अमेरिकेत (America) सध्या निसर्गाचा प्रकोप सुरु आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अमेरिकेतील (America) अनेक भागात मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि वादळामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक भागात वीजपुरवठाही खंडित झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये तर वादळ, पाऊस आणि जोरदार हिमवर्षाव, अशा तिहेरी संकटामुळे तापमान घसरलं आहे. अशीच परिस्थिती काही दिवस राहणार असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित झाला असल्यामुळे लाखो नागरिक अंधारात आहेत. काही भागात तर बाहेर प्रचंड बर्फवृष्टी आणि घरात अंधार अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती आणखी बिघडू शकते, त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन आता तेथील नागरिकांना सरकारतर्फे करण्यात येत आहे.
अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियामध्ये मध्यंतरी आलेल्या बॉम्ब या चक्रीवादळामुळे दाणादाण उडवली होती. यानंतर आता कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा हवामान बिघडले आहे. या भागात जोरदार बर्फवृष्टी होत असून हवामान प्रचंड थंड झाले आहे. सध्या कॅलिफोर्नियामध्ये कडाक्याची थंडी, हिमवृष्टी आणि वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉस एंजेलिस परिसरात, 85,000 घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. या जोरदार बर्फवृष्टीचा फटका तेथील वाहतुकीलाही बसला आहे. बर्फवृष्टीमुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बर्फामुळे रस्त्यावर अवघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक मंदावल्यामुळे अनेक भागात आवश्यक वस्तूंची कमतरता जाणवायला सुरुवात झाली आहे. उत्तर कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये विक्रमी थंड तापमानाचा इशारा देण्यात आला आहे. असेच वातावरण पुढच्या आठवड्यात कायम राहणार असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. कॅलिफोर्नियामध्ये बदलते हवामान हे तज्ञांनाही चिंतित करणारे आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये सध्या असलेले थंड- वातावरण आणि वादळ याचा दुर्मिळ घटना असा उल्लेख करत तज्ञांनी अभ्यास सुरु केला आहे. तसेच लॉस एंजेलिसच्या अनेक भागातही सातत्यानं बर्फवृष्टी होत आहे. येथील काही भाग हा कायम सौम्य वातावरण आणि हिरवीगार जंगले यासाठी ओळखला गेला आहे. येथील पाम वृक्षाची जंगले पर्यटकांना आकर्षित करतात. या भागात स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. आता त्याच भागात जोरदार बर्फवृष्टी होऊ लागल्यानं नागरिक आणि तज्ञही अचंबित झाले आहेत. तसेच या बदलत्या हवामानाबाबत काळजीही व्यक्त करण्यात येत आहे. हॉलिवूड या नामफलकावरही आता बर्फ दिसू लागला आहे. गेल्या अनेक वर्षात अशी घटना आपण पाहिली नसलेल्याच्या पोस्ट आता अमेरिकेतील (America) सोशल मिडियावर येत आहेत. या बर्फवृष्टीसह काही भागात वादळी पाऊसही झाला. सोबत विजांचा गडगडाटही पाहायला मिळाला. या मिश्रीत वातावरणामुळे नागरिक चिंतेत आहेत. तसेच प्रशासनही काही ठिकाणी हतबल झाल्याचे दिसले.
=======
हे देखील वाचा : वर्ल्ड बँकेचे होणारे नवे चीफ अजय सिंह बंगा कोण?
=======
अशाच स्वरुपाची बर्फवृष्टी येत्या काही दिवसात होणार असल्यामुळे काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियाचे तापमानही आणखी खाली घसरणार आहे. या बर्फासोबत तीव्र वा-याची वादळेही या भागाला धडक देणार आहेत. या सर्वांमळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. येथील हवामानशास्त्रज्ञांनी कॅलिफोर्नियामध्ये ऐतिहासिक हिमवादळे येत आहेत. बर्फवृष्टी सर्व रेकॉर्ड तोडणार असा इशारा दिला आहे. अमेरिकेत शनिवार आणि रविवार हे पूर्णपणे सुट्टीचे वार असतात. यावेळी नागरिक मोठ्याप्रमाणात बाहेर फिरण्यासाठी जातात. अशावेळी या संभाव्य वादळांमुळे नागरिकांनी घरात रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. पर्वत किंवा जंगलात फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना जोरदार बर्फवृष्टीचा फटका बसू शकतो असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस हे अमेरिकेला (America) वादळी वा-यांना आणि सोबत येणा-या बर्फवृष्टीला तोंड द्यायला तयार व्हावे लागणार आहे.
सई बने