जपानमध्ये सध्या वंशवादाचा वाद चर्चेत आहे. त्यासाठी कारण ठरली आहे ती मिस जपान ही स्पर्धा. जपानची यावर्षीची मिस जपान म्हणून कॅरोलिना शिनो ही युवती निवडण्यात आली. 26 वर्षीय कॅरोलिना जपानची मिस जपान 2024 झाली असली तरी ती मुळ जपानची नाही, ती आहे युक्रेनची. याच कारणावरुन जपानमध्ये वाद सुरु झाला आहे. जिचा जपानमध्ये जन्म झाला नाही, जी जपानच्या वंशाची नाही, ती मिस जपान कशी होऊ शकते, हा वाद जपानच्या सोशल मिडियावर रंगला आहे.
यासाठी कॅरोलिना आणि तिच्यासोबत उपविजेत्या ठरलेल्या जपानी युवतींचे फोटो शेअर करण्यात येत आहेत. मुळ युक्रेनची असणारी कॅरोलिनी ही जपानी सौदर्यवतींपेक्षा उंच आहे आणि तिच्या चेह-याची ठेवणही वेगळी आहे. तिच्या याच चेह-यावर आता जपानी जनता प्रश्न विचारत आहे. यामध्ये जपानी सौदर्य कुठे आहे, असा प्रश्न सोशल मिडियावर विचारण्यात येत असतांना कॅरोलिना मात्र आपल्याला मनानं जपानी मानते. मला जपानी म्हणून एवढा मोठा सन्मान दिल्याबद्दल तिने आभार व्यक्त केले आहेत