Home » Zohran Mamdani : अमेरिकेच्या कर्माचे फळ…. रामझी कासेम

Zohran Mamdani : अमेरिकेच्या कर्माचे फळ…. रामझी कासेम

by Team Gajawaja
0 comment
Zohran Mamdani
Share

जगभरातील देशांमध्ये अस्थिरतेचे बीज पेरुन तेथील सरकारला पोखरण्याचे काम गेली अनेक अमेरिका करीत आहे. अमेरिकेमध्ये सत्ता कोणाचीही असली तरी हे प्रशासन गुप्तचर यंत्रणाच्या माध्यमातून जगभर आपला दबदबा रहावा यासाठी ही अस्थिरता निती वापरत आहे. गेल्या काही वर्षात श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे, त्याला कारण अमेरिका आणि तेथील गुप्तचर यंत्रणांचे कारस्थान आहे, हे जगजाहीर वास्तव आहे. पण याच अमेरिकेला आता त्यांच्या कर्माची फळे मिळायला सुरुवात झाली आहेत. कारण अमेरिकेचे सर्वात मोठे आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असलेल्या न्यू यॉर्क या शहराचे महापौर म्हणून जोहरान ममदानी यांनी पदभार स्विकारला आहे. जोहरान ममदानी यांच्या रुपानं अमेरिकेला पहिला मुस्लिम महापौर मिळाला आहे. पण याच ममदानींच्या आश्वासनामुळे न्यू यॉर्कमधील उद्योजकांनी मात्र हे शहर सोडण्याची तयारी सुरु केली आहे. न्यूयॉर्क हे देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आंतरराष्ट्रीय शहर आहे. सोबतच जगातील श्रीमंतांचे लाडके शहर म्हणून या शहराची ओळख आहे. पण हिच ओळख या शहरातील मुळ रहिवाशांना त्रासदायक ठरणार आहे. कारण या श्रीमंतांकडून अतिरिक्त कर वसूल कऱण्याची योजना जोहरान ममदानी आखत आहेत. या सर्वात प्रमुख आहेत, ते त्यांचे कायदेविषयक सल्लागार, रामझी कासेम. हे कासेम कोण आहेत, असा प्रश्न पडला असेल तर, अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर अल-कायदाचे वकील म्हणून याच रामझी कासेम यांनी काम पाहिले होते. आता तेच कासेम हे न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे वरिष्ठ कायदेशीर सल्लागार म्हणून काम करणार आहेत आणि त्यांच्या मार्फत ममदानी न्यू यॉर्कमधील श्रीमंतांकडून अतिरिक्त कर वसूल करणार आहेत. ( Zohran Mamdani )

Zohran Mamdani

Zohran Mamdani

न्यू यॉर्कचे महापौर म्हणून जोहरान ममदानी यांनी घेतलेली शपथ चर्चेत आहे. न्यू यॉर्कच्या इतिहासात पहिल्यांदाच शहराच्या महापौरांनी कुराणावर हात ठेवून पदाची शपथ घेतली आहे. ही शपथ ममदानी यांनी घेतली, ती जागाही खास होती. मॅनहॅटनमधील एका बंद ऐतिहासिक सबवे स्टेशनवर त्यांनी महापौर म्हणून शपथ घेतली. रात्री झालेल्या या शपथविधीनंतर ३४ वर्षीय डेमोक्रॅटिक नेते जोहरान ममदानी यांनी आपला कार्यभार हाती घेतला. सोबतच त्यांनी जे निर्णय घेतले त्यामुळे आता वाद उठले आहेत. कारण ममदानी यांनी ९/११ हल्ल्यानंतर अल-कायदाचे वकील म्हणून काम केलेल्या रामझी कासेम यांची आपले वरिष्ठ कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. कासेम यांच्या या नियुक्तीमुळे ९/११ हल्ल्यातील जखमा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. न्यू यॉर्क शहरातील ट्विन टॉवर्स हे ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात उद्ध्वस्त झाले होते. यात अंदाजे २,९७७ लोक मारले गेले. यामध्ये विमानातील प्रवासी, इमारतीतील नागरिकांचा समावेश होता. अलकायदाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे अवघ्या अमेरिकेला मोठा धक्का बसला होता. याच अलकायदाच्या बाजुने लढणा-या वकिलाला आता जोहरान ममदानी यांनी आपला कायदेशीर सल्लागार नेमला आहे.

रामझी कासेम हे आता न्यूयॉर्क शहराचे मुख्य कायदेशीर सल्लागार म्हणून काम पहाणार आहेत. कासेम हे नागरी हक्क वकील आणि CUNY लॉ विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. ९/११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी स्थलांतरितांना आणि अटकेत असलेल्या लोकांना मदत केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात रामझी कासेम यांनी वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून काम केले आहे. ते स्वतः एक स्थलांतरित आहेत. त्यांनी CLEAR नावाची संस्था स्थापन केली आहे. ही संस्था इमिग्रेशन एजन्सीने ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत पुरवते आणि हद्दपारीच्या धोक्यात असलेल्यांना मदत करते. याशिवाय कासेम यांनी यापूर्वी अल-कायदाशी संबंधित व्यक्तींचाही कायदेशीर बचाव केला होता. सोबतच कासेम हे इस्रायलचे विरोधक म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळेच ममदानी यांच्या या पहिल्याच निर्णयामुळे अमेरिकेतील रूढीवादी नेते आणि गटांकडून तीव्र विरोध होत आहे. कासेम यांच्या नियुक्तीमुळे संपूर्ण अमेरिकेत निदर्शने ही सुरु झाल्याची माहिती आहे. ( Zohran Mamdani )

=======

हे देखील वाचा : America : व्हाईट हाऊसच्या खाली काय आहे !

=======

या एका निर्णयासोबत जोहरान ममदानी यांनी तमाम भारतीयांच्या भुवया उंचावतील अशीही एक कृती केली आहे. जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदवर फेब्रुवारी २०२० च्या दिल्ली दंगलीतील कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली असून तो तिहार तुरुंगात आहे. याच उमर खालिदला ममदानी यांनी पत्र लिहिल्याची माहिती आहे. या पत्रामध्ये ममदानी यांनी आपल्याला काळजी वाटत असल्याचे नमूद केले आहे. उमरसाठी ममदानी यंनी व्यक्त केलेला हा पाठिंबा भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण काही महिन्यापूर्वीच उमरच्या पालकांनी अमेरिकेत ममदानीची भेट घेतल्याचीही माहिती आली आहे. एकूणच जोहरान ममदानी यांनी न्यू यॉर्क सारख्या श्रीमंत शहराच्या महापौर पदाचा कारभार हाती घेतल्यावर जे निर्णय घेतले, त्यावरुन वाद सुरु झाला आहे. ज्या अमेरिकेनं जगभरातील देशांमध्ये असे वाद सुरु केले, त्याच अमेरिकेत आता त्यांच्याच महापौरांनी घेतलेले निर्णय देशाच्या ऐक्यास धोकादायक ठरणारे आहेत. ( Zohran Mamdani )

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.