Home » Monarchy Demand in Iran : इराणच्या तरुणांना हवी राजेशाही

Monarchy Demand in Iran : इराणच्या तरुणांना हवी राजेशाही

by Team Gajawaja
0 comment
Share

इराणची राजधानी तेहरानमध्ये दुकानदारांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा आता अधिक भडका उडाला आहे. इराणध्ये गेल्या काही वर्षापासून दडपून टाकलेला नागरिकांमधील असंतोष आता या आंदोलनाच्या रुपानं बाहेर येत आहे. खामेनींच्या राजवटीमध्ये येथील महिलांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने टाकण्यात आली. फक्त कट्टरतावादाला प्रोत्साहन देतांना इराणमधील तरुणांच्या गरजा मात्र पायदळी तुडवण्यात आल्या. त्याचा परिणाम म्हणजे, आता इराणमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. सुशिक्षीत तरुणांना देशात रोजगार नाही, आणि जे अन्य देशात जाऊ इच्छितात, त्यांनाही हा खर्च परवडण्यासारखा नाही. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इराणी रियाल विक्रमी नीचांकी पातळीवर पोहचला आहे. या सर्वांचा कडेलोट झाल्यानं इराणच्या सर्वच शहरात सुरु झालेली निदर्शने हिंसक व्हायला लागली आहेत. तेहरानमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली, आणि थेट खामेनींच्या विरोधात घोषणा दिल्या. आता या आंदोलकांनी सरकारी इमारतींवरही हल्ला करण्यास सुरुवात केली असून दक्षिण फार्स प्रांतातील फासा शहरात सरकारी इमारतीवर हल्ला केला आहे. त्यांनी फासा गव्हर्नरेट कार्यालयाचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. या गटाचे नेतृत्व करणाऱ्या २८ वर्षीय महिलेला अटक करण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला. मात्र आंदोलकांनी यानंतर पोलीसांवरच हल्ला चढवत या महिलेची सुटका केली. या सर्वात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. इराणमधील जाणकारांच्या मते सध्याची ही परिस्थिती बंडाकडे वाटताल करीत असल्यासारखी आहे. हे आंदोलन वेळीच शांत केले नाही तर इराणमध्ये खामेनींच्या सत्तेला धक्का बसण्याची शक्यता आहे. सोबतच निदर्शक इराणमध्ये पुन्हा राजेशाही येण्याची मागणी करत असल्यानं खामेनींनी स्थापन केलेल्या व्यवस्थेला जबरदस्त धक्का बसणार अशी चर्चाही इराणमध्ये सुरु झाली आहे. ( Monarchy Demand in Iran ) 

इराणमध्ये अयातुल्ला अली खामेनींच्या सत्तेला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. कारण खामेनी यांच्याविरोधात राजधानी तेरहानसह इस्फहान, याझद आणि झांजन सारख्या शहरांमधील विद्यापीठे आणि संस्थांमध्येही निदर्शने सुरु झाली आहेत. सुरुवातीला ही सर्व आंदोलने शांततेत चालू होती. मात्र आता यामध्ये हिंसाचार सुरु झाला असून आंदोलक सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना सत्ता खाली करण्यास सांगत आहेत. इराणमध्ये पुन्हा राजेशाही स्थापन व्हावी, अशी मागणी हे आंदोलक करीत आहेत. इऱाण सरकार मात्र या सर्वांमध्ये अमेरिकेचा हात असल्याचा आरोप करीत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे माजी शाह यांचे पुत्र रेझा पहलवी यांना हाताशी धरुन इराणमधील जनतेला भडकवत असल्याचा आरोप अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी केला आहे. ( Monarchy Demand in Iran ) 

इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण संबंध अनेकदा ताणले गेले आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. अशात डोनाल्ड ट्रम्प आणि जॉन बोल्टन सारख्या नेत्यांनी इराणमध्ये सत्ताबदलाचा सातत्याने पुरस्कार केला आहे. या सर्वातूनच पाश्चात्य देश इराणमधील तरुणांना भडकावत असल्याचा आरोप करुन अध्यक्ष पेझेश्कियान यांनी देशातील लोकांना शत्रूंनी आणलेल्या आर्थिक दबावासमोर एकता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र या आवाहनाचा कुठलाही परिणाम इराणमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर झालेला नाही. उलट ही आंदलने अधिक उग्र होत असून त्यांना हिंसक वळन लागले आहे. इराणच्या पश्चिमेकडील लोरेस्तान प्रांतात एक निमलष्करी अधिकारी ठार झाल्याची माहिती आहे. या सर्वात इराणमधील प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाल्यासारखी आहे.

=======

हे देखील वाचा : Iran Protests : या मुस्लिम देशात मौलवींच्या विरोधात निदर्शने

=======

डिसेंबरमध्ये येथील महागाई ५०% पर्यंत पोहोचली तर अन्नधान्याच्या किमती एका वर्षात ७०% पेक्षा जास्त वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना एकवेळेचे अन्न मिळवणेही मोठे जिकरीचे झाले आहे. त्यात अमेरिकेच्या निर्बंधांमुळे तेल निर्यातीमध्ये मोठी घट येऊन अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या सर्वांचा परिणाम होऊन अनेक लहान दुकानदारांनी आपली दुकानं बंद करुन अन्य काम शोधण्यास सुरवात केली आहे. या सर्वांनी त्रासलेल्या जनतेला आता पुन्हा राजेशाही आठवू लागली आहे. इराणचे राजघराणे, पहलवी राजवंश, १९७९ च्या इस्लामिक क्रांतीमुळे अमेरिकेमध्ये निर्वासित म्हणून रहात आहे. इराणच्या शेवटच्या शाहचा मुलगा रझा पहलवी वॉशिंग्टन डी.सी. येथे रहात असून इराणमधील खामेनी विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देत आहे. इराणमधील या सर्व आंदोलनावर रझा पहलवी यांची नजर असून वेळप्रसंगी आपल्या देशात जाऊन तेथील जनतेला योग्य न्याय देण्याचा आपण प्रयत्न करु, असे त्यांनी जाहीर केले आहे. या सर्वांमुळे इराणधील खामेनींच्या हुकुमशाहीचे काही दिवस शिल्लक असल्याची चर्चा आहे. ( Monarchy Demand in Iran ) 

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.