महाराष्ट्रातील राजकीय घराण्याचा विचार केला तर प्रत्येकाच्या तोंडून पहिले नाव येते ते म्हणजे ठाकरे घराण्याचे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ठाकरे घराण्याने जसे महाराष्ट्राला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दिले तसेच याच ठाकरे घराण्याने महाराष्ट्राला एक शास्त्रशुद्ध संगीतकार सुद्धा दिला होता. पण राजकारणाच्या धावपळीत या संगीतकाराची गोष्ट इतिहासात मागे पडू लागली आणि ठाकरे घराण्यातील या कलाकाराचे नाव आपसूकच काळाच्या ओघात विस्मृतीत गेले.
आज त्याच कलाकाराची अर्थात बाळासाहेब ठाकरे यांचे भाऊ संगीतकार श्रीकांत ठाकरे (Shrikant Thackeray) यांची जयंती. त्यानिमित्त आज आपण श्रीकांत ठाकरे यांचा लहानपणापासून ते एक उत्तम व्यंगचित्रकार, पत्रकार आणि संगीतकार हा प्रवास नक्की कसा होता हे जाणून घेणार आहोत.
मराठी चित्रपटात प्रथम गझल आणणारे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा जन्म २७ जून १९३० रोजी झाला. ते एक उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार, संगीतकार, वादक, उर्दूचे अभ्यासक आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते.
संगीताची आवड त्यांना लहानपणापासूनच लागली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा मोठा रंजक आहे. श्रीकांत ठाकरे तेव्हा दीड वर्षांचे होते. ठाकरे कुटूंबीय दादरच्या मिरांडा चाळीत राहायचे. त्यांच्या घरी एका नाटक कंपनीची तालिम चालायची.
तेव्हा लहानग्या श्रीकांत ठाकरेंना फिट येण्याचा त्रास व्हायचा. अशीच एकदा श्रीकांतला फिट आल्यावर प्रबोधनकारांनी नाटक कंपनीच्या व्हायोलिन वादकाला राग भैरवचा आलाप वाजवण्यास सांगितले आणि आश्चर्यच घडले.
आईच्या मांडीवर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या श्रीकांतला शुद्ध आली. या चमत्करावरून डॉक्टर देखील अचंबित झाले. तेव्हा पासून श्रीकांत ठाकरेंची संगीताशी नाळ जोडली गेली ती कायमचीच.
श्रीकांत ठाकरेंना संगीताचा एवढा नाद होता, की त्यांनी आपल्या पत्नीचे नाव मधुवंती, मुलीचे नाव जयवंती आणि मुलाचे नाव स्वरराज असे ठेवले होते.
पुढे १३ ऑगस्ट १९६० रोजी ठाकरे बंधूंनी मिळून ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाला जन्म दिला. मार्मिक मधून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वतःच्यातला व्यंगचित्रकार, लेखक आणि पत्रकार दाखवुन दिला. मार्मिक मधून मराठी माणसाला केलेल्या ‘वाचा व थंड बसा’ आणि ‘वाचा व उठा’ अशा आवाहनातून १९ जून १९६६ रोजी शिवसेना जन्माला आली. पण या सर्वात श्रीकांत ठाकरेंनी स्वतःला राजकारणापासून अलिप्त ठेवले.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर मात्र श्रीकांत ठाकरेंनी आपला मोर्चा लहानपणापासून अवगत असलेल्या कलेकडे म्हणजेच संगीताकडे वळवला. तिथे श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफी यांचे सूर जुळले. दोघात घट्ट मैत्री झाली. आणि पुढे मोहम्मद रफी यांना मराठी गाण्यांची संधी श्रीकांत ठाकरे यांच्यामुळेच मिळाली.
श्रीकांत ठाकरे स्वतः उर्दूचे उत्तम जाणकार होते. त्यामुळे मराठी ‘च’ चा उच्चार हिंदी गायकांना करता येत नाही म्हणून मोहम्मद रफींच्या गाण्यात ‘च’ हे अक्षर श्रीकांत ठाकरे शक्यतो टाळायचे. इतकच काय तर, मोहम्मद रफींसाठी ते मराठी गाणी उर्दू मध्ये लिहून द्यायचे.
श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफी या जोडगोळीची तुफान गाजलेली गाणी म्हणजे, हा छंद जिवाला लावी पिसे, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, हे मना आज कोणी बघ तुला साद घाली अशी एका पेक्षा एक गाणी या दोघांनी बनवली आणि रसिक प्रेक्षकांनी ती उचलून देखील धरली होती.
श्रीकांत ठाकरेंनी मनात आणले असते तर त्यांनी मोहम्मद रफींसोबत आख्ख बॉलिवूड गाजवून सोडलं असतं. पण त्यांनी तसं केले नाही. त्यांना वाटायचे बाळासाहेब मोठे नेते आहेत. त्यांना खुश करायला म्हणून हे बॉलिवूडवाले आपल्याला बॉलिवूडमध्ये घेत असतील. आणि अशी वशिलेबाजी किंवा फेवरिझम हे त्यांच्या तत्वात बसणारे नव्हते. म्हणून ते शेवटपर्यंत स्वतःच्या तत्वांवर ठाम राहिले. “भले मला काम मिळाले नाही तरी चालेल पण तत्वांना मुरड घालणे मला जमणार नाही.” असे ते नेहमी म्हणत असे.
त्यांनी त्यांच्या जीवनावर ‘जसं घडलं तसं’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. राजकारणापासून आणि बॉलिवूडपासून स्वतःला नेहमीच अलिप्त ठेवणाऱ्या या संगीतकाराचे दि. १० डिसेंबर २००३ रोजी निधन झाले.
संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त टीम क फॅक्टस कडून विनम्र अभिवादन…
– निवास उद्धव गायकवाड
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. आम्ही याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.