गणेशोत्सव संपला की वेध लागतात ते नवरात्राचे. पितृपक्षाचे १५ दिवस गेले की, लगेच सुरु होणारे नवरात्र म्हणजे आई जगदंबेचा जागरच. अवघ्या आठवडाभरावर शारदीय नवरात्र येऊन ठेपले आहे. या नवरात्रामध्ये रंगबेरंगी चनिया चोली घालून गरबा करण्याची एकच क्रेझ पाहायला मिळते. मात्र यासोबतच मागील काही वर्षांपासुन नवरात्रीची अजून एक ओळख म्हणजे नऊ दिवसांचे नऊ रंग. या नवरात्रामध्ये नऊ माळींचे नऊ रंग असतात. प्रत्येकाला यावर्षी कोणत्या दिवशी कोणता रंग आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्यामुळे यावर्षी २०२४ सालाचे नऊ दिवसांचे नऊ रंग आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी अर्थात ३ ऑक्टोबर रोजी पहिल्या माळेचा रंग आहे पिवळा. पिवळा रंग ऊर्जेचे प्रतीक असून हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो. सोबतच हा रंग मन प्रसन्न, प्रफुल्लित करतो.
दुसऱ्या माळेचा अर्थात ४ ऑक्टोबर, शुक्रवारचा रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा प्रगती, भरभराट, समृद्धी, सुसंवाद, स्थिरता,संतुलन आणि चैतन्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग म्हणूनही ओळखला जातो.
तिसऱ्या माळेचा अर्थात ५ ऑक्टोबर, शनिवारचा रंग आहे, राखाडी. राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो. राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे.
चौथ्या माळेचा अर्थात ६ ऑक्टोबर, रविवारचा रंग आहे, नारंगी. नारंगी हा रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे. हा रंग हा त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. शिवाय नारंगी रंग शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी देखील संबंधित आहे.
पाचव्या माळेचा अर्थात ७ ऑक्टोबर, सोमवारचा रंग आहे, पांढरा. पांढरा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे.
सहाव्या माळेचे अर्थात ८ ऑक्टोबर मंगळवारचा रंग आहे, लाल. लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो. शिवाय लाल रंग इच्छाशक्ती, धैर्य, स्फूर्ती, संघर्ष, उत्तेजना, आवेग यांचेही चिन्ह आहे.
सातव्या माळेचा अर्थात ९ ऑक्टोबर, बुधवारचा रंग आहे, निळा. निळा रंग हा उर्जेचे प्रतीक मानला जातो. निळा रंग हा विश्वासाचे, आत्मियतेचं प्रतिक आहे. या रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शीतलता आणि स्निग्धता.
आठव्या माळेचा रंग अर्थात १० ऑक्टोबर, गुरुवारचा रंग आहे, गुलाबी. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग हा सकारात्मकतेचा, आशेचा रंग आहे.
नवव्या माळेचा रंग अर्थात ११ ऑक्टोबर, शुक्रवारचा रंग आहे, जांभळा. जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो. जांभळा रंग रहस्य, यश आणि क्षमतेचे प्रतीक देखील समजला जातो.