Home » नवरात्राची पहिली माळ – श्री शैलपुत्री पूजन

नवरात्राची पहिली माळ – श्री शैलपुत्री पूजन

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shardiy Navratra
Share

आजपासून शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे. पुढील नऊ दिवस सगळीकडे केवळ उत्साह,आनंद आणि उल्हासाचे वातावरण असणार आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीची आराधना करून तिची सेवा केली जाणार आहे. आज नवरात्र असल्याने घरोघरी, मंडळांमध्ये देवीची स्थापना केली जाणार आहे. सोबतच घरात घटस्थापना देखील केली जाईल. आता या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाईल. आज पहिली माळ असून, आजचा रंग पिवळा आहे. आज देवी श्री शैलपुत्रीची उपासना केली जाते. नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पीत आहे.

शैलपुत्री देवीचे वर्णन पर्वतांची कन्या म्हणून करण्यात आले आहे. या देवीचे नाव शिलापुत्री या दोन संस्कृत शब्दांनी तयार झालेले आहे. यात ‘शील’ याचा अर्थ खडक आणि ‘पुत्री’ म्हणजे मुलगी. शिला पुत्री कोट्यवधी सूर्य आणि चंद्रांप्रमाणेच सकारात्मकता, आनंद आणि प्रकाश पसरवण्यासाठी ओळखली जाते. देवी सतीने हिमालय कन्येच्या रुपात जन्म घेतला. तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.

शैलपुत्री देवीच्या कपाळावर अर्ध चंद्र आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशुल आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे. शैलपुत्री देवीचे वाहन नंदी असून, शैलपुत्री देवीला वृषभारुढा असेही संबोधले जाते. नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्र दोष नाहीसा होतो, अशी मान्यता आहे.

शैलपुत्री देवीचे वाहन हे गाय आहे. त्यामुळे आजच्या दिवशी अर्थात पहिल्या माळेला देवीला गाईच्या दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. तुम्ही शैलपुत्री देवीला दुधापासून बनवलेली खीर किंवा मिठाई अर्पण करू शकता.

श्री शैलपुत्री देवी कथा

एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे.

Shardiy Navratra

परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.

सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दह‍ी वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले.

आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्‍याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती ‘शैलपुत्री’ या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. ‘शैलपुत्री’ देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

देवी शैलपुत्री मंत्र

वन्दे वांछितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्।।
पूणेन्दु निभां गौरी मूलाधार स्थितां प्रथम दुर्गा त्रिनेत्राम्॥
पटाम्बर परिधानां रत्नाकिरीटा नामालंकार भूषिता॥
प्रफुल्ल वंदना पल्लवाधरां कातंकपोलां तुंग कुचाम् ।
कमनीयां लावण्यां स्नेमुखी क्षीणमध्यां नितम्बनीम् ॥
या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:।
ओम् शं शैलपुत्री देव्यै: नम:।


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.