Home » न्यूयॉर्क शहर बुडण्याचा धोका 

न्यूयॉर्क शहर बुडण्याचा धोका 

by Team Gajawaja
0 comment
New York
Share

जगातील सर्वात जास्त गगनचुंबी इमारती ज्या शहरात आहे, असं अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) शहर पुढच्या काही वर्षात कसे असेल किंवा या झगमगत्या शहराचे अस्तित्वच जगाच्या नकाशावर असेल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. रोड आयलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ग्रॅज्युएट स्कूल ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधकांनी न्यूयॉर्क (New York) शहराच्या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार न्युयॉर्कमध्ये गगनचुंबी इमारती एवढ्या झाल्या आहेत की, त्याचा भार आता जमिनीला सोसवेना असा झाला आहे. परिणामी न्युयॉर्कची (New York) जमीन खाली धसत आहे.  त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण न्युयॉर्क शहर धोकादायक परिस्थितीत पोहचले आहे. या गगनचुंबी इमारती कधीही जमिनीत धसण्याचा धोका रोड आयलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ग्रॅज्युएट स्कूल ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधकांनी व्यक्त केला आहे. हा अहवाल आल्यावर न्युयॉर्क शहराच्या अस्तित्वाचा आणि तेथील निर्माणाधीन इमारतींवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

रोड आयलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ग्रॅज्युएट स्कूल ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधकांनी दिलेल्या या अहवालानं एकच खळबळ उडाली आहे.  या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे की, न्युयॉर्क शहर वेगाने बुडत आहे. जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून न्युयॉर्क शहराची ओळख आहे. या शहरात सर्वाधिक गगनचुंबी इमारती आहेत. याच इमारती शहराच्या अस्तित्वासाठी धोकादायक झाल्याचा इशारा भूगर्भशास्त्रज्ञांनी दिला आहे. न्युयॉर्क शहर दरवर्षी 1-2 मि.मी. बुडत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. हा अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी न्युयॉर्कमधील एक लाख इमारतींची पाहणी करण्यात आली होती. या युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी न्युयॉर्कसारखाच (New York) धोखा समुद्राशेजारी असलेल्या शहरांनाही भविष्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

न्युयॉर्क (New York) हे जगभरातील वाढत्या किनारपट्टीवरील शहरांचे प्रतीक असून समुद्राकिनारी असलेली शहरे अशाच प्रकारे बुडण्याचा धोका आहे. गगनचुंबी इमारतींसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या न्युयॉर्कला हवामान बदल, समुद्राची वाढती पातळी आणि उंच इमारतींचे वाढते वजन असा तिहेरी धोका निर्माण झाला आहे.  जगभरात वाढत जाणा-या उष्णतेचे प्रमाणही न्युयॉर्कच्या नाशाला कारणीभूत ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  जसे जगभरातील उष्णतेचे प्रमाण वाढत जाईल तसेच बर्फाचे वितळण्याचे प्रमाणही वाढत जाणार आहे.  त्याचा परिणाम म्हणून समुद्राच्या पातळीत वाढ होणार आहे. यामुळे समुद्रकाठावर असलेल्या शहरात समुद्राचे पाणी भरण्यास सुरुवात होणार आहे.   किनारपट्टीवरील शहरे अधिकाधिक असुरक्षित होतील, असे संशोदकांनी स्पष्ट केले आहे.  समुद्रापाठोपाठ न्युयॉर्कला सर्वात अधिक धोका निर्माण झाला आहे, तो त्याची ओळख असलेल्या गगनचुंबी इमारतींचा.  संशोधकांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की,  सतत वाढणारा बांधकामाचा भार या शहराला धोकादायक स्थितीत घेऊन गेला आहे.  त्यात सतत खोदल्यामुळे समुद्राची पातळी अधिक आत आली आहे.  यामुळे भविष्यात न्युयॉर्क (New York) शहरात मोठ्या पुराचा धोकाही असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.  

गेल्या वर्षभरात अशा घटना जगभरात घडल्या आहेत. फारकाय भारतातील उत्तराखंडमधील जोशीमठ शहरातही अशाच घटना घडल्या आहेत.  जोशीमठमध्ये अतिरिक्त प्रमाणात बांधकाम झाले. या बांधकामाचा भार सहन न झाल्यानं जमिनीला भेगा पडल्या. या भेगा पुढे वाढून घरांनाही भेगा पडल्या. त्यामुळे येथील अनेक नागरिकांना रहाती घरे सोडावी लागली आहेत. अशीच काहीशी परिस्थिती भविष्यात न्युयॉर्क शहरात येऊ शकते, हे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. फक्त न्युयॉर्क नाही तर जगभरातील समुद्रकिनारी असलेल्या शहरांनी त्यांच्या निर्माणाधीन बांधकामांना वेळीच रोखले नाही तर ही शहरेही भविष्यात समुद्राच्या पाण्याखाली जाण्याचा धोका रोड आयलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ग्रॅज्युएट स्कूल ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधकांनी व्यक्त केला आहे. (New York) 

======

हे देखील वाचा : तहव्वूर राणाला भारतात आणणार…

======

न्यूयॉर्क (New York) हे अमेरिकेतील सर्वात मोठे आणि मुख्य शहर आहे. न्यूयॉर्क शहराला यापूर्वीच दोन विनाशकारी चक्रीवादळांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे शहरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. 2012 मध्ये सँडी चक्रीवादळामुळे समुद्राच्या पाण्याने शहराला पूर आला होता. तर 2021 मध्ये इडा चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे ड्रेनेज सिस्टमवर परिणाम झाला. 1790 पासून न्यूयॉर्क शहर हे युनायटेड स्टेट्समधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.  जागतिक व्यापार, वाणिज्य, संस्कृती, फॅशन आणि मनोरंजन यासाठी न्युयॉर्कचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय येथे असल्यामुळे ते आंतरराष्ट्रीय घडामोडींचे प्रमुख केंद्र आहे. याच न्युयॉर्क शहराच्या भविष्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.