हिंदू धर्मामध्ये भगवान शंकराला खूपच महत्व आहे. सृष्टीची निर्मिती ब्रह्मा देव करतात, तिचे रक्षण विष्णु भगवान करतात तर याच सृष्टीचा संहार शिव शंकर करतात. असे हे त्रिदेव या सृष्टीला चालवत असल्याची मान्यता आहे. यातही भगवान शिव शंकराची आराधना करणारे आणि त्यांना मानणारे अगणित लोकं या जगात आहे. सध्या महिन्यांचा आणि सणांचा राजा अशी ओळख असलेला श्रावण महिना सुरु आहे.
श्रावण महिना हा पूर्णपणे शंकराला समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान शंकराची मनोभावे आराधना आणि पूजा केली जाते. त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेऊनच दिवसाची सुरुवात करण्याचे अनेकांचे प्रयत्न असतात. या महिन्यात शंकराची मंदिरे देखील अधिक काळ खुली असतात. आपण नेहमी मंदिरात जातो तेव्हा किंवा जेव्हा जेव्हा शंकराच्या मंदिरात जातो तेव्हा एक गोष्ट पाहिली असेल. भगवान शंकराच्या पिंडीपुढे किंवा मूर्तीपुढे नंदी कायम असतो.
भगवान शंकराचे वाहन म्हणून नंदीची ओळख आहे. हा नंदी कायम देवासोबत असतो. सनातन धर्मात भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीलाही देवाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळेच नेहमी नंदी हा शिवाभिमुख मंदिरामध्ये असतो. नंदी भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. नंदी हा शिवाचा आवडता भक्त आहे. शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो. त्यामुळे नेहमी मंदिरात जाताना नंदीची पूजा, दर्शन आधी घेऊन मगच देवाकडे जाण्याची पद्धत आहे.
पौराणिक कथांनुसार, भगवान शिव नेहमीच त्यांच्या ध्यानात लीन असायचे. भगवान शिवाच्या ध्यानात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये, अडथळा येऊ नये म्हणून नंदी नेहमीच भगवान शंकराची सेवा करत असत. त्यांच्या तपश्चर्येदरम्यान जो कोणी भगवान शिवांना भेटायला यायचा, तो नंदीच्या कानात त्यांचे काम, मागणी किंवा इच्छा सांगत असे. नंदीच्या कानात भक्तांनी सांगितलेले शब्द थेट भगवान शिवापर्यंत नंदी अगदी अचूक पद्धतीने पोहचवायचा आणि भगवान शिव शंकर ते सर्व ऐकून ते पूर्ण करायचे.
नंदी महाराज हे भगवान शंकराच्या सर्वात आवडत्या गणांपैकी सर्वोच्च गण मानले जातात. धार्मिक मान्यतांनुसार, नंदी हा द्वारपाल सेवक म्हणून भगवान शिवाच्या सेवेत कायम असतात. नंदीच्या कानात एखादी इच्छा सांगितल्याने ती थेट भोलेनाथापर्यंत पोहोचते, अशी एक मान्यता आहे. शास्त्रातही याचे वर्णन केले आहे. मात्र आपली मनातली इच्छा नक्की नंदीच्या कोणत्या कानात सांगायची आणि कशी सांगायची याबद्दल अनेकांना आजही जास्त माहिती नसेल. चला जाणून घेऊया याचबद्दल.
सर्व प्रथम भगवान शंकराची मनोभावे पूजा करा. माता पार्वती असेल तर त्यांची देखील पूजा करा. तुपाचा दिवा लावून ठेवा. त्यानंतर नंदीला हळद कुंकू, पाणी, फुले आणि दूध अर्पण करावे. तुपाचा दिवा लावून आणि अगरबत्ती पेटवून नंदीची आरती करावी. तसे पाहिले तर नंदीच्या कोणत्याही कानात इच्छा बोलता येते. मात्र तरीही नंदीच्या डाव्या कानात इच्छा बोलणे अधिक महत्त्वाचे आणि चांगले मानले जाते.
======
हे देखील वाचा : बद्धकोष्ठता ते पचनासंदर्भातील समस्यांवर रामबाण उपाय जायफळ
======
नंदीच्या कानात आपली इच्छा बोलण्यापूर्वी “ओम” हा शब्द उच्चारावा. असे केल्याने तुमची इच्छा भगवान शंकरापर्यंत लवकर पोहोचते असे मानले जाते. नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार असाल ते इतर कुणालाही ऐकू येणार नाही, याची काळजी घ्या. आपली इच्छा नंदीच्या कानात अगदी हळू मात्र स्पष्टपणे सांगा.
आपली इच्छा सांगताना ओठ तुमच्या दोन्ही हातांनी लपवावेत जेणेकरून इतर कोणीही तुम्हाला तुमची इच्छा सांगताना पाहू शकणार नाही. ही इच्छा सांगताना एक दक्षता घ्या, कोणाचेही नुकसान होईल, कुणाबद्दल वाईट अशी कोणतीही इच्छा मागू नये. तसेच इच्छा मागतान चुकीचे वागू नये, नंदीच्या कानात कुणाबद्दलही वाईट बोलू नये. आपली इच्छा सांगून झाल्यावर ‘नंदी महाराज, आमची इच्छा पूर्ण करा’ असे म्हणावे. एकावेळी एकच इच्छा सांगावी.