Home » पर्यटनाची नवी संधी ; गंगा विलास क्रूझ प्रवास सर्वाधिक आकर्षण ठरणार

पर्यटनाची नवी संधी ; गंगा विलास क्रूझ प्रवास सर्वाधिक आकर्षण ठरणार

by Team Gajawaja
0 comment
Ganga Villas Cruise
Share

क्रूझ….हा शब्द ऐकल्यावर पहिल्यांदा काय नजरेसमोर येतं…तर दूरवर पसरलेला समुद्र आणि त्यावर चालणारं भव्य जहाज…महलासारख्या या जहाजात सर्व सुखसोयी असतात.हजारो नागरिकांना राहण्यासाठी अलिशान सूट असतात.  देशी-विदेशी पदार्थांची चंगळ असते.  अगदी स्विमिंगपूलपासून फुटबॉलपर्यंत सगळ्या खेळाच्या सोयी उपलब्ध असतात.सर्वत्र पार्टीचा माहोल, संगीताचे कार्यक्रम हे सर्व या भव्य जहाजावर उपलब्ध असते.अशाच भव्य जहाजाला क्रूझ म्हणतात.मात्र आतापर्यंत समुद्रावर राज्य करणा-या क्रूझला नदीवरही पाहता आणि त्याच्या सफरीचा आनंद घेता येणार आहे.  विशेष म्हणजे, हा नदीवरील क्रूझच्या प्रवासाचा अनुभव पहिल्यांदा भारतातच घेता येणार आहे.  वाराणसीपासून सुरु होणारी ही क्रूझ यात्रा नव्या वर्षापासून सुरु होणार आहे.  

वाराणसीपासून सुरू होणारी आणि जगातील सर्वात लांब असणारी ही क्रूझ ट्रिप 50 दिवसांत पूर्ण होईल.  या दरम्यान क्रूझ 3200 किलोमीटरचा प्रवासाचा टप्पा पार करेल.  नव्या वर्षी, 10 जानेवारी 2023 पासून वाराणसी ते आसाममधील दिब्रुगड अशी क्रूझ ट्रिप सुरू होईल.  गंगा विलास नावाचे हे लक्झरी क्रूझ जहाज या अनोख्या सहलीसाठी तयार झाले आहे.  नदीवर चालणारे हे जहाज भारतातच बांधण्यात आले आहे, हे आणखी त्याचे वैशिष्टय.  या प्रवासात हे गंगा विलास क्रूझ (Ganga Villas Cruise)भारत आणि बांगलादेशच्या एकूण 27  नद्यांमधून प्रवास करणार आहे.  आसाममधील दिब्रुगड पर्यंत या क्रूझचा प्रवास असला तरी  ते बांगलादेशी सीमेवरूनही जाणार आहे.  पन्नास दिवसांच्या या प्रवासांसाठी अत्यंत आधुनिक अशा सुविधा उपलब्ध असतील.  तर क्रूझवरील प्रवासी निसर्गाचा आणि प्रवासादरम्यान लागणा-या सर्व प्रसिद्ध स्थळांचे दर्शन घेऊ शकणार आहेत.  

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये पर्यटन विकास करण्यासाठी काही महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत.  यातून परकीय पर्यटकांना आकर्षित करण्याचीही योजना आहे.  त्यातला हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.  वाराणसीला भारताची धार्मिक राजधानी म्हणण्यात येतं.  वाराणसीतील घाट बघण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात.  या पर्यटकांच्या संख्येत अधिक वाढ होण्यासाठी नव्या योजना करण्यात येतात.  त्यात हा गंगा विलास क्रूझ (Ganga Villas Cruise)प्रवास सर्वाधिक आकर्षण ठरणार आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीमध्ये वाराणसी-डिब्रूगड दरम्यान धावणाऱ्या या क्रूझचे वेळापत्रक ११ नोव्हेंबर रोजी जाहीर केले.  केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यासाठी लागणा-या सात कम्युनिटी जेटींचे उद्घाटन केले.   याशिवाय रविदास घाट येथे आठ कम्युनिटी जेटींची पायाभरणी केली.  

========

हे देखील वाचा : नासाने आपल्या मिशनचे नाव आर्टेमिस का ठेवले?

========

या गंगा विलास क्रूझची बी 62.5 मीटर आणि रुंदी 12.8 मीटर आहे. भारतात बांधलेले हे पहिले नदी जहाज आहे.  यात 18 सर्वोत्तम सूट असतील ज्यात प्रवासी प्रवास करतील.  यामध्ये बाथरूम, शॉवर, कन्व्हर्टेबल बेड,  फ्रेंच बाल्कनी,  एलईडी टीव्ही  यासह आधुनिक जीवनरक्षक प्रणाली देखील असेल.  या क्रूझ प्रवासाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी 40 सीटर रेस्टॉरंट, सन डेक आणि स्पा या सुविधाही क्रूझवर उपलब्ध असतील.  क्रूझवरील जेवणात कॉन्टिनेंटल आणि भारतीय पदार्थ मिळणार आहेत.  3200 किलोमीटरच्या या गंगा विलास क्रूझच्या प्रवासात कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम पाहायला मिळणार आहे.  ही क्रूझ वाराणसी ते कोलकात्याच्या हुगळी नदीपर्यंत सर्व प्रमुख ठिकाणी थांबेल.  यामध्ये सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ही दोन प्रमुख ठिकाणं असतील.  या नदीवरील जहाजाचा हा प्रवास जगातील सर्वात लांब प्रवास असेल.  त्यामुळे भारत आणि बांगलादेश हे दोन्हीही देश नदीमार्गानं होणा-या क्रूझ पर्यटनानं जागतिक प्रसिद्धी मिळवणार आहेत.  भारतात अन्यही नद्यांवर असा प्रकारचा प्रकल्प करण्याचा विचार आहे.  त्याद्वारे जलपर्यटनाला वाव मिळेल.  गंगा विलास क्रूझ (Ganga Villas Cruise)हा त्या सर्वांसाठी आदर्श ठरणार आहे.  

या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आता उत्तर प्रदेश सरकारतर्फे गंगा विलास क्रूझची(Ganga Villas Cruise) माहिती देण्यात येत आहे.  काशी कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे बनारसच्या पर्यटनात एक नवीन अध्याय जोडला जाणार आहे.  काशीला पर्यटन नकाशावर आणण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा विकसित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयत्नांपैकी हा सर्वाधिक चर्चेचा प्रकल्प ठरणार आहे.   अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता रविकांत यांनी हा प्रकल्प म्हणजे भारतीय उपखंडातील पर्यटनाचे अनोखे उदाहरण ठरणार असल्याचे सांगितले.  यामुळे भारतातील इतर नद्यांमध्ये ‘रिव्हर क्रुझिंग’बद्दल जागरूकता वाढेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.  एकूण हा गंगा विलास क्रूझचा (Ganga Villas Cruise) प्रवास म्हणजे तमाम भारतीयांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.