Home » मुंबईची ग्रामदेवता – मुंबा देवीचा इतिहास

मुंबईची ग्रामदेवता – मुंबा देवीचा इतिहास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mumba Devi
Share

आजपासून शारदीय नवरात्र सुरु झाले. गणेशोत्सवानंतर या नवरात्राची सगळ्यांनाच उत्सुकता असते. नवरात्र म्हणजे उत्साह, चैतन्य. आजपासून पुढील नऊ दिवस फक्त आनंद आणि जल्लोष असणार आहे. दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यात झालेल्या युद्धाशी हा सण संबंधित आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा संदेश नवरात्र सण देतो. नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना अर्थात नवदुर्गांना हे नवरात्र समर्पित आहे.

या शारदीय नवरात्राच्या निमित्ताने जाणून घेऊया साडे तीन शक्तिपीठांव्यतिरिक्त इतरप्रसिद्ध देवीच्या मंदिरांबद्दल. आदिमाया आदिशक्तीशिवाय या जगाची कल्पनाच करू शकत नाही. अशा या देवीच्या अनेक मंदिरांना आपल्या देशात जाज्वल्य इतिहास आहे. आपल्या पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक मंदिरांबद्दल अतिशय मोठी आणि महत्वाची माहिती दिली आहे. यातलीच एक महत्वाची देवी म्हणजे, मुंबईची मुंबा देवी.

मुंबईची ग्रामदेवता म्ह्णून मुंबादेवी ओळखली जाते. मुंबईचे नाव देखील मुंबा देवीवरूनच पडले असल्याची मान्यता आहे. मुंबादेवी ही मुख्यत्वे मासे पकडणाऱ्या कोळ्यांची देवता होती. तिचे देऊळ मुंबईच्या फोर्ट भागात होते. जेव्हा इंग्रजांनी तेथे व्हिक्टोरिया टर्मिनस हे रेल्वे स्टेशन बांधायचे ठरवले तेव्हा त्यांच्या बांधकामाला हे मंदिर अडथळा ठरत होते. त्यामुळे त्यांनी ते देऊळ काढून टाकले आणि मुंबईच्या काळबादेवी-भुलेश्वर भागात मुंबा देवीचे आताचे मंदिर बांधून दिले.

Mumba Devi

मुंबादेवी मंदिर मुंबईच्या भुलेश्वर, येथे असून, हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुने आहे. या मंदिराची स्थापना कोळी बांधवानी केली आहे. देवी आईच्या आशीर्वादाने त्यांची भरभराट झाली. कोळी बांधवांचा असा विश्वास आहे की, मुंबा देवी त्यांचे समुद्रापासून संरक्षण करते.

या मंदिरातील देवीची मूर्ती नारंगी रंगाची असून चांदीच्या मुकुटाने सुशोभित करण्यात आली आहे. देवीच्या मुर्तीजवळच शेजारी आई अन्नपूर्णा आणि जगदंबेची मूर्ती स्थापित केली आहे. या मंदिरात दिवसातून सहावेळा आरती केली जाते. तर आठवड्यातील मंगळवार हा शुभ वार मानला जातो. ही देवी नवसाला पावणारी आहे. भाविक लोक आपला नवस फेडण्यासाठी येथे ठेवलेल्या कठवा (लाकडावर) नाण्यांना खिळे मारून ठोकतात.

मुंबा देवीची कहाणी
एका पौराणिक कथेनुसार, मुंबा देवी ही ‘मुंबरका’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या दुष्ट राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवाने पाठवलेली आठ हातांची देवी असल्याचे मानले जाते, ज्याने तिच्या दहशतीने स्थानिकांना घाबरवले. भगवान ब्रह्माजीची प्रार्थना केल्यावर, मुंबा देवी पृथ्वीवर अवतरते आणि दुष्ट राक्षस मुंबरकाला पराभूत करते, त्यानंतर मुंबारकाला तिची चूक कळते आणि तो देवीच्या पायी पडून आणि तिचे नाव घेत, देवीला क्षमा करण्याची विनवणी करतो .

अशा प्रकारे देवी त्याची विनंती मान्य करते, त्यानंतर तिला मुंबा देवी म्हणून ओळखले जाऊ लागले. याशिवाय देवीने मंदिर बांधण्याची परवानगीही दिली होती.

मुंबा देवी मंदिर हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या मुंबा देवीची ख्याती आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांचे नवस करतात. येथून कोणताही भाविक रिकाम्या हाताने जात नाही, असे मुंबादेवी मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

========

हे देखील वाचा : नवरात्राची पहिली माळ – श्री शैलपुत्री पूजन

=========

मुंबादेवी मंदिराचे वैशिष्ट्य

या मंदिरास भेट देणार्‍या प्रत्येकासाठी मुंबा देवी मंदिराची रचना एक अद्भुत दृश्य आहे. मुंबा देवी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे चांदीचा मुकुट, सोन्याचा हार आणि नाकाच्या स्टडने सुशोभित केलेली मुंबादेवी देवीची मूर्ती. मंदिर परिसरात ‘हनुमान’ आणि ‘गणेश’ या मूर्ती ठेवल्या आहेत. इतर आकृत्यांमध्ये मोरावर बसलेल्या ‘अन्नपूर्णा’ ची दगडी मूर्ती आणि भयंकर वाघाच्या शिल्पांचा समावेश आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.