एके काळी उन्हाळा आला की आईस्क्रीमची जी आठवण व्हायची ती आता जेवण केल्यानंतर रात्री ‘कुछ मिठा हो जाये’ अस म्हणून खाण्यात नाही. एक काळ असा होता की आईस्क्रीमवाला गावागावातून सायकलची घंटी वाजवून आईस्क्रीम विकायचा. त्याच्याकडून आईस्क्रीम घेऊन खाण्यात जी मजा होती ती आता एखाद्या आईस्क्रीम पार्लल मध्ये जाऊन महागड आईस्क्रीम खाण्यात नाही.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता उन्हाळाही नाही किंवा कोणाला आईस्क्रीम खायची इच्छा नाही. मग हे क-फॅक्टस वाले मधूनच आईस्क्रिमचे गोडवे का गात असावेत. तर या प्रश्नांचंही उत्तर आम्ही आत्ताच देणार आहोत.
कारण आज आपण अशा व्यक्तिविषयी बोलणार आहोत, की ज्यांचे वडील फळशेती करायचे. पण पोराने मात्र त्याच फळांचा वापर करून संपूर्ण भारताला नॅचरल आईस्क्रीमचे (Natural Ice Cream) वेड लावले. हे आईस्क्रीम नुसते बनवले नाही, तर त्याचा ब्रँड केला. याच ब्रँड आईस्क्रीमच्या ब्रँड मालकाच्या व्यवसायिक वाटचालीबद्दल आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
प्रत्येक भारतीयाला फळापासून बनवलेल्या नॅचरल आईस्क्रीमची चटक लावणारा हा अवलिया म्हणजे रघुनंदन एस. कामथ. (Raghunandan Kamath) कर्नाटकच्या पत्तुर तालुक्यातील मुलकी या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांना सात भावंडे होती. त्यांचे वडील फळशेती करायचे.

१९६६ साली रघुनंदन यांनी मुंबईत आल्यानंतर गोकुळ या नावाने एक लहानसा फूड स्टॉल सुरु केला. याठिकाणी ते आईस्क्रिम, डोसा, इडली विकायचे. १९८३ साली लग्न झाल्यानंतर व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी मुंबईतच फेब्रुवारी १९८४ मध्ये जुहू परिसरात नॅचरल आईसक्रीम या नावाने एक छोटेसे आईस्क्रिम पार्लर सुरु केले.
त्याकाळी आईस्क्रीम ही गोष्ट फक्त मोठमोठ्या श्रीमंत माणसांनाच माहीत होती. त्यामुळे त्यांनी मुंबईत आईस्क्रीम पार्लल उघडून व्यवसायातील पहिली जोखीम पत्कारली होती. पण ते मागे हटले नाहीत.
ते विकत असलेले आईस्क्रीम कोणतेही गारीगार किंवा बर्फाचा गोळा अशातला प्रकार नव्हता. तर त्यांनी आईस्क्रीममध्ये स्वतःचा ब्रँड तयार केला होता. ते फळापासून आईस्क्रीम बनवत होते.
रघुनंदन यांनी सुरुवातीपासूनच आपल्या आईस्क्रिमचा दर्जा उत्तम राहील याची काळजी घेतली होती. त्यांनी फळे, दूध, साखरेपासून उत्तम दर्जाची आईस्क्रिम बनवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांना ग्राहकांची कमी नव्हती.
आईस्क्रिम व्यवसाय भरभरून चालत असल्याने रघुनंदन यांनी आईस्क्रिम बरोबर सुरु असणारा पावभाजीचा व्यवसाय १९८५ ला बंद केला. आणि आपले संपूर्ण लक्ष आईस्क्रीम पार्ललमध्ये घातले.

रघुनंदन यांच्या नॅचरल आईस्क्रीम पार्ललमध्ये सुरुवातीला फक्त आंबा, चॉकलेट, सीताफळ, काजुद्राक्ष, स्ट्रॉबेरी या पाच फ्लेवर्सची आईस्क्रिम मिळायची. पण पुढे जसा व्यवसाय वाढला तसा जुहू मधील सेलिब्रेटी ग्राहकांच्या मागण्या वाढल्या. त्यामुळे रघुनंदन यांनी कोकोनट, जांभूळ, पेरू अशा फ्लेवर्सची एकूण २० वेगवेळी आईस्क्रिम बनविण्यास सुरुवात केली.
रघुनंदन एस. कामथ यांनी मुंबईत अगदी लहानशा आईस्क्रिमच्या दुकानापासून ते वर्षाला ३०० कोटींचा व्यवसाय अशी मोठी झेप घेतली आहे. आजघडीला भारतातील अनेक शहरांमध्ये रघुनाथ कामथ यांची नॅचरल्स आईस्क्रिमची पार्लर्स सर्रासपणे आढळून येतात.
मात्र आज जरी यांचा वर्षाचा ३०० कोटींचा व्यवसाय लोकांना दिसत असला, तरी देखील फळांच्या शेतीपासून ते फळांच्या आईस्क्रीमच्या ‘नॅचरल्स’ ब्रँड पर्यंतचा हा प्रवास वाटतो तितका सोप्पा नाही. ‘नॅचरल्स’च्या या यशामागे रघुनंदन यांची जिद्द, मेहनत आणि चिकाटीही तितकीच मोठी आहे.
– निवास उद्धव गायकवाड