श्रीकांत नारायण
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी ‘स्वबळाची भाषा’ केल्याने गेल्या काही दिवसापासून आघाडी सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे ”आघाडी सरकार आघाडीतील मित्रपक्षांच्या मतभेदांमुळेच कोसळणार” असे अधूनमधून भाकीत करणाऱ्या राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. कधी एकदा हे आघाडी सरकार कोसळते आणि भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर येते असे भाजप नेत्यांना झाले आहे.
आघाडी सरकारमधील मित्रपक्षांच्या नेत्यांपैकी कोणी असे काही वादग्रस्त विधान केले की, भाजप नेत्यांना आशेचा किरण दिसतो मात्र नंतर तेथे पुन्हा अंधारच असल्याचे त्यांना कळून येते. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत ‘स्वबळाची भाषा’ केल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नंतर आघाडी सरकारचे प्रणेते शरद पवार यांनाही त्याची दखल घ्यावीशी वाटली. त्यामुळे नानाभाऊ चांगलेच चर्चेत आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत ‘स्वबळाची’ रेवडी उडविली. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही ‘स्वबळावर’ जेवू. जणू काही सध्याचे आघाडी सरकार चालविताना तीन मित्र पक्षातील नेते एकमेकांना घास भरवीत जेवण करीत असतात असेच कोणालाही वाटेल.

राष्टवादीचे नेते शरद पवार यांनी सुरुवातीला, “पटोले यांच्यासारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी बोलणे उचित होणार नाही” असे सांगून पटोले यांच्या विधानातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर त्यांनी त्याची गंभीर दखल घेताना काँग्रेस नेत्यांनाच ‘खरे काय ते सांगा, स्वबळाची भाषा ही नानांची स्वतःची आहे की, हायकमांडच्या आदेशानुसारच ते अशी भाषा बोलत आहेत’ हे स्पष्ट करण्याची सूचना केली. यावरून नानांच्या ‘स्वबळावरून’ मित्र पक्षांच्या पोटात चांगलीच ‘कळ’ आल्याचे दिसून आले.
नानांनी ‘स्वबळाची’ भाषा करताना पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘स्वबळाची’ भाषा करण्यामागचे नेमके कारण तेच असावे. त्याच्या पुष्ट्यर्थ नानांनी, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फार मोठा धोका देण्यात आला होता असे सांगितले.
आणि नाना म्हणतात ते बरोबरच आहे. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाबरोबर असलेली युती अचानक तोडली होती आणि त्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यामुळे त्यांचे आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाही. वास्तविक त्याच्या काही महिने आधीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी लाटेत’ दोन्ही काँग्रेसची धूळधाण झाली होती. महाराष्ट्रातून काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचे चारच खासदार निवडून आले होते. बाकीचे सर्व खासदार भाजप-सेना युतीचे होते.
हा ‘निकाल’ लक्षात घेता त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत खरे तर दोन्ही काँग्रेस पक्षांची युती होणे अत्यावश्यकच होते मात्र त्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जागा-वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेनेशी असलेली युती तोडली आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

भाजप – शिवसेना युती तुटताच तिकडे शरद पवार यांनीही या निवडणुकीपर्यंत असलेली दोन्ही काँग्रेस पक्षांची युती तोडली आणि त्यानंतर दोन्ही काँग्रेस पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्या. पवारांच्या या निर्णयामागे नेमके कोणते गणित होते हे त्यावेळी कोणाला कळले नाही मात्र नंतर त्याचा उलगडा झाला आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वासार्हतेबद्दल त्यावेळीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
कारण त्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. आणि सुरुवातीला जेंव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले त्यावेळी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस सरकारला बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सुरुवातीचे काही महिने फडणवीस सरकार तरले आणि नंतर भाजपने शिवसेनेशी पुन्हा युती करून भाजप-सेना युतीचे भक्कम सरकार सत्तेवर आले. ते पुढे पाच वर्षे टिकले.
राजकारणातील शरद पवारांची विश्वासार्हता हा अनेकवेळा चर्चेचा प्रश्न झाला आहे. त्यांच्या मनात नेमके काय चालू असते याचा अनेकांना अनेकवेळा थांगपत्ता लागत नाही. कधी ते मोदी सरकारवर कडक टीका करतात तर कधी तशीच वेळ आली तर त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे भासवितात. . त्यामुळे त्यांच्याबरोबर असणाऱ्यांचा नेहमीच संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम दूर होण्यासाठीच कदाचित नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केली असावी. याशिवाय नाना पटोले यांनी अलीकडेच प्रदेश काँग्रेस अध्यपदाची सूत्रे घेतली आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे.

पटोले यांना राज्यात काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे. त्या पक्षात चैतन्य निर्माण करावयाचे आहे. म्हणून त्यांनी स्वबळाची भाषा केली असावी. अर्थात त्यांचे हे धोरण महाविकास आघाडीतील ऐक्याला तडा देणारे आहे असे आघाडीतील मित्र पक्षांना वाटू शकते. कारण भाजपविरोधात एकत्र आलेल्या तिन्ही पक्षांनी ही आघाडी आगामी निवडणुकीतही टिकविली तरच या आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नाना पटोले यांना आघाडीतूनच ‘टार्गेट’ केले जात आहे.
अर्थात पक्षश्रेष्ठींच्या आशिर्वादाशिवाय नाना असे विधान करणार नाहीत हेही तितकेच खरे. मात्र यानिमित्ताने त्यांनी थेट शरद पवार यांच्याशीच ‘पंगा’ घेतला आहे. त्यामुळे त्यांनाच सावध राहण्याची गरज आहे. कारण नानांच्या स्वबळाच्या भाषेची जर शरद पवार यांनी फारच गंभीर दखल घेतली तर ते नानांचेच ‘बळ’ कसे कमी होईल याचा प्रयत्न केल्याखेरीज राहणार नाहीत. पवार यांच्याशी पंगा घेतलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी यापूर्वी त्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आक्रमक नानांना सावध राहण्याची गरज आहे. नाही तर स्वबळाची भाषा त्यांच्याच अंगलट येऊ शकते.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.