अमेरिकेत ऐतिहासिक दुसरा विजय मिळाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच भेट पार पडली. ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी यांचा हा महत्त्वाचा आणि अनेकार्थाने यशस्वी दौरा झाला. राष्ट्रवाद आणि ठाम विचारसरणी असलेल्या, जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या या नेत्यांची बैठक चित्तवेधक ठरणार होतीच. तशी ती ठरलीही. पण जागतिक स्तरावर या ऐतिहासिक भेटीचा काय परिणाम होऊ शकतो ? ही भारताच्या प्रगतीची नांदी ठरेल का ? जाणून घेऊ. (Modi Trump)
ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच अमेरिका दौरा होता. एवढेच नाही तर ट्रम्प यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी भेट घेतलेल्या पहिल्या चार-पाच नेत्यांमध्ये मोदी यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या तीन आठवड्यांतच हा दौरा झाला झाला. ट्रम्प यांच्या शपथविधीला मोदी यांना निमंत्रण नाही, यावरून भारतातील विरोधी पक्षांनी राळ उडविली होती. राहुल गांधी यांनी तर संसदेत त्याबद्दल टीका केली होती. तसेच आणखीही काही मुद्दे होते ज्यामुळे या दौऱ्याकडे जगाचे लक्ष लागले होते. ही भेट होत असताना द्विपक्षीय संबंधांमध्ये अनेक आव्हाने होती. (International News)
गेल्या 10 वर्षांत मोदी यांनी जागतिक पातळीवर आपले नेतृत्व चांगलेच स्थापित केले आहे. विशेषतः कोरोना काळात त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या कामगिरीमुळे अनेक देश भारताचे मित्र बनले. मात्र मोदींच्या या चाणक्यनीतीला ट्रम्प यांचे अमेरिका फर्स्ट हे धोरण मोठ आव्हान ठरल आहे. मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांच्याशी त्यांची मैत्री खूप गाजली होती. परंतु ट्रम्पनंतर आलेल्या बायडेन यांच्या काळात दोन्ही देशांचे संबंध फारसे मैत्रीचे राहिले नाही. पुन्हा निवडून येताना मेक अमेरिका ग्रेट अगेन ही घोषणा ट्रम्प यांनी दिली.(Modi Trump)
त्यांच्या घोषणेमुळे सगळेच देश हवालदिल झाले आहेत. अमेरिकेतील स्थलांतरितविरोधी धोरण आणि व्यापारयुद्ध ही ट्रम्प यांची ओळख ठरली आहे. मोदी यांच्या दौऱ्याच्या केवळ एक आठवडेआधी बेकायदा भारतीय स्थलांतरितांना हातकड्या व साखळ्या बांधून अमेरिकेतून पाठवण्यात आल. त्यामुळे तर या मैत्रीवर चांगलच विरजण पडल होत. शिवाय ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनला लक्ष्य करण्यासाठी वाढीव कराच हत्यार उचलल आहे. भारताला त्यातून सूट देण्यात आली असली, तरी ती टांगती तलवार आहेच. शिवाय भारतासह ब्रिक्स राष्ट्रांवर 100 टक्के कर लादण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. तेही सावट या भेटीवर होतंच.(International News)
मात्र मोदी यांना मिळालेलं महत्त्व आणि त्यांच्या पदरात पडलेल यश पाहिल, तर ट्रम्प जुन्या दोस्तीला जागले असच म्हणाव लागेल. या भेटीत मोदी यांनी वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. व्हाईट हाऊसमध्ये गुरुवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या द्विपक्षीय चर्चा जवळजवळ चार तास चालल्या. यामध्ये केवळ या दोन नेत्यांमधील चर्चा आणि मोठ्या शिष्टमंडळांसोबत रात्रीच्या जेवणाच्या वेळी झालेली चर्चा यांचा समावेश होता.
या चर्चेत धोरणात्मक आणि सुरक्षा सहकार्य, संरक्षण, व्यापार आणि आर्थिक सहभाग, तंत्रज्ञान, ऊर्जा सुरक्षा आणि सामान्य लोकांमधील संबंध तसेच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचा समावेश होता.(Modi Trump)
दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे 21 व्या शतकासाठी अमेरिका-भारत कॉम्पॅक्ट या कराराची घोषणा केली. कॅटॅलायझिंग ऑपॉर्च्युनिटीज इन मिलिटरी पार्टनरशिप, अॅक्सीलरेटेड कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी अस या कराराच पूर्ण नाव आहे. त्याच सोबत व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात दोन्ही नेत्यांनी मिशन 500 सुरू केले. दोन्ही देशांमधील एकूण व्यापार 2030 पर्यंत दुप्पट करून 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणे हे त्याच उद्दिष्ट आहे. ट्रम्प यांनी एकीकडे चीन आणि कॅनडासारख्या देशांशी व्यापार युद्ध सुरू केल आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतासोबत व्यापाराच्या दिशेने ट्रम्प यांचे हे पाऊल महत्त्वाच ठरणार आहे. ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी 2025 च्या शेवटापर्यंत बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर वाटाघाटी करण्याची योजना त्यांनी जाहीर केली.
अमेरिका व भारत या दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीमध्ये संरक्षण हे अतिशय महत्त्वाचे सहकार्याचे क्षेत्र आहे. या देशांच्या प्रमुख संरक्षण भागीदारीसाठी 10 वर्षांच्या नवीन आराखड्याला अंतिम रूप देण्याची योजना यावेळी जाहीर करण्यात आली. ही योजना 2025 ते 2035 पर्यंत चालेल आणि सप्टेंबरपूर्वी ती अंतिम होण्याची अपेक्षा आहे. जमीन आणि हवाई प्रणालींसह अनेक प्लॅटफॉर्मसाठी चालू असलेल्या संरक्षण खरेदी वाटाघाटी तसेच सह-उत्पादन करारांवर पुढे जाण्यासही सहमती दर्शविण्यात आली आहे. अमेरिका भारतासोबतच्या संरक्षण सामुग्री विक्री आणि संयुक्त उत्पादनावर अधिक भर देईल, असं दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.(Modi Trump)
भारताला नैसर्गिक वायू आणि कच्च तेलं पुरवठ्यासाठी अमेरिकेला आघाडीचा पुरवठादार करण्यावरही दोन्ही देशांनी प्रतिबद्धता व्यक्त केली. तसेच ट्रम्प यांनी ऊर्जा कराराची घोषणा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मी ऊर्जेबाबत एक महत्त्वाचा करार केला आहे. त्यामुळे अमेरिका भारताचा तेल आणि नैसर्गिक वायूचा आघाडीचा पुरवठादार बनेल, तो प्रथम क्रमांकाचा पुरवठादार होईल अशी आशा आहे. भारताला एफ-35 आणि स्टेल्थ लढाऊ विमानं देण्याची घोषणाही त्यांनी केली. सोबतच ट्रम्प यांनी भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर म्हणजे आयएमईसीच्या बांधकामासंदर्भातील करारावरही प्रतिक्रिया दिली. इतिहासातील सर्वात मोठ्या व्यापारी मार्गांपैकी एक बांधण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे. हा मार्ग भारतातून इस्रायल आणि इटली आणि पुढे अमेरिकेत जाईल, अस ट्रम्प यांनी सांगितल.(International News)
=============
हे देखील वाचा : Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे झाले ?
=============
बांग्लादेशात सध्या अराजकतेची स्थिती आहे. येथील अल्पसंख्यांक हिंदूंवर होणारे हल्ले रोखण्यात तेथील अंतरिम सरकार अपयशी ठरल आहे. या संकटात अमेरिकेची कोणतीच भूमिका नाही. आता बांग्लादेशचा जो काही निर्णय करायचा असेल तो मोदीच करतील, असेही ट्रम्प यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तसेच मुंबईवरील भयानक दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाचे प्रत्यार्पण करण्याची त्यांची घोषणा भारतीयांना सुखावणारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा आणि अंतराळ या क्षेत्रांत शासकीय, शैक्षणिक आणि खासगी क्षेत्रातला द्विपक्षीय संवाद वाढवण्यासाठी ‘ट्रस्ट’ हा उपक्रम सुरू करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली.
केवळ दोन देशांमधील मुद्देच नाही तर वैयक्तिक पातळीवरही ट्रम्प यांनी जुन्या मैत्रीला उजाळा दिला. मोदी आणि ट्रम्प यांच्यात घनिष्ठ संपर्क कायम राहिला आहे. इतकच काय तर ट्रम्प यांनी मोदींना बसण्यासाठी खुर्ची ओढली, हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकूणच मोदींचा अमेरिका दौरा अमेरिका-भारत संबंधांसाठी आणि जिओपॉलिटिकल दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरला आहे.