक्षा झालेल्या डेल्सा यांचेही नाव, यामध्ये आल्यानं खळबळ उडाली आहे. एकूण अमेरिकेच्या कारवाईचे हे टायमिंग पाहता, यामागे मादुरो यांच्या विश्वासू माणसांनी पुरवेली माहितीच असल्याचे उघड झाले आहे. ( Nicolas Maduro )
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ज्या पद्धतीनं आणि वेगानं ताब्यात घेतलं, त्याच्या अनेक कथा सांगितल्या जात आहेत. त्यानुसार रात्री २ वाजता व्हेनेझुएलाच्या चार शहरांवर एकाच वेळी हल्ले करण्यात आले. हा हल्ला झाला तेव्हा राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो लष्करी तळावर झोपले होते. लष्करी जवानांनी मादुरो आणि त्यांच्या पत्नीला बेडरूममधून बाहेर काढले आणि ताब्यात घेतले.
यावेळी मादुरो यांनी सेफरुममध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या सेफरुमच्या संदर्भातील सर्व माहिती लष्करी जवानांना असल्यामुळे त्यांनी हा सेफरुमही उघडल्याची माहिती आहे. मादुरो यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात आली, आणि त्यांना आणि त्यांच्या पत्नीला घेऊन हेलिकॉप्टरनं उड्डान घेतले. ही सर्व कारवाई अत्यंत शिस्तबद्ध आणि आखून दिलेल्या योजनेनुसारच झाली. ( Nicolas Maduro )
=======
हे देखील वाचा : America Vs Venezuela : अखेर व्हेनेझुएलावर अमेरिकेचा हल्ला
=======
त्यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीची एक गुप्त टीम व्हेनेझुएलामध्ये दाखल झाली होती. या टीममध्ये अनेक अनुभवी एजंट होते. हे एजंट काही दिवसातच मादुरो यांच्या आसपास पोहचले आणि त्यांनी मादुरोंच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. अगदी मादुरो सकाळी किती वाजता उठतात, ते रात्री किती वाजता झोपतात, अशी सगळी माहिती गोळा करण्यात आली. यासाठी काही एजंट महिनोनमहिने कराकसच्या रस्त्यांवर लपून राहिले. या सर्वांना फक्त मादुरो यांचीच माहिती काढली नाही तर त्यांच्या पाळीव प्राण्यांचीही माहिती गोळा केली. ( Nicolas Maduro )
मादुरो यांची दिनचर्या काय आहे. ते सकाळी किती वेळ व्यायाम करतात, त्यानंतर ते कुठल्या प्रकारचा आहार घेतात, त्यावेळी त्यांच्यासोबत कोण असतं. ते कोणाला भेटतात, त्यांच्या सवयी काय आहेत. फारकाय मादुरो यांच्या पाळीव प्राण्यांच्या सवयीही या गुप्तहेरांनी टिपल्या होत्या. मादुरो यांच्याबाबत तर या गुप्तहेरांकडे एवढी बारीक सारीक माहिती होती की, मादुरोच्या वर्तुळातील एका जवळच्या व्यक्तीने यासाठी अमेरिकेला मदत केल्याचीही शंका व्यक्त करण्यात आली आहे. मादुरो यांच्या पत्नीवरही अशाच प्रकारे पाळत ठेवण्यात आली होती.

Nicolas Maduro
वास्तविक अमेरिकेनं जे ऑपरेशन केले, त्याआधी चार दिवसांची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी हवामान बिघडल्यामुळे ही कारवाई स्थगित करावी लागली. जेव्हा अमेरिकेकडून या कारवाईसाठी ग्रीन सिग्नल मिळाला, तेव्हा चीनचे एक शिष्टमंडळ व्हेनेझुएलामध्ये होते, त्यामुळे अत्यंत सावधपणे सर्व मोहीम पार पाडण्यात आली. या मोहिमेला “ऑपरेशन अॅब्सोल्युट रिझोल्व” असे नाव देण्यात आले होते. यासाठी कमांडोंनी दिवसरात्र सराव केला होता. तसेच मादुरोंच्या बेडरुममध्ये असलेल्या स्टीलच्या दरवाजासारखा दरवाजही उघडण्याचा त्यांचा सराव झाला होता. ( Nicolas Maduro )
डेल्टा फोर्सला माहित होते की, तणावपूर्ण आणि युद्धसदृश परिस्थितीमुळे, मादुरो एकाच ठिकाणी राहत नव्हते. ते सहा ते आठ ठिकाणी फिरत्या पद्धतीने राहत होते. ही मोहीम झाली तेव्हा संध्याकाळी उशिरापर्यंत अमेरिकेला ते कुठे राहणार आहेत हे माहित नव्हते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हेनेझुएलाचे अनेक अधिकारी रजेवर होते. त्यात अनेक मोठ्या लष्करी अधिका-यांचाही समावेश आहे. आता त्याच अधिका-यंवर मादुरोंबाबत अमेरिकेला माहिती दिली, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही सर्व कारवाई अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एखाद्या टिव्हीचा शो पहावा तशीच त्यांच्या कार्यालयात बसून पाहिली. ( Nicolas Maduro )
सर्वप्रथम सायबर हल्ला करण्यात आला. त्यात वीज पुरवठा खंडित झाला. मग १५० हून अधिक लष्करी विमानांनी २० वेगवेगळ्या तळांवरून आणि नौदलाच्या जहाजांवरून एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला केला. त्याचवेळी एव्हिएशन रेजिमेंटमधील नाईट स्टॉकर्सनी व्हेनेझुएलाच्या सर्वात मजबूत किल्ल्यावरील फोर्ट ट्युना लष्करी तळावर उतरले. तिथेच मादुरो त्यांच्या पत्नीसह होते.
=======
हे देखील वाचा : Venezuela President : डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यासमोरची आव्हाने
=======
या खोलीचा दरवाजा स्फोटकांनी उघडण्यात आला, तेव्हा मादुरो सेफ रुममध्ये जात होते. पण त्या सेफ रुमचा दरवाजा बंद झाल्यावरही अमेरिकन सैन्यानं तो उघडला आणि मादुरो यांना आपल्या ताब्यात घेतले. हे सर्व होत असतांना मादुरो यांच्या संरक्षणासाठी तैनात असलेले ३०० जवान गुढरित्या गायब झाले होते. यावरुनच सीआयएनं याबाबत किती अचूक माहिती मिळवली होती, याची कल्पना येते. त्यांच्याकडे मादुरो यांच्या सेफरुमचा कोडही होता. ( Nicolas Maduro )
आता या कारवाईबद्दल चर्चा होत असतांना मादुरो यांना त्यांच्या देशातील कोणत्या अधिका-यांनी फसवले आहे, याची चर्चा सुरु झाली आहे. संपूर्ण व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेचे पाच हजाराहून अधिक एजंट अद्यापही असल्याची माहिती आहे. त्यांच्यामार्फत अमेरिका आता व्हेनेझुएलाच्या प्रशासनावर आपला दबाव कायम ठेवण्याची योजना आखत आहे.
सई बने
