पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 21 जून ते 24 जून दरम्यान अमेरिकेच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यासाठी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. अगदी काही भारतीय हॉटेलमध्ये मोदी थालीही लॉंज केली आहे. दस्तुरखुद्द अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. या दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भारतीयांबरोबर संवाद साधणार आहेत शिवाय अनेक उद्योगपतींबरोबर बोलणार आहेत. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा बघितल्यावर आणि त्यासाठी अमेरिकेत चाललेली तयारी पाहून 2005 हे वर्ष आठवल्याशिवाय राहणार नाही. त्या दरम्यान सर्व जगावर आपली एकहाती सत्ता आहे, असा अभिमान अमेरिकेला होता. त्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेनं बंदी घातली होती. मोदी यांना व्हिसा अमेरिकेनं नाकारला होता. आता त्या घटनेला अठरा वर्ष होऊन गेली आहेत. या अठरा वर्षात संपूर्ण जगाचे राजकारण बदलले आहे. ज्या भारताला युरोप, अमेरिकेत फारसे महत्त्व मिळत नव्हते, तो भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयास आला आहे. कोरोनासारख्या महामारीत या प्रस्थापित देशांनी हात वर केले असतांना भारतानं तयार केलेल्या लसीमुळे जगभरातील लाखो नागरिकांचे प्राण वाचले आहेत. भारतानं अनेक छोट्या देशांना आर्थिक पाठबळ दिलं आहे. पापुआ न्यू गिनी या देशात पंतप्रधान मोदी गेले असतांना विमानतळावरच त्या देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पाया पडून मोदींचे स्वागत केले. जगभरात पंतप्रधान मोदी यांच्या वाढणा-या लोकप्रियतेबरोबर भारतीयांचीही प्रतिष्ठा वाढली आहे. आता 21 जून रोजी पंतप्रधान अमेरिकेच्या दौ-यावर असतील तेव्हा भारताच्या या नव्या विकासात्मक भूमिकेचा नवा अध्याय सुरु होणार आहे.
2005 मध्ये, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा व्हिसा अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी नाकारला होता. पुढे 2014 मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले आणि त्यांना अमेरिकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर भारताचे आणि अमेरिकेचे संबंध नव्यानं प्रस्थापित झाले. आज आपले पंतप्रधान 21 ते 24 जून दरम्यान अमेरिकेच्या दौ-यावर जाणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या या दौ-याच्या सगळ्या कार्यक्रमावर आता खुद्द अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष नजर ठेऊन आहेत. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अमेरिका कुठेच कमी पडालायला नको, असा त्यांचा आग्रह आहे. अमेरिकेच्या या बदलेल्या भूमिकेमुळे जागतिक राजकारणात भारताचे स्थान किती वाढलं आहे, याची कल्पना येते.
पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) स्वागतासाठी अमेरिका सज्ज असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी जाहीर केले आहे. गेल्या महिनाभर अमेरिकेत मोदी यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. पंतप्रधान मोदींची ही ऐतिहासिक भेट असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 23 जून रोजी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. अमेरिकन काँग्रेसला दोनवेळा संबोधित करणारे पंतप्रधान मोदी हे एकमेव भारतीय नेते असतील, त्यामुळे या भाषणासाठी उत्सुक असल्याचेही परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले आहे. मोदी यांच्या स्वागतासाठी स्वतः राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे कुटुंबिय रात्रीच्या भोजनाचे आयोजन करणार आहेत. याशिवाय फर्स्ट लेडी जिल बायडेन या पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करणार आहेत.
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) 21 जून रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. या संपूर्ण दौ-यात पंतप्रधान मोदी यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. कारण अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकनही पंतप्रधान मोदींसाठी 23 जून रोजी भोजन समारंभ आयोजित करणार आहेत.
अतिशय व्यस्त असलेल्या या दौ-याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी व्हाईट हाऊसच्या प्रशस्त लॉनवर भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अमेरिकेतील बहुतांश प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात आले आहे. व्हाईट हाऊसच्या सांगण्यानुसार या समारंभात सहभागी होण्यासाठी एवढी निवेदने आली आहेत की, त्या सर्वांना सामावून घेण्यासाठी या समारंभ स्थानी नव्यानं आसन व्यवस्था करण्याच्या सूचना द्याव्या लागल्या आहेत. व्हाईट हाऊसमधील राज्य मेजवानीसाठी पारंपारिक ठिकाण असलेल्या स्टेट डायनिंग रूमची क्षमता 120 लोकांची आहे. ती क्षमता आता वाढवण्यात येत आहे. दरम्यान, मोदींच्या दौऱ्याबद्दल भारतीय-अमेरिकनांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. वॉशिंग्टन डिसीला होणा-या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तेथील हॉटेलच्या खोल्या आणि विमानाच्या तिकिटांच्या बुकींमध्ये वाढ झाली आहे. हजारो भारतीय-अमेरिकन 22 जूनच्या सकाळी व्हाईट हाऊसमधील ऐतिहासिक स्वागत समारंभात सहभागी होण्यासाठी जमणार आहेत. ‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन’ सारख्या अनेक संस्थांनी न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी भागातील नागरिकांना घेऊन जाणाऱ्या विशेष बस सेवांचे आयोजन केले आहे. 21 जून रोजीही नरेंद्र मोदीं यांचे स्वागत करण्यासाठी शेकडो भारतीय-अमेरिकन व्हाईट हाऊससमोरील लाफायेट स्क्वेअर पार्कमध्ये जमण्याची शक्यता आहे.
========
हे देखील वाचा : गायक जंगकूक चक्क लाईव्ह कार्यक्रमात झोपला…
========
विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेतील भारतीयांनी आत्तापासून विविध उपक्रम चालू केले आहेत. न्यू जर्सीमधील एका रेस्टॉरंटने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मोदी थाली चालू केली आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेतील टॉप-20 कंपन्यांच्या प्रमुखांना भेटणार आहेत. मास्टरकार्ड, एक्सेंचर, कोका-कोला कंपनी, अडोब सिस्टम्स आणि व्हिसा यासह अनेक कंपन्यांच्या प्रमुखांचीही मोदी भेट घेणार आहेत. वॉशिंग्टनच्या जॉन एफ. केनेडी सेंटरमध्ये 1500 हून अधिक प्रवासी भारतीय आणि उद्योगपतींना पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत.
एकूण अमेरिका सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदीमय झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मोदी यांच्या दौ-याबाबत तेथील भारतीय अमेरिकन समुदायाकडून येणारी प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. भारत एक अविकसित देश म्हणून ओळखला जात होता, परंतु गेल्या 10 वर्षांत सर्वकाही बदलले आहे, पंतप्रधान मोदींचे खूप आभार अशा आशयाची मेसेज समाजमाध्यमांवर अमेरिकेतील भारतीयांकडून शेअर करण्यात येत आहे. यावरुनच 2005 चे नरेंद्र मोदी आणि आत्ता 2023 चे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अमेरिकेच्या बदललेल्या धोरणाचा अंदाज करता येतो.
सई बने