Home » भारत २०४७ बद्दल मोदी नक्की काय म्हणाले ?

भारत २०४७ बद्दल मोदी नक्की काय म्हणाले ?

by Team Gajawaja
0 comment
Narendra Modi Speech
Share

१५ ऑगस्टला, म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यदिनच्या दिवशी, संपूर्ण देशाचं लक्ष ज्याकडे असतं ती गोष्ट म्हणजे लाल किल्ला. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते होणारं ध्वजारोहण आणि त्यानंतर होणारं पंतप्रधानांचं भाषण याला अनन्य साधारण महत्व आहे. यावेळीही तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या मोदींनी 11 व्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण केलं. त्यांच भाषण ९८ मिनिटांचं होतं. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठं भाषण होतं.पंतप्रधान मोदींनी ९८ मिनिटांचं भाषण केलं, हे भाषण देउन मोदींनी एक रेकॉर्डही केला आहे. मोदींचे हे भाषण आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण ठरले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पंतप्रधानाने एवढं लांबलचक भाषण केलं आहे. या आधी २०१६ मध्ये स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी सर्वात मोठे भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी ९६ मिनिटांचे भाषण केले होते. तर २०१७ मध्ये त्यांनी केवळ ५६ मिनिटांचे भाषण केलं होतं. हे त्यांचं आतापर्यंतचं सर्वात छोटे भाषण आहे. (Narendra Modi Speech)

पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी, जवाहरलाल नेहरू आणि इंदर कुमार गुजराल हे पंतप्रधान होते ज्यांनी सर्वाधिक प्रदीर्घ भाषण दिलं होतं. जवाहरलाल नेहरू यांनी १९४७ मध्ये ७२ मिनिटांचं भाषण केलं होतं, तर इंदर कुमार गुजराल यांनी १९९७ मध्ये ७१ मिनिटांचं भाषण केलं होतं. इंटरेस्टिंग म्हणजे स्वातंत्र्यदिनी सर्वात लहान भाषण देण्याचा विक्रमही पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नावावर आहे. १९५४ मध्ये स्वातंत्र्यदिनी नेहरू आणि १९९६ मध्ये इंदिरा गांधी यांनी केवळ १४ मिनिटांची भाषण दिली होती. या टायमिंगच्या रेकॉर्डनंतर महत्वाचं ठरलं ते म्हणजे मोदींनी या संपूर्ण भाषणादरम्यान कोणते शब्द सर्वाधिक वेळा उच्चारले. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काही शब्दांचा सर्वाधिक वापर केला. यामध्ये ६१ वेळा ‘देश’ आणि ५९ वेळा ‘भारत’’ शब्द वापरण्यात आला. ९८ मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सेक्युलर सिव्हिल कोड, सुधारणा, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार आणि वैद्यकीय शिक्षण तसेच नवीन शैक्षणिक धोरण यासारख्या मुद्यांचाही उल्लेख केला. (Narendra Modi Speech)

मोदींच्या भाषणातील एका मुद्याची सर्वाधिक चर्चा होत आहे, तो मुद्दा म्हणजे सेक्युलर सिव्हिल कोड. मुस्लिम पर्सनल लॉ काढून टाकण्यासाठी समान नागरी संहिता लागू करण्याच्या भाजपच्या मागणीपासून थोडं लांब जात मोदींनी सेक्युलर सिव्हिल कोडचा उल्लेख केला. “सुप्रीम कोर्टाने भारतातील समान नागरी संहिता (यूसीसी) वर वारंवार चर्चा केली आहे. आपल्याकडे असलेला सिव्हिल कोड हा सांप्रदायिक सिव्हिल कोड आहे, हे खरे आहे. हा भेदभावावर आधारित आहे. अशावेळी आपल्या संविधान निर्मात्यांची संकल्पना पूर्ण करणं हे आपले कर्तव्य आहे,’’ अस पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींच्या युनिफॉर्म सिव्हिल कोड ऐवजी सेक्युलर सिव्हिल कोड म्हणण्याला जाणकारांनी विशेष महत्व दिलं आहे. कारण जेव्हा जेव्हा भाजपने युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्याची गरज व्यक्त केली, तेव्हा भाजपला यूसीसी चा एकमेव उद्देश हा मुस्लिम समाजाच्या विवाह आणि वारसासारख्या प्रथांमध्ये गाडा आणणे आहे, असा समाज घेतला गेला. अशावेळी मोदींनी ‘सेक्युलर’ हा विरोधकांचाच शब्द वापरून युनिफॉर्म सिव्हिल कोड एका नव्या रूपात लोकांपुढे मांडला आहे. थोडक्यात, विरोधकांची भाषा वापरून त्यांच्यावरच निशाणा साधला आहे. (Narendra Modi Speech)

यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे वन नेशन, वन इलेक्शनचा. लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर बहुमतासाठी कमी पडली असले तरी आपण आपले राजकारण बदलणार नाही, असा स्पष्ट इशारा देत मोदींनी पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचं आवाहन केलं. या कल्पनेच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राम नाथ कोविंद समितीने यासाठी चांगली शिफारस केली असल्याचं मोदींनी निदर्शनास आणून दिलं. “वारंवार होणाऱ्या निवडणुका देशासमोर समस्या निर्माण करत आहेत. निवडणुकांशी धोरणं आणि विकास काम जोडली जात आहेत. याबाबत चर्चाही झाली आहे. एक राष्ट्र, एक निवडणूक महत्त्वाची आहे. मी राजकीय पक्षांना आणि संविधान समजून घेणाऱ्यांना आवाहन करतो की आपण एका राष्ट्र, एका निवडणुकीकडे वाटचाल केली पाहिजे,” असे पंतप्रधान म्हणाले.

