सध्या सगळीकडे शारदीय नवरात्राची धूम सुरु आहे. दुर्गा देवीचा जागर आणि पूजा करत हे नऊ दिवसांचे नवरात्र साजरे केले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्राला मोठे महत्व आहे. या नवरात्राच्या काळात देशातील विविध देवीच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या नवरात्रीच्या काळात देवीच्या पूजेचे एक वेगळेच महत्व असते.
आपल्या देशात देखील देवीची असंख्य लहान मोठी मंदिरं पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे आपल्या या मंदिरांना मोठा आणि जाज्वल्य इतिहास आहे. प्रत्येक मंदिराचे स्वतःचे एक महत्व आणि इतिहास आहे. आपल्याला देवीचे मंदिरं म्हटले की, साडे तीन शक्तिपीठंच आठवतात. मात्र या पलीकडे जाऊन देखील देशात आदिशक्तीचे अनेक मोठे मंदिरं आहेत. यातलेच एक मंदिर म्हणजे, कामाख्या मंदिर.
माता कामाख्या देवी मंदिर हे देखील या प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक आहे. आसामची राजधानी दिसपूरपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराला देशभरातून आणि जगभरातून लाखो भाविक भेट देतात. दक्ष राजाच्या यज्ञामध्ये देवी सतीने आत्मदहन केले. त्यानंतर सतीचा वियोग झाल्यामुळे दुःखसागरात बुडालेल्या भगवान शिव शंकरानी सतीचे निष्प्राण शरीर उचलून संपूर्ण जगात भ्रमंती करत शोक केला. त्यांना असे दुखत पाहून शंकरांना यातून बाहेर कसे काढायचे याचा विचार सर्वच देवांना पडला. तेव्हा श्री विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे ५२ भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले. भारतात आत्ताच्या घडीला असे एकूण ५२ शक्तिपीठं अस्तित्वात आहे.
असे सांगितले जाते की, देवी सतीच्या योनीचा भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार येथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे देवी रजस्वला होते. कामाख्या शक्तीपीठ चमत्कार आणि रोचक गोष्टींनी भरलेले आहे. चला जाणून कामाख्या शक्तीपीठाशी संबंधित काही रोचक गोष्टींबद्दल.
माता सतीला समर्पित असलेल्या या मंदिरात दरवर्षी 22 जून ते 26 जून दरम्यान अंबुबाची मेळावा आयोजित केला जातो. 22 जून ते 25 जून या काळात मंदिराचे दरवाजे बंद राहतात, या काळात ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लाल राहते. असे मानले जाते की या दिवसात माता सती मासिक पाळीत राहतात. दुसरीकडे, 26 जून रोजी सकाळी मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते, त्यानंतर भाविकांना मातेचे दर्शन होते.
कामाख्या मंदिर तीन भागात बनवले गेले आहे. पहिला भाग सर्वात मोठा असून यात प्रत्येक व्यक्तीला आत जाण्याची परवानगी नसते. दुसऱ्या भागात मातेचे दर्शन आहे. इथे दगडातून सतत पाणी येत असते. असे मानले जाते की, मातेला मासिक पाळी महिन्यातील तीन दिवस येते. हे तीन दिवस मंदिराचे दरवाजे बंद असतात. तीन दिवसांनंतर पुन्हा जल्लोषात हे दरवाजे उघडले जातात. तंत्र साधनेसाठी हे ठिकाण सर्वात महत्त्वाचे मानले जाते. येथे साधू-अघोरींची वर्दळ असते. येथे येण्याने प्रत्येक व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होतात.
गुवाहाटीजवळ प्रसिद्ध अशा या कामाख्या मंदिरात दरवर्षी जून महिन्यात अंबुबाची यात्रा भरते. अंबुबाची यात्रेला ‘अंबुबाची पर्व’, ‘अमेती’ किंवा ‘जगन्मातेच्या ऋतुस्नाना’चा सोहळा असेही म्हणतात. अंबुबाची यात्रा तांत्रिक परंपरा आणि शक्ती उपासनेशी संबंधित आहे.
अंबुबाची यात्रा तांत्रिकांसाठी महत्त्वाची मानली जाते. देशभरातून लाखो भाविक आणि तांत्रिक समाज राजेवारी पूजा करण्यासाठी अंबुबाची यात्रेत सहभागी होतात. अंबुबाची यात्रेत तांत्रिकांचे अनेक गट सहभागी होतात आणि आपल्या परंपरेनुसार विधी करतात. अंबुबाची यात्रेत तांत्रिक साधना करण्यासाठी आणि आपल्या शक्ती वाढवण्यासाठी येतात, अशी मान्यता आहे. काही तांत्रिक गुप्तपणे विधी करतात.
जून महिन्यामध्ये कामाख्या मंदिरातील देवीला रजस्वला होते. या काळात तीन दिवस देवीच्या गर्भगृहाचे दरवाजे बंद असतात. देवीच्या गर्भगृहात पांढरे वस्त्र ठेवले जाते आणि हेच वस्त्र तुकडे करून मंदिर उघडल्यानंतर भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. हे पांढरे वस्त्र देवीच्या मंदिराचे दरवाजे उघडल्यावर लाल रंगाचे झालेले असते.
जेव्हा देवीच्या गर्भगृहाचे दरवाजे तीन दिवसांसाठी बंद होतात, त्यावेळी भक्तांना मंदिराच्या आवारात बागकाम, स्वयंपाक, धार्मिक प्रथा किंवा पूजा न करण्याची सूचना देण्यात येते. चौथ्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जातात आणि अंबुबाची यात्रा सुरू होते. कामाख्या देवीची स्नान पूजा आदी उपचार झाल्यानंतर भाविकांना देवीच्या दर्शनाची अनुमती देण्यात येते.
=======
हे देखील वाचा : नवरात्राची सहावी माळ – देवी कात्यायनी पूजन
========
जेव्हा मातेला 3 दिवस मासिक पाळी येते तेव्हा या मंदिराजवळून जाणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणीही लाल होते. या नदीच्या काठावर नीलाचल पर्वतावर कामाख्या देवीचे मंदिर आहे. अशाप्रकारे दरवर्षी मातेची मासिक पाळी आणि ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लाल होणे हे अजूनही गूढ आहे. कामाख्या देवीच्या या चमत्कारिक मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात.
या मंदिरात तुम्हाला देवीचे कोणतेही चित्र दिसणार नाही. मूर्तीऐवजी येथे फुलांनी सजवलेला पूल बांधण्यात आला आहे. या तलावातून नेहमीच पाणी वाहत असते. सती देवीच्या योनीचा भाग पडल्यामुळे या मंदिरात योनीची पूजा केली जाते. तांत्रिकांचा मेळा आहे असे दिसते- हे मंदिर तंत्रविद्येसाठीही ओळखले जाते. यामुळेच मंदिराचे दरवाजे उघडले की दूर दूरवरून ऋषी-मुनी दर्शनासाठी येतात.