मराठी टेलिव्हिजनविश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिस ओळखली जाते. मृणालने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेपासून तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने तू तिथे मी, अस्स संसार सुरेख बाई, सुखाच्या सरींनी हे मन बावरे आदी अनेक मालिकांमध्ये काम केले.
यासोबतच मृणाल काही चित्रपटांमध्ये देखील झळकली. तिने तिच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांवर एक जादूच निर्माण केली. तिच्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी अक्षरशः उचलून घेतले आणि तिला खूप प्रेम दिले.
पुढे २०१६ साली मृणालने सॉफ्टवेयर इंजिनियर असलेल्या नीरज मोरेंशी लग्न केले. नीरज कामाच्या निमित्ताने अमेरिकेत होता. पुढे काही काळ तिने भारतात राहून तिचे काम चालू ठेवले मात्र २०२० ला तिची मालिका संपल्यानंतर ती अमेरिकेला शिफ्ट झाली.
अमेरिकेला गेल्यानंतर मृणालने अभिनयातून काही काळासाठी ब्रेक घेतला. या काळात तिला नुरवी नावाची एक मुलगी देखील झाली. आता मृणाल पुन्हा भारतात आली असून इथेच स्थायिक झाली आहे. त्यामुळे ती मालिकेत केव्हा दिसणार याबद्दल तिला सतत विचारणा होत होती.
मात्र आता लवकरच मृणाल स्टार प्रवाहाच्या एका मालिकेतून पुन्हा मालिकाविश्वात पुनरागमन करत आहे. खुद्द मृणालची हे सांगितले आहे.
पण मालिका कोणती?, कधी सुरु होणार? याबद्दल अजून कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही. तर आता सगळ्यांनाच या नवीन मालिकेची उत्सुकता लागलेली आहे.