मात्र, कोविंद समितीच्या अहवालाला एकाचवेळी निवडणुका घेण्याचा आधार मानला, तर १८ व्या लोकसभेत एकाचवेळी निवडणुका घेणे शक्य होणार नाही. समितीने म्हटलं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर संसदेच्या पहिल्या दिवशी अध्यक्षीय अधिसूचना येणं आवश्यक आहे ज्यावेळी लोकसभेची शेवटची तारीख ठरवली जाईल. मात्र असं घडलेलं नाही. (Narendra Modi Speech On Red Fort) मोदींच्या भाषणातील तिसरा महत्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे महिलांची सुरक्षा. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा मोदींनी संदर्भ घेतला आणि सांगितले की, महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना राज्य सरकारने त्वरित कारवाई केली पाहिजे.“आमच्या महिलांवर अत्याचार होत आहेत. लोकांमध्ये राग आहे आणि तो मी अनुभवू शकतो. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर त्वरीत चौकशी होऊन शिक्षा व्हायला हवी. एखादी घटना घडली की बातम्या खूप येतात, पण गुन्हेगारांना शिक्षा झाल्याची चर्चा होत नाही. त्यामुळे भीती नाही. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये भीतीची भावना निर्माण करण्याची गरज आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या या भाषणात भ्रष्टाचारावर ही बोलले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत, तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत जामिनावर बाहेर आहेत. सरकार केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत आहे, असा आरोप होत आहे. याचा समाचार घेत मोदींनी सांगितलं की, जनता भ्रष्टाचाराला कंटाळली आहे आणि त्यांनी या विरुद्ध युद्ध सूरु केल्याचं म्हटलं आहे. ‘’प्रत्येक नागरिक भ्रष्टाचाराला कंटाळला आहे. म्हणून त्यावर आपण युद्ध पुकारलं आहे आणि त्याची किंमत मला चुकवावी लागली आहे, पण राष्ट्रासमोर कोणतीही किंमत मोठी नाही. भ्रष्टाचाऱ्यांविरुद्धचा माझा लढा सुरूच राहील” असे ते म्हणाले. बदला घेण्यासाठी एजन्सींचा गैरवापर करून राजकीय विरोधकांचा पाठलाग केल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना मोदी म्हणाले, “कोणी कल्पना करू शकतो का की काही लोक दिवसाढवळ्या भ्रष्टाचाराचं समर्थन करत आहेत? हे एक मोठे आव्हान आहे.” (Narendra Modi Speech)

यानंतर पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या मुद्याचा देखील उल्लेख केला. “मला आशा आहे की बांगलादेशमध्ये लवकरच परिस्थिती सामान्य होईल. बांगलादेशातील हिंदू आणि तेथील अल्पसंख्याक सुरक्षित असावेत, अशी आपल्या १४० कोटी जनतेची इच्छा आहे. आमच्या शेजारी देशांनी शांतता आणि आनंदाच्या मार्गावर चालावं अशी आमची इच्छा आहे. आम्ही बांगलादेशचे हितचिंतक राहू,” असं पंतप्रधान म्हणाले.या सर्व महत्वाच्या मुद्यांसोबत इतर अनेक मुद्यांनाही मोदींनी हात घातला. ‘विकसित भारत २०४७’ फक्त शब्द नाही, यामागे प्रचंड मेहनत सुरू आहे. प्रत्येक देशवासीयाचं स्वप्नं त्यात  प्रतिबिंबित होत आहेत. तरूण असोत, वृद्ध असोत, गावातील लोक असोत, शहरवासी असोत, शेतकरी असोत, आदिवासी असोत, दलित असोत, महिला असोत, प्रत्येकाची स्वप्नं ‘विकसित भारत २०४७’मध्ये असतील. त्यावेळी देश विकसित भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. यासाठी कुणी कौशल्य भांडवल तयार करण्याचा सल्ला दिला, कुणी भारताला उत्पादन केंद्र बनवण्याचा सल्ला दिला, कुणी विद्यापीठे जागतिक बनवण्याची सूचना केली आहे. आपली कौशल्ये ही तरुण जगाची पहिली पसंती बनली पाहिजे, असे मोदींनी सांगितलं.

=========

हे देखील वाचा :  लाल किल्ल्यावरच का केले जाते ध्वजारोहण?

========

त्याचबरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही ‘वोकल फॉर लोकल’चा मंत्र दिला. आज मला आनंद होत आहे की व्होकल फॉर लोकल हा आर्थिक व्यवस्थेचा नवा मंत्र बनला आहे. प्रत्येक जिल्ह्याला आपल्या उत्पादनाचा अभिमान वाटू लागला आहे. आता एक जिल्हा एक उत्पादन असे वातावरण तयार केले जात आहे. थोडक्यात मोदींनी त्यांच्या भाषणात सर्वच ज्वलंत मुद्यांवर देशाची इथून पुढे कशी वाटचाल असे हे स्पष्ट केलं. (Narendra Modi Speech)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.