Home » अवंतिका दसानी (Avantika Dasani) – ज्युनिअर भाग्यश्री लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर

अवंतिका दसानी (Avantika Dasani) – ज्युनिअर भाग्यश्री लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर

by Team Gajawaja
0 comment
Mithya starring Huma qureshi and Avantika dassani Marathi info
Share

अवंतिका दसानी  (Avantika Dasani) नावाची नवोदित अभिनेत्री ‘मिथ्या’ या वेबसिरीजच्या माध्यमातून डेब्यू करीत आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष,  ही साधी बातमी आहे.  मात्र विशेष म्हणजे ही ‘अवंतिका’ दुसरी कोणीही नसून ‘मैंने प्यार किया’ फेम भाग्यश्री पटवर्धन या अभिनेत्रीची मुलगी आहे. आता हे ऐकल्यावर अनेकांची उत्सुकता वाढली असेल.  

आपल्या आईप्रमाणेच लोब्स सौंदर्य लाभलेली अवंतिका दसानी  (Avantika Dasani) हुमा कुरेशीसोबत मिथ्या नावाच्या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. रोहन सिप्पी यांची ही वेबसिरीज ‘साइकोलॉजिकल थ्रिलर-ड्रामा’ आहे. या वेबसिरीजच्या निर्मात्यांनी अवंतिकाचे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर रिलीज केले. यामधील अवंतिकाच्या लूकचे सर्वानी कौतुक केले आहे.  

मैंने प्यार किया या चित्रपटातून भाग्यश्रीने आपली बॉलिवूड कारकीर्द सुरु केली. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार लोकप्रियता मिळवून दिली. परंतु, नंतर मात्र ती मोजक्या चित्रपटात दिसली. त्यांनतर बॉलिवूडला रामराम करुन ती हिमालय दसानीसोबत संसारात रमली. 

भाग्यश्री सोशल मीडियावरही फारशी ॲक्टिव्ह नव्हती. अवंतिका आणि अभिमन्यू या दोन मुलांच्या सोबत भाग्यश्रीचे फोटो सोशल मिडीयावर क्वचितच पाहायला मिळाले.  मात्र गेल्या काही दिवसात भाग्यश्री, तिचे पती हिमालय, अवंतिका आणि अभिमन्यू हे कुटुंब अचानक प्रसिद्धीत आले आहे. 

भाग्यश्रीचे फिटनेसचे व्हिडीओ सोशल मिडीयातून फिरु लागले. तसेच तिच्या घरातील सजावटीचे,  मुलीसोबत नृत्याचे आणि मुलासोबतच्या व्हिडीओची संख्या वाढली होती. काही टिव्ही शोमध्येही भाग्यश्री पाहुणी म्हणून पोहचली. भाग्यश्रीच्या या सोशल मिडीयावरील वावरामागचं कारण आता पुढे आलं आहे. सोशल मिडीयावर भाग्यश्री मुलीच्या प्रमोशनसाठी तयारी करत होती.  

अवंतिका ही भाग्यश्रीची मोठी मुलगी. ती सध्या पंचवीस वर्षीची आहे. अवंतिका हुशार असून तिनं लंडनच्या बिझनेस स्कूलमधून बिजनेस आणि मार्केटिंगमध्ये पदवी संपादन केली आहे. ट्रॅव्हलिंगची चाहती असलेली अवंतिका नृत्यातही पारंगत आहे. 

मिथ्या ही वेबसिरीज २०१९ मध्ये आलेल्या ‘चीट’ या इंग्रजी वेबसिरीजचा अनुवाद आहे. यात कैथरीन केली, मौली विंडसर आणि टॉम गुडमैन-हिल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 

मिथ्या या वेबसिरीजची कथा दार्जिलींगमध्ये घडते. हुमा कुरेशी हिंदी साहित्याची प्रोफेसर असून अवंतिका तिच्या विद्यार्थिनीच्या भूमिकेत आहे. या दोघींमध्ये क्लासरुममध्ये सुरु झालेला वाद एका वेगळ्या टोकापर्यंत जातो. पुढे काय होणार, ही उत्सुकता सीरिजच्या प्रत्येक भागागणिक वाढत जाते. या वेबसिरीजमध्ये अवंतिका हुमा कुरेशीसह एक गंभीर भूमिका साकारत आहे.

=====

हे देखील वाचा: Rocket Boys: होमी जहांगीर भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या मैत्रीचा अनोखा प्रवास

=====

या दोन मुख्य पात्रांमधील मनोवैज्ञानिक लढाई मिथ्यामध्ये दाखवण्यात आली आहे. या वेबसिरीजचे एकूण सहा एपिसोड आहेत. मिथ्यामध्ये हुमा आणि अवंतिकासोबत परमब्रत चॅटर्जी, रजित कपूर आणि समीर सोनी हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.  

भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दसानी (Avantika Dasani) आता वेबसिरीजच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात येत असली तरी तिचा मुलगा अभिमन्यू दसानी या आधीच बॉलिवूडमध्ये दाखल झाला आहे. ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटात अभिमन्यू प्रमुख भूमिकेत होता. मीनाक्षी सुंदरेश्वर या चित्रपटातही अलिकडे अभिमन्यू सान्या मल्होत्रासह मोठ्या पडद्यावर झळकला आहे.

तसेच, अभिमन्यू याने दम मारो दम आणि नोंटकी साला या चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून  काम पाहिले आहे.  एकूण भाग्यश्री बॉलिवूडमध्ये यशस्वी होऊन फारशी रमली नाही.  मात्र तिची दोन्ही मुलं बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.