रशिया यूक्रेन युद्ध अजून किती काळ चालणार आहे, हा समस्त जागतिक समुदायाला पडलेला प्रश्न आहे. आणि तो रास्तच आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी साऱ्या जगाने पाहिले आहे की, जीवितहानी आणि वित्तहानीच्या दृष्टीने कुठल्याही युद्धाचे परिणाम समस्त जगाला आणि जागतिक समुदायला भोगावे लागतात.
संपूर्ण युरोप खंड या दोन युद्धांमुळे होरपळून निघाला होता. सगळ्यात भयाण परिस्थिती जपानने अनुभवली. हिरोशीमा आणि नागासाकी या जपानमधल्या दोन शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. दुसऱ्या महायुद्धानंतर परत अशाप्रकारची युद्ध होऊ नयेत आणि चर्चेने शांततेने प्रश्न सोडवावे यासाठी संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांची निर्मिती झाली. यामुळे एक झालं ते म्हणजे छोटी छोटी युद्ध झाली, पण अणूयुद्ध झालं नाही.

जागतिक सत्तांची विभागणी झाली. शीतयुद्धाचा फार मोठा काळ होता. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे युद्धाबरोबर अनेक संकट उभी राहतात. निर्वासितानची समस्या असते, लोक स्थलांतर करतात. दुसऱ्या देशात आश्रय घेतात. हे सगळं रशिया यूक्रेन युद्धातपण बघायला मिळतं आहे.
रशिया यूक्रेन युद्ध चालू असताना मात्र एक मोठी वस्तु गमावल्याची भावना युक्रेनवासीयांच्या मनात सल करून राहिली आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर जगातलं सगळ्यात मोठं विमान नष्ट झालं आहे.
हे विमान होतं युक्रेनचं… ते नष्ट केलं रशियाने…! कुठलं साधं विमान असतं तर त्याची चर्चा एवढी झाली नसती. पण हे एक विशेष विमान होतं. अंटोनोव्ह ए एन २२५… हे ते विमान. त्याचं नाव आहे- म्रिया (Mriya)! म्रिया हा युक्रेनियन शब्द त्याचा अर्थ होतो एक ‘स्वप्न’!

म्रिया (Mriya) हे विमान नष्ट झाल्याच्या वृत्ताला युक्रेन सरकारने दुजोरा दिला आहे. यूक्रेनच्या ‘युकरोबोरोंपरोम’ सरकारी संरक्षण कंपनीने याबद्दल सांगितलं आहे. हे अजस्त्र विमान रशियन फौजानी नष्ट केल्याचं यात म्हटलं आहे.
म्रिया (Mriya) विमान जरी नष्ट झालं असलं तरीसुद्धा आम्ही ते परत तयार करू असा आशावाद यावेळी कंपनीने व्यक्त केला. तसंच हे विमान आम्ही रशियाच्या पैशानेच बांधू हे सुद्धा अधिकारी सांगायला विसरले नाहीत.
खरं पाहिल्यास हे अजस्त्र विमान बांधायला तीन बिलियन डॉलर इतकं खर्च येणार आहे. तसंच विमान परत तयार करायला पाच वर्षाचा कालावधी लागेल. ‘कीव’ शहराजवळ हे विमान दुरुस्तीसाठी पार्क करण्यात आलं होतं.

====
हे देखील वाचा: मलेशियन एअरलाइन्स फ्लाईट 370 – एक न उलगडलेलं कोडं!
====
‘होसटोमेल’ विमानतळावर हँगर मध्ये हे विमान होतं. रशियन फौजानी हे विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर अंटोनोव्ह् विमान नष्ट केल्याचं सांगितलं. युक्रेनचे अधिकारी अत्यंत संतप्त होऊन विमान नष्ट केल्याच्या दुर्घटनेबद्दल बोलत होते.
“रशियाने आमचं नागरी उड्डयन क्षेत्र संपवलं, तसंच आमचं कार्गो क्षेत्रसुद्धा संपवलं, याची भरपाई आम्ही रशियनांकडून वसूल करू”, असं अधिकारी म्हणाले. ए एन २२५ हे विमान मागच्या तीस वर्षाहूंन अधिक काळ हवाई सेवेत होतं.
म्रिया (Mriya) विमानाचं विशेष म्हणजे हे विमान जगातलं सगळ्यात जड वजन असलेलं विमान म्हणून परिचित होतं. साधारणपणे २५० टन इतकं सामान वाहून न्यायची याची क्षमता होती. याचबरोबर नागरी उडयन क्षेत्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात आकाराने मोठे पंख म्रियाचे होते.

====
हे देखील वाचा: नाटो (NATO) म्हणजे काय आणि त्याची स्थापना कशासाठी करण्यात आली?
====
या विमानाची निर्मिती, त्याचं इंजिन हे सगळं ६० च्या दशकात तत्कालीन सोव्हिएत रशियामध्ये सुरू झालं. मूलतः या विमानाची निर्मिती ही सोव्हिएत रशियाच्या अंतराळ कार्यक्रमासाठी म्हणून झाली होती. तेंव्हा अमेरिका आणि सोव्हिएत अंतराळ स्पर्धा ही चरम सीमेवर होती. अमेरिकेप्रमाणे या विमानाचा उद्देश शटल कॅरियर म्हणून वापरायचा होता. १९८८ साली या विमानाने आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं.
या विमानात ६ क्रू मेंबर्स आणि २५० टन कार्गो वाहून नेण्याची क्षमता होती. या विमानाची लांबी होती २७५ फुट, तर ऊंची ६० फुट. या विमानाचा मॅक्सिमम स्पीड होता ८५० किलोमीटर प्रती तास. आणि सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे म्रिया हे जगातलं त्याच्या जातीतलं आत्तापर्यंत तयार झालेलं एकमेव विमान होतं. नासाच्या उपग्रहानी विमान नष्ट झाल्याचे फोटो प्रकाशित केले आहेत.
हे विमान यूक्रेन लवकर तयार करो आणि हे अजस्त्र एकमेकाद्वितीय विमान परत हवाई सेवेत दाखल होवो अशी इछा व्यक्त करायला काहीच हरकत नाही… यासाठी रशिया युक्रेन युद्ध संपण्याची गरज आहे.
-निखिल कासखेडीकर