एक डोळा, एक हात आणि एक पाय. हमास ही दहशतवादी संघटना ज्याचा मेहमान म्हणून सन्मान करते आणि इस्रायल ज्याचा सैतान म्हणून उलेल्ख करते, तो मोहम्मद देईफ पुन्हा एकदा मोठ्या हल्यातून वाचला आहे. इस्त्रायलवर झालेल्या हल्याचा मास्टरमाईंड असलेला मोहम्मद देईफ हा सध्या इस्त्रायलचा नंबर एकचा शत्रू आहे. त्याला मारण्यासाठी तब्बल ७ वेळा हल्ला करण्यात आला आहे. मात्र या सर्वातून मोहम्मद आश्चर्यकारकरित्या वाचला आहे. त्यामुळेच हमासमध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या अधिक वाढली आहे. तर इस्त्रायलने मोहम्मदला मारण्यासाठी नक्की काय करायला लागले, यासाठी नव्यानं योजना आखायला सुरुवात केली आहे. (Mohammed Deif of Hamas)
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. यात इस्रायलने गाझामध्ये मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात हमासच्या अल कासम ब्रिगेडचा प्रमुख मोहम्मद देईफ याला लक्ष्य करण्यात आले. पण मोहम्मद वगळता बाकीचे सर्व यात मारले गेले. इस्त्रायलवर गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला जो हल्ला झाला त्याचा मास्टरमाईंड असलेला मोहम्मद वाचण्याचीही ७ वी वेळ आहे. या हल्ल्यात किमान १०० नागरिकांचा जीव गेला आहे. यापूर्वीही इस्त्रायली सैन्याने मोहम्मद देईफला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण मोहम्मद इस्त्रायली सैन्याच्या तावडीतून सहीसलामत निसटला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात त्याला एक डोळा, एक हात आणि एक पाय निकामी झाला आहे. असे असले तरी हमासचा हा लष्करी प्रमुख मोहम्मद देईफ एखाद्या राक्षसाएवढा खतरनाक आहे. इस्त्रायली सैन्य त्याचा राक्षस या नावानंच उल्लेख करते. (Mohammed Deif of Hamas)
इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड शत्रूंच्या यादीत हमासच्या लष्करी शाखेचा प्रमुख मोहम्मद देईफ याचा समावेश आहे. देईफचे खरे नाव मोहम्मद दियाब अल मसरी आहे. त्याचा जन्म १९६५ मध्ये खान युनिस येथील निर्वासित छावणीत झाला. याच छावणीत त्याचे बालपण गेले. इथूनच त्याच्यात इस्त्रायल विरोधी बिजे रोवली गेली. अशा छावणीतील बहुतेक तरुण हमासच्या अतिरेकी प्रशिक्षणात सहभागी होतात. मोहम्मद देईफही १९८० मध्ये हमाससोबत काम करु लागला. त्यानं इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ गाझा येथे जीवशास्त्राच्या पदवीसाठीही प्रवेश घेतला. याचवेळी देईफ मुस्लिम ब्रदरहूडच्या जवळ आला. त्याचे विचार कट्टर दहशतवाद्यांसारखे झाले. हमासच्या लष्करी कारवायांमध्ये त्याचा सहभाग वाढू लागला. त्यामुळे तो इस्त्रायलच्या दहशतवादी यादींमध्ये सामील झाला. त्याला १९८९ मध्ये इस्रायलने अटकही केली. पण नंतर १६ महिन्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
इस्त्रायलच्या तावडीतून सुटलेल्या मोहम्मद देईफनं नंतर अधिक आक्रमकरित्या हमासच्या कारवायांना सुरुवात केली. तो बोगदे करण्यात आणि बॉम्ब करण्यात तरबेज होता. त्याच्या या सर्व योजनांमुळे त्याचा हमासमधील दर्जाही वाढला.
हमासच्या आत्मघाती बॉम्बस्फोट पथकाची जबाबदारी दाईफवर आली. या आत्मघातकी पथकाच्या हल्ल्यात आत्तापर्यंत अनेक इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. २००२ मध्ये मोहम्मद हमासची लष्करी शाखा अल कासम ब्रिगेडचा प्रमुख झाला. तेव्हापासून इस्त्रायल दाईफच्या मागे आहे. पण या प्रत्येक हल्ल्यात त्यानं स्वतःला वाचवलं आहे. इस्रायलच्या हत्येच्या प्रयत्नात त्याने एक डोळा गमावला आहे. २०१३ च्या हवाई हल्ल्यात त्यांचे कुटुंबीय मारले गेले आहे. यात त्याची पत्नी, ३ वर्षाची मुलगी आणि ७ महिन्याच्या मुलाचा समावेश होता. पण तो तेव्हाही आश्चर्यकारक वाचला. २०२१ मध्येही देईफला मारण्याचा प्रयत्न झाला. त्यात त्याला एक हात आणि एक पाय गमवावा लागला. या खतरनाक देईफची फक्त तीन चित्रे इस्त्रायलकडे आहेत. यावरुन त्याची सुरक्षा किती कडक आहे, याचा अंदाज येतो. (Mohammed Deif of Hamas)
============================
हे देखील वाचा : तालिबानच्या हाती पन्नाच्या खाणी
============================
पॅलेस्टाईनमध्ये त्याला हिरोचा दर्जा आहे. गाझामध्ये त्याला मेहमान म्हणूनही ओळखले जाते. कारण देईफ कधीही कुठल्याही ठिकाणी २४ तासांपेक्षा जास्त रहाता नाही. तो सतत आपली जागा बदलत असतो. मुख्य म्हणजे, देईफ स्मार्टफोन आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान वापरत नाही. त्याला शॅडो मॅन असेही म्हणतात, कारण तो कधीही कुठेही येतो. हमासच्या अंतर्गत भुयारांची त्याला माहिती असल्यामुळे तो या भुयारांचा वापर करुन इस्त्रायली सैन्यापासून आपला बचाव करतो. जर मोहम्मद देईफ मारला गेला तर हमास प्रमुख याह्या सिनवार याचा भाऊ मोहम्मद सिनवार इज्जेदिन अल-कासम हा या ब्रिगेडचा प्रमुख होणार आहे. पण त्याआधी मोहम्मद देईफला पकडण्याचे किंवा ठार मारण्याचे आव्हान इस्त्रायली सैन्यापुढे आहे.
सई बने