Home » अनेक रहस्यांनी भरलेले नागवासुकी मंदिर 

अनेक रहस्यांनी भरलेले नागवासुकी मंदिर 

by Team Gajawaja
0 comment
Nagvasuki Mandir
Share

भगवान शंकराचा निस्सिम भक्त आणि देवता,  ज्याला असुरांनी मंदारांचल पर्वताला दोरीप्रमाणे बांधून मंथन केले त्या नागवासुकीचे प्रयागराज (Nagvasuki Mandir) येथील मंदिर अनेक रहस्यांनी भरलेले आहे. या श्री नागवासुकीच्या मंदिराला (Nagvasuki Mandir) कोणी बांधले हे रहस्य आहे. शिवाय रोज रात्री आरतीनंतर मंदिर बंद करण्यात येते.  त्यानंतर या मंदिरात विश्राम करण्यासाठी स्वतः नागवासुकी येत असल्याचा विश्वास येथील पुजा-यांना आहे.  या मंदिरातील नागवासुकीची (Nagvasuki Mandir) मुर्ती नष्ट करण्याचा औरंगजेबानंही प्रयत्न केला होता.  या मुर्तीवर औरंगजेबानं तलवार उगारली होती. पण तेव्हा नागवासुकीचे भव्य रुप पाहून तो घाबरला, अशी आख्यायिका सांगण्यात येते. आता या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः सोमवारी नागवासुकीचे दर्शन घेणे पवित्र मानले जाते. शिवाय या मंदिरातील श्री नागवासुकीची मुर्ती सजिव वाटेल अशी आहे.  त्यामुळे या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहावयास मिळते.  

कद्रूच्या पोटी जन्मलेला महर्षी कश्यप यांचा मुलगा म्हणजे वासुकी हा प्रसिद्ध सर्प. वासुकी हा भगवान शंकराचा निस्सीम भक्त असल्याने तो कायम शंकराच्या जवळ असायचा. समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी हा पर्वताला बांधण्यासाठी दोरीचे काम करत होता. वासुकीचा मोठा भाऊ शेषनाग आहे.  तर वासुकीचा लहान भाऊ म्हणून सर्पराज तक्षकाची ओळख आहे.  याच नागवासुकीचे जगातील एकमेव पुरातन मंदिर उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात आहे. हे नागवासुकी मंदिर प्रयागराज येथील दारागंजजवळील गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. वर्षभर या मंदिरात भारतातील आणि भारताबाहेरीलही भक्तांची वर्दळ असते. (Nagvasuki Mandir)

मात्र आता श्रावण महिन्यात या नागवासुकीचे दर्शन केल्यानं सर्व दोष दूर होतात, अशी भक्तांची भावना आहे.  त्यामुळे सध्या हे नागवासुकी मंदिर  देश- विदेशातील भाविकांनी फुलून गेले आहे.  प्रयागराजमधील नागवासुकी मंदिर (Nagvasuki Mandir) खूप प्राचीन आहे. हे मंदिर कधी बांधले गेले याचा लिखित पुरावा नाही.  या  नागवासुकी मंदिरात नागांच्या राजाची पूजा केली जाते. नागपंचमीला येथे जत्रा भरते. या नागवासुकी मंदिराचे वैभव बघण्यासाठी हजारो भक्त मंदिरात येतात.  नागवासुकीचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते, अशीही भाविकांची श्रद्धा आहे.  सध्या श्रावण महिन्यानिमित्त या मंदिर परिसरात मोठी जत्रा भरली आहे.  

हे नागवासुकी मंदिर (Nagvasuki Mandir) त्याच्या अनोख्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.  यात  नागवासुकीची सजीव मूर्ती आहे.  जगातील ही अशाप्रकारची एकमेव मुर्ती असल्याचे सांगण्यात येते.  मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या जवळ लक्ष्मीचे प्रतिक असलेले भव्य कमळ आहे.  तसेच दोन हत्तीही आहेत.  या मंदिरातील कलाकुसर आकर्षक आहे.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंदिरातील नागवसुकी देवतेची भव्य मुर्ती.  हे मंदिर कधी बांधले आणि किती वेळा बांधले याचा लिखित पुरावा नाही. मात्र आता असलेल्या या नागवासुकी मंदिराचा मराठा शासक श्रीधर भोंसले यांनी जिर्णोद्धार केल्याची माहिती आहे.  पेशव्यांनीही या मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात दान दिल्याचे सांगितले जाते.  गंगेच्या काठावर असलेल्या या नागवासुकी मंदिरात (Nagvasuki Mandir) स्वामी दयानंद सरस्वती यांनी साधना केल्याचे सांगण्यात येते.  

या नागवासुकी मंदिरात (Nagvasuki Mandir) विशेष पूजा केल्याने कालसर्प दोष शांत होतो आणि माणसाच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. नागवासुकी मंदिरातील मुख्य मुर्ती दहाव्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते. या मंदिरात कावड यात्रेकरुही मोठ्या प्रमाणात येतात.  गंगा नदीतील पाणी कावडीमधून आणून नागवासुकीचा अभिषेक करण्यात येतो.  नागवासुकी हा भगवान शंकराचा निस्सिम भक्त होता.  त्यामुळे त्याची पूजा केल्यानं भगवान शंकरही प्रसन्न होतात, अशी भावना कावडी यात्रेकरुंची आहे.  

या मंदिराबाबत पौराणिक कथा सांगण्यात येते.  त्यानुसार ब्रह्मदेवाचा पुत्र मानस, याने या मंदिराची स्थापना केली. मंदिराचे वर्णन पुराणातही आहे. पौराणिक कथांनुसार, जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा देवता आणि असुरांनी नागवासुकीला मंदारांचल पर्वताला दोरीप्रमाणे बांधून मंथन केले. मंथनादरम्यान वासुकी नागाची सर्व त्वचा सोलून गेली.  तो खूप जखमी झाला.  त्याची अवस्था पाहून भगवान विष्णूंनी त्याला प्रयागराजला जाण्यास सांगितले आणि नदीत स्नान करून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार वासुकीनाग प्रयागराजला आले आणि दारागंजच्या ईशान्य टोकाला राहू लागले. (Nagvasuki Mandir) 

========

हे देखील वाचा : खोल गुहेत असलेल्या शिवमंदिराचा महिमा…

========

प्रयागराजमध्ये नागवासुकीच्या वास्तव्यादरम्यान, वाराणसीच्या दिवोदास जी महाराजांनी त्यांना प्रसन्न करण्यासाठी 60 हजार वर्षे तपश्चर्या केली. पूर्ण बरा झाल्यावर नागवासुकी येथून निघू लागला तेव्हा देवतांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर देवतांनी वासुकी नागाला तिथेच राहण्यासाठी सांगून  प्रयाग स्नानासाठी येणाऱ्या भाविकांनी त्याचे दर्शन घेतल्यास सर्व कष्ट दूर होतील असे वरदान दिले.  दुसर्‍या एका आख्यायिकेनुसार गंगा आकाशातून जमिनीवर अवतरली तेव्हा जोरदार प्रवाहामुळे तिचे पाणी पाताळात पोहोचले.  त्यातून नागवासुकीचे या स्थानावर आगमन झाले.  या मंदिराबाबत आजही अनेक रहस्ये आहेत. मंदिरात रोज आरती केल्यानंतर नागवासुकींसाठी पलंग तयार केला जातो. त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येतात. सकाळी दरवाजे उघडल्यावर हे अंथरुण अस्ताव्यस्त पडलेले असते. त्यामुळे येथे  दररोज नागवासुकी विश्रांतीसाठी येतात, अशी मान्यता आहे.  मंदिरात वर्षभर नागवासुकीचे दर्शन घेता येत असले तरी नागपंचमीच्या दिवशीच फक्त देवाला दूध अर्पण करता येते.  मंदिर वर्षभर भाविकांसाठी खुले असते.  नागवासुकीचे आधी दर्शन घेऊन भक्त काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतात. 

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.