भारतातील अनेक प्राचीन मंदिरांचा एक स्वतंत्र इतिहास आहे. त्यासोबत काही कथाही जोडल्या आहेत. रामायणातील अशाच एका गोष्टीचा उल्लेख असलेले स्थळ म्हणजे कर्नाटकमधील मुरुडेश्वर गोपुरम मंदिर (Murudeshwar Temple). दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील भटकळ येथे हे मंदिर आहे.
मुरुडेश्वर हे भगवान शंकराचे नाव आहे. भगवान शंकराची जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती येथे विराजमान आहे. तब्बल 123 फूट उंच असणारी ही मुर्ती अरबी समुद्रात दुरूनही पाहता येते. मंगळुरूपासून 165 किमी अंतरावर आणि समुद्राच्या काठावर असलेले हे नितांत सुंदर मंदिर आहे. भगवान शंकराच्या दर्शनाबरोबरच इथले नैसर्गिक सौदर्य बघण्यासाठी हजारो भाविक या मुरुडेश्वर मंदिराला आणि परिसराला भेट देतात.
====
हे देखील वाचा: एक असे शिव मंदिर ज्या मंदिरावर दर बारा वर्षांनी वीज पडते आणि त्यामुळे शिवलिंग दुभंगते!
====
मुरुडेश्वर समुद्रकिनारा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. एकीकडे या धार्मिक स्थळाचे दर्शन घडते. तसेच मुरुडेश्वर मंदिर परिसराच्या मागे विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक किल्ला आहे. त्यामुळे या परिसराचा पर्यटनाच्या माध्यमातूनही मोठा विकास झाला आहे. मुरुडेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्याची किरणे मंदिरावर पडतात. तेव्हाचा नजारा बघण्यासाठी या परिसरात हजारो भाविक गर्दी करतात.
टेकडीवर असलेले मुरुडेश्वर मंदिर (Murudeshwar Temple) तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. येथे भगवान शिवाचे आत्मलिंग स्थापित आहे. याबाबतची कथा थेट रामायणाच्या काळातील आहे. अमरत्व प्राप्त करण्यासाठी, लंकेचा राजा रावण, भगवान शंकराला प्रसन्न करून आपले आत्मलिंग आपल्यासोबत लंकेला घेऊन जात होता. मात्र वाटेत त्याने हे आत्मलिंग खाली ठेवले आणि तेथेच या आत्मलिंगाची स्थापना झाली.
हे लक्षात आल्यावर रागाच्या भरात रावणाने त्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आत्मलिंगाला ज्या कपड्याने झाकलेले होते ते खाली पडले आणि तिथे टेकडी निर्माण झाली. त्या स्थानाला मुरुडेश्वर नाव पडले.

====
हे देखील वाचा: भारतामधील ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर – इथे विवाहित पुरुषांना ‘नो एंट्री’
====
या मंदिर परिसरातील राज गोपुरम हे जगातील सर्वोच्च गोपुरम मानले जाते. त्याची उंची 249 फूट आहे. एका स्थानिक व्यावसायिकाने हे गोपुरम बांधले. कुतुबमीनारची उंची 237 फूट आहे. मुरुडेश्वर मंदिर (Murudeshwar Temple) परिसरातील या गोपुरमची उंची त्यापेक्षाही अधिक म्हणजे 249 फूट आहे. याशिवाय गोपुरमवरील नक्षाकामही बघण्यासारखे आहे.
मुरुडेश्वर मंदिर (Murudeshwar Temple) परिसरातील भगवान शंकराची मुर्ती शिवमोग्गा येथील काशिनाथ या मुर्तीकारांनी घडवली. त्यांना स्थानिक मुर्तीकारांनी मदत केली. या कार्याला दोन वर्ष लागली. स्थानिक व्यापारी आर. एन. शेट्टी यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या भव्य मुर्तीसाठी पाच करोड रुपयांचा निधी लागला. आता हा परिसर नितांत सुंदर करण्यात आला आहे. मोठे बगिचे आणि विस्तृत समुद्रकीनारा, आकर्षक फुलझाडे यामुळे या भागात वर्षाचे बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते.
– सई बने