राज्यभरात हळूहळू लॉकडाऊन शिथिल होत आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून देशभरात सुरू असेलला कोरोनाचा कहर सुरूच आहे. या काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र अनलॉकमध्ये हळूहळू या सेवा पूर्ववत केल्या जात आहे.
सध्या देशात Unlock -4 ची सुरुवात झाली असून यादरम्यान अनेक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान काल राज्यात प्रवासासाठी ई-पासची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर दुसरीकडे मध्ये रेल्वेनेही राज्यांतर्गंत प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्या 2 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आरक्षण पद्धतीने 2 सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनदरम्यान परराज्यातील नागरिकांना घरी पोहोचविण्यासाठी रेल्वेने विशेष ट्रेन चालविल्या होत्या. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल गाड्या सुरू आहेत. मात्र अद्यापही सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्यात आलेली नाही. अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.