पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कपडे हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. तशीच पंतप्रधान मोदी यांच्या जॅकेटची (Modi Jacket) चर्चा बुधवारी सर्वत्र झाली आहे. मोदींनी घातलेले निळ्या रंगाचे जॅकेट चर्चेत आले. हे जॅकेट खास आहे. ते कुठल्याही दो-यापासून तयार झालेले नाही हे जॅकेट रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटलीपासून बनवलेले आहे. त्यामुळेच त्याची चर्चा जास्त सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या मेड इन इंडिया मोहिमेचा हा पुढचा टप्पा असल्याचीही चर्चा आता होत आहे.
बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले.नेहमी आपले जॅकेट आणि त्यांच्या रंगांनी लक्ष वेधणा-या पंतप्रधान मोदी यांनी सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. यासोबत भारताच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचीही चर्चा यावेळी झाली. पंतप्रधान मोदी यांनी फिकट निळ्या रंगाचे जॅकेट (Modi Jacket) घालून संसदेत प्रवेश केला. मोदींनी परिधान केलेले हे जॅकेट प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून बनवलेले असल्याची माहिती पुढे आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने बेंगळुरू येथील इंडिया एनर्जी वीकमध्ये पंतप्रधान मोदींना हे जॅकेट दोन दिवसांपूर्वीच जाहीर कार्यक्रमात भेट दिले होते. हेच जॅकेट पंतप्रधांनांनी आज घातले, आणि या नव्या शोधांना पंतप्रधान कशाप्रकारे प्रोत्साहन देत आहेत, याची चर्चा सुरु झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अर्थसंकल्पावरील भाषण खास ठरले. बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधानांचे जोरदार भाषण झाले. मात्र या भाषणाबरोबरच त्यांनी घातलेले जॅकेटही लक्षवेधक ठरले.
बेंगळुरू येथे गेल्या आठवड्यात भारत ऊर्जा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या ऊर्जा सप्ताहाचा उद्देश ऊर्जा संक्रमण महासत्ता म्हणून भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रदर्शन करणे हा होता. येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने पीएम मोदींना रिसायकल केलेल्या पीईटी बाटल्यांपासून बनवलेले विशेष जॅकेट (Modi Jacket) भेट देण्यात आले. हा भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण होता. आज अवघे जग प्लॅस्टिकच्या कच-यापासून स्वतःला आणि निसर्गाला कसे वाचवता येईल या विचारात आहे. अशावेळी भारतात त्यापासून कपड्याची निर्मिती व्हायला लागली आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. पंतप्रधान मोदींना दिलेले जॅकेट (Modi Jacket) हे त्याचाच एक नमुना आहे. आता अशाच प्रकारे कपडे इंडियन ऑइलचे कर्मचारी आणि सशस्त्र दलांसाठी बनवण्यात येणार आहेत. यासाठी 10 कोटींहून अधिक पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर केला जाणार आहे. गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारने 19,700 कोटी रुपयांच्या खर्चासह राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू केले आहे. या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. या विकासाचे रुप कसे असेल याची छोटी झलकच पंतप्रधान मोदी यांनी संसदेत दाखवली असल्याचे बोलले जाते.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या या प्रकल्पाला अनबॉटल इनिशिएटिव्ह असे नाव देण्यात आले आहे. एक गणवेश बनवण्यासाठी एकूण 28 बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो. कंपनीने दरवर्षी 100 दशलक्ष पीईटी बाटल्यांचे पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल आणि पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल, असे सांगण्यात आले आहे. कॉटनला रंग देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. तर पॉलिस्टरला डोप डाईंग केले जाते. यामध्ये पाण्याचा थेंबही वापरला जात नाही. रिसायकल केलेल्या बाटल्यांपासून बनवलेल्या जॅकेटची किरकोळ बाजारात किंमत 2,000 रुपये आहे. मोदींना भेट दिलेल्या जॅकेटचे फॅब्रिक श्री रेंगा पॉलिमर्स या तामिळनाडूमधील करूर येथील कंपनीने बनवले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार सेंथिल शंकर यांनी सांगितले की, त्यांनी पीईटी बाटल्यांपासून बनवलेले नऊ रंगांचे कपडे इंडियन ऑइलला दिले. यातून पंतप्रधान मोदींना एक जॅकेट(Modi Jacket) देण्यात आले. असे जॅकेट तयार करण्यासाठी सरासरी 15 बाटल्या वापरल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.
======
हे देखील वाचा : श्रीरामाच्या भरोवशावर श्रीलंकेची अर्थव्यवस्था….
======
या प्रकल्पासाठी लागणा-या बाटल्या गोळा झाल्यावर त्यांच्यावर प्रक्रीया करण्यात येते. या बाटल्यांपासून तयार झालेल्या कपड्यांवर एक QR कोड आहे. हा कोड स्कॅन करुन या कपड्याबाबतची माहिती जाणता येते. भारतात 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे शीतपेय कंपन्यांवर संकट कोसळले आहे. यावर हा प्रकल्प सक्षम उत्तर असल्याचे बोलले जाते. पंतप्रधान मोदी यांचे संसदेतील भाषण जोरदार झालेच पण त्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी भारतालाच नव्हे तर जगाला संदेश दिला आहे. तो संदेश म्हणजे भारताची प्रगती आता तंत्रज्ञानाच्या विकासासोबत चालू आहे. ती प्रगती कोणीही थांबवू शकत नाही.
सई बने