भारतीय क्रिकेटमधील हुकमाचा एक्का म्हणजे महेंद्रसिग धोनी….कॅप्टन कुल…वयाची चाळीशी ओलांडूनही क्रिकेटच्या मैदानावर पंचवीशीतील खेळाडूंना मागे टाकणाऱ्या धोनीचे चाहते किती आहेत, याची मोजदाद करता येणार नाही. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या खात्यावर जमा करणाऱ्या कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यात क्रिकेटनंतर आता एका नवीन गोष्टीने प्रवेश केला आहे. इथेही क्रिकेटच्या मैदानासारखी हिरवळ आहे. (MS Dhoni Finds New Love)
आपला सर्वांचा लाडका ‘कॅप्टन कुल’ धोनी आता शेतकरी दादा म्हणून काम करतो आहे. धोनीने त्याच्या रांची येथील फार्महाऊसमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला असून तिथला भाजीपाला परदेशातही निर्यात होत आहे. याबरोबच धोनीला ड्रोन स्टार्टअप कंपनी, गरुड एअरस्पेसने आपला ब्रँड अंबेसिटर म्हणून निवडले आहे. ही कंपनी ग्रामीण भागातील शेतीच्या विकासासाठी विशेष उपक्रम राबवत आहे.
भारतामध्ये ड्रोन कंपन्या नवी उभारी घेत आहेत. त्यामध्ये गरुड एअरोस्पेस हे प्रमुख नाव आहे. चेन्नईमधील गरुड एअरोस्पेस कंपनी शेती उत्पादनात आधुनिकीकरण आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी ड्रोन वापराबाबत त्यांचे संशोधन चालू आहे. याच कंपनीने काही दिवसांपूर्वी महेंद्रसिग धोनीला आपला ब्रँड अंबेसिटर म्हणून नियुक्त केले आहे. स्वतः धोनीही आपल्या रांची येथील फार्महाऊसवर सेंद्रिय शेती करीत आहे. त्यातूनच गरुड कंपनी व्यवस्थापनाने धोनीच्या नावाला पसंती दिली आहे. (MS Dhoni Finds New Love)
धोनीसारख्या प्रसिद्ध क्रिकेटपटूने सेंद्रीय शेतीसाठी प्रचार आणि प्रसार केला, तर भारतातील शेती व्यवसायाला आंतरराष्ट्रीय बाजारात वेगळी ओळख मिळेल असा आशावादही कंपनीने व्यक्त केला आहे. गरुड एअरोस्पेसचे सीईओ, अग्निश्वर जयप्रकाश हे स्वतः धोनीचे चाहते आहेत.
====
हे देखील वाचा – बॉलिवूड स्टारचे करोडपती बॉडीगार्ड्स, ज्यांचा पगार ऐकूण व्हाल थक्क
====
गरुड एअरोस्पेस सध्या भारतातील 26 शहरांमध्ये आपल्या ड्रोनमार्फत शेतकऱ्यांना मदत करत आहे. भारतात बहुतांशी ग्रामीण भागात अद्यापही पारंपारिक शेती केली जाते. या शेतीला आधुनिकीकरणाची जोड दिल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. यासाठी ड्रोनची मदत होईल, असा दावा जयप्रकाश यांनी केला आहे. कमी वेळात पेरणीपासून किटकनाशकांची फवारणी करण्यापर्यंत ड्रोन तंत्राची मदत होऊ शकते. यासाठी गरुडा एअरोस्पेस प्रयत्नशील आहे. यात आता महेंद्रसिंग धोनीही सहभागी होणार आहे. (MS Dhoni Finds New Love)
धोनी स्वतः सेंद्रिय शेतीचा पुरस्कर्ता आहे. त्याच्या रांची येथील फार्महाऊसच्या बातम्या सोशल मिडीयावर चर्चेत असतात. धोनीच्या फार्महाऊसमधील भाजी आणि फळांची निर्यात झारखंडच्या कृषी विभागामार्फत यूएईला निर्यात होते. याशिवाय स्थानिक बाजारपेठेतही धोनीच्या शेतीतील उत्पादनांना मागणी आहे. त्यात दूध आणि अंड्यांचाही समावेश आहे. एकूण काय धोनी ज्या क्षेत्रात जाईल तिथे त्याचे राज्य असते. आता हेच सोनेरी दिवस भारतातील सेंद्रीय शेती उत्पादनाला येतील अशी आशा करायला हरकत नाही.
– सई बने