भारतात टिव्ही मालिका, चित्रपट आणि आता ओटीटीवरही येणाऱ्या वेबसिरीजमध्येही लहान मुलांचा मोठा सहभाग असतो. काही कार्यक्रम तर खास लहान मुलांना घेऊन करण्यात येतात. यात वय वर्ष तीन पासूनचीही मुलं सहभागी होतात. टीआरपी खेचण्यासाठी लहान मुलांचा मालिकांमधील सहभाग फायदेशीर होत असला तरी अनेकवेळा या लहानग्यांची होणारी आबाळही चर्चेत असते.(New guidelines from NCPCR)
अनेक तास एखाद्या शुटींगस्थळावर त्यांना बसवले जाते. त्यांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष दिले जात नाही, असा तक्रांरींचा सूर असतो. आता या सर्व गोष्टींची ‘नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR)’ने दखल घेतली आहे. मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या लहानग्यांसाठी त्यांनी काही नियम लागू केले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास निर्माते किंवा दिग्दर्शकावर गुन्हाही दाखल करता येणार आहे. (New guidelines from NCPCR)
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने गेल्या आठवड्यात या नियमांची घोषणा केली आहे. ही नियमावली चित्रपट, टीव्ही, रियालिटी शो, ओटीटी प्लॅटफॉर्म, बातम्या आणि सोशल मीडिया वेबसाइट्समध्ये काम करणाऱ्या सर्व मुलांसाठी लागू असणार आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास तीन वर्षांपर्यंतच्या कारावास आणि दंडात्मक तरतुदीही लागू होणार आहेत.
या नियमावलीनुसार संबंधित कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या मुलांची सर्व जबाबदारी निर्मांत्यांवर असणार आहे. या मुलांना दर तीन तासांनी ब्रेक द्यायला हवा. शिवाय कोणत्याही मूलाकडून सहा तासांपेक्षा जास्त काम करुन घेता येणार नाही. कोणत्याही शोमध्ये तीन महिन्यांपेक्षा कमी वयाची मुले सहभागी करता येणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे तीन महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्तनपान आणि लसीकरणासाठी प्रचारात्मक कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कोणत्याही शोमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही. याशिवाय जे कार्यक्रम कुटुंबासमवेत बसून बघू शकत नाहीत, अशा कार्यक्रमांत बालकलाकारांना घेता येणार नाही. (New guidelines from NCPCR)
====
हे देखील वाचा – कोटींमध्ये आहे राहुल गांधींची संपत्ती, जाणून घ्या काँग्रेस नेत्याची जीवनशैली
====
ज्या ठिकाणी चित्रीकरण चालू आहे तेथील वातावरण मुलांसाठी सुरक्षित असणे गरजेचे आहे. याबरोबरच मुलांच्या पालकांची संमतीही गरजेची असणार आहे. आणखी म्हणजे, अल्पवयीन विशेषत: सहा वर्षांखालील मुलांना हानिकारक कॉस्मेटिक आणि प्रकाशाच्या संपर्कात येतील अशा ठिकाणी काम करता येणार नाही. यासोबतच त्यांच्यासोबत शूटिंग करणाऱ्यांना शूटिंगपूर्वी फिटनेस सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. कोणालाही संसर्गजन्य आजार असल्यास तिथे लहान मुलांसह चित्रीकरण करता येणार नाही. (New guidelines from NCPCR)
ज्या शोमध्ये लहान मुलांचा सहभाग आहे तेथील कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणीही केली जाणार आहे. मुलांच्या खाण्यापिण्याच्या जबाबदारी निर्मात्यांची असणार आहे. तसेच मुलांची ड्रेसिंग रूम देखील वेगळी असावी आणि तेथे कोणत्याही मोठ्या व्यक्तीला प्रवेश नसावा. या लहान कलाकारांचे शिक्षणही महत्त्वाचे आहे. त्यांच्या अभ्यासासाठीही योग्य वातावरण निर्मिती करावी लागणार आहे. तसेच मुलांना कोणतीही असाइनमेंट 27 दिवसांपेक्षा जास्त देता येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही मुलांना सहा तासांपेक्षा जास्त किंवा संध्याकाळी 7 ते सकाळी 8 दरम्यान काम देता येणार नाही. (New guidelines from NCPCR)
सध्या मालिकांमध्ये लहान मुलांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे ही लहानगीही शुटींगमध्ये दिवसरात्र व्यस्त असतात. या नियमांमुळे त्यांनाही थोडी दिलासा मिळणार आहे.
– सई बने