उपनगरी रेल्वेच्या बरोबरीने मुंबईकर प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेली ‘बेस्ट’ सेवा मुंबई महानगर पालिकेने ताब्यात घेतल्याला आज ७३ वर्षे पूर्ण झाली.
मुंबईत वीज व ट्राम सेवा चालवण्याचा परवाना बाॅम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रामवेज या खाजगी कंपनीकडे होता. पण देशाला स्वतंत्र्य मिळायच्या आठवडाभर आधीच ही कंपनी मुंबई महापालिकेने ताब्यात घेतली.
खाजगी सेवेचा ताबा महापालिकेने घेतल्याची देशातील ही पहिलीच घटना. त्यानंतर बेस्टची चतुरस्त्र प्रगती चालूच राहिली. ट्राम गेल्या पण डबल डेकर, ट्रॉली बसेस आल्या. आक्साला बोटही चालू झाली. आता मुंबई महापालिकेच्या पलिकडच्या नवी मुंबईतही बेस्ट बसेस धावू लागल्या.
बेस्टचा इतिहास रंजक आहे. बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई नगरपालिका यांमध्ये “बॉम्बे ट्रामवे १८७४” नावाचा करार झाला. त्यानुसार कंपनीला घोड्यांनी ओढायच्या ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर १९०५ मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेड हिने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेतली आणि मुंबईच्या रस्त्यांवरून विजेवर चालणार्या ट्राम धावू लागल्या व नंतर जास्त गर्दी होत असल्याने १९२० मध्ये डबलडेकर ट्राम चालवायला सुरुवात केली.
बेस्ट ची पहिली बस १५ जुलै १९२६ मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली. मुंबईकरांनी या सेवेचे जोरदार स्वागत केले पण तेव्हा बेस्टची बससेवा उच्च मध्यमवर्गीयांसाठीच आहे असे मानले जाई. त्या काळात ट्राम हेच प्रवासाचे स्वस्त साधन होते. म्हणून मुंबईने बससेवा पूर्णपणे आत्मसात करायला वेळ लागला.
सरकार आणि महानगरपालिका यांच्या विनंतीवरून बेस्ट ने उत्तर मुंबईत आपली सेवा सुरू केली. आणि वाढत्या गर्दीची गरज ओळखून डबलडेकर बस १९३७ मध्ये सुरू झाल्या.
पहिली “लिमिटेड” बस १९४० मध्ये कुलाबा ते दादर धावली.
दुसर्या महायुद्धानंतर ७ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी “बेस्ट” मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली कालांतराने बॉम्बे चे मुंबई झाले म्हणून “बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट” च नाव बदलून “बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट” असे ठेवण्यात आले.
बेस्ट देशातील सर्वात मोठी शहर रस्ता वाहतूक कंपनी आहे. बेस्टचा आदर्श घेऊन देशातील अनेक शहरांनी स्थानिक बस सेवा सुरू केली. मात्र वाहतुकीबरोबरच वीज पुरवठा सेवा पुरवणारी बेस्ट ही एकमेव संस्था.
मुंबई महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या बरोबरीने बेस्टचा वेगळा अर्थसंकल्प मांडला जातो. तो शिलकीच असतो, हे महत्वाचे.
बेस्टला तमाम मुंबईकरांच्या शुभेच्छा.
-भारतकुमार राऊत (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून त्यांची लेखवजा फेसबूक पोस्ट आहे.)