नेकेड फेस्टिव्हल (Naked Festival) असे शब्दच बोलले तरी अनेकांच्या भुवया उंचावतील. पण जपानमध्ये हाच नेकेड फेस्टिवल गेल्या हजार वर्षापासून साजरा होत आहे. शरीरावर अगदी कमी कपडे घातलेले पुरुष एका बेटावर हजारोंच्या संख्येनं एकत्र येतात आणि आपल्या देवतेची पुजा करतात. जपानमध्ये साजरा होणारा हा नेकेड फेस्टिवल (Naked Festival) करोनाच्या कारणामुळे तीन वर्ष टाळण्यात आला होता. मात्र आता येत्या फेब्रुवारीमध्ये हा नेकेड फेस्टिवल साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी काही महिलांनीही मागणी केली आहे. शेतातील धान्य तयार झाल्यावर त्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी सुरु झालेला हा नेकेड फेस्टिवल आता जपानची ओळख बनला आहे. यावर्षी त्याच महोत्सवामध्ये पहिल्यांदाच महिलांना ठराविक अंतरापर्यंत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळेही येत्या फेब्रुवारीमध्ये जपानमध्ये होणार हा नेकेड फेस्टिवल अनोखा ठरणार आहे.

जगात असे अनेक सण आहेत, की ते अनोखे समजले जातात. या सर्वांत जपानचा नेकेड फेस्टिवल (Naked Festival) अग्रस्थानी आहे. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण कमीत कमी कपडे घालून हा सण साजरा होतो. जपानच्या होन्सू बेटावर साज-या होणा-या या महोत्सवाला धार्मिकही महत्त्वही आहे. त्यात हजारो तरुण सामिल होतात. कडाक्याच्या थंडीमध्ये अंगावर कमी कपडे घालून विशिष्ट पूजा आणि मग एकमेकांच्या कुटुंबासाठीची प्रार्थना हा या नेकेड फेस्टिवलचा भाग असतो. गेल्या 1250 वर्षांपासून हा फेस्टिवल जपानमध्ये साजरा होतोय. दरवर्षी यातील सहभागी तरुणांची संख्या वाढत आहे. यावर्षी तर या फेस्टिवलमध्ये काही प्रमाणात महिलांनाही सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
नेकेड फेस्टिवलला (Naked Festival) जपानमध्ये हडाका मत्सुरी या नावानेही ओळखले जाते. होन्सू बेटावरील इनाझावा शहरातील कोनोमिया श्राइन येथे हा उत्सव होतो. 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या महोत्सवात सुमारे 10 हजारहून अधिक जपानी नागरिक सहभागी होणार आहेत. अगदी काही दिवसांवार आलेल्या या महोत्सवासाठी आता तिथे मोठ्या प्रमाणात तयारी सुरु झाली आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या शनिवारी सईदाईजी कानोनियन मंदिरात या महोत्सवानिमित्त सहभागी एकत्र येतात. या उत्सवात सहभागी झालेले लोक कमीत कमी कपडे घालतात. फंडोशी नावाचे जपानी पांढ-या रंगाचे मोजे घालून येणे हे यात शुभ मानले जाते. त्याव्यतिरिक्त अगदी कमी कपडे घातलेले जपानी पुरुष यात सहभागी होतात.
मात्र गेल्या काही वर्षापासून या नेकेड फेस्टिवलमध्ये (Naked Festival) सहभागी होण्यासाठी महिलांचा आग्रह वाढत आहे. महिलांच्या वाढत्या मागणीमुळे मंदिरातील बांबूच्या पूजेत सहभागी होण्यासाठी 40 महिलांना आयोजकांनी परवानगी दिली आहे. गेल्या 1250 वर्षापासून साज-या होणा-या या उत्सवातील हा सर्वात मोठा बदल आहे.
जपानमध्ये या नेकेड फेस्टिवलला (Naked Festival) धार्मिक महत्त्व आहे. यात सहभागी होणा-या पुरुषांना देवपुरुष म्हणण्यात येते. स्थानिक भाषेत त्याचा उल्लेख शिन-ओटोको असा होतो. हे देवपुरुष दरवर्षी अंगावर अगदी कमी कपडे, घालून मंदिराकडे पायी प्रवास करतात. त्या दरम्यान बर्फावरुनही चालावे लागते. हे देवपुरुष बर्फाच्या पाण्यात आंघोळही करतात. थंडी लागू नये म्हणून स्थानिक तांदळाच्या वाईनचे यावेळी सेवन केले जाते. ही तांदळाची वाईन औषधी मानली जाते, आणि त्यामुळे थंडीपासूनही बचाव होतो. यावेळी हे सर्व देवपुरुष रिबिनने सजवलेले उंच बांबू सोबत घेऊन चालतात. त्यावर दिवे लावलेले असतात. ही एकप्रकारे तिर्थयात्राच मानण्यात येते.
============
हे देखील वाचा : लग्नसोहळ्यासाठी लेहंगा निवडताना या चुका करणे टाळा
============
नेकेड फेस्टिवल (Naked Festival) म्हणजेच हाडाका मत्सुरी हा तयार झालेल्या पिकाच्या भल्यासाठी होणारा सणही मानला जातो. तयार झालेल्या पिकाची कापणीही यादरम्यान करण्यात येते. सर्व सहभागी तरुण दुपारी शेतात जाऊन पिकाची कापणी करतात. तरुणांमध्ये शेतीबाबत आस्था निर्माण व्हावी, तरुणांनी आपल्या मातीबरोबर कायम जोडलेले रहावे, हाही यामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येते. उत्सवाच्या शेवटी सहभागी तरुण मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतात. थंड पाण्यानं अंघोळ करुन मंदिरात प्रवेश करतात. मंदिराचे पुजारी दोन भाग्यवान बांबूच्या काठ्या तरुणांच्या दिशेने टाकतात. या बांबुच्या काठ्या भाग्यवान समजल्या जातात. त्या शोधण्यासाठी हजारो तरुण धडपडतात. यावेळी काही जखमीही होतात. मात्र काठ्या मिळालेले तरुण भाग्यशाली समजण्यात येतात. गेल्या हजार वर्षाहून अधिक काळ जपानमध्ये हा नेकेड फेस्टिवल साजर होत आहे. यंदा त्यात काही प्रमाणात महिलांना सहभागी होण्यासाठी परवानगी दिली आहे.
सई बने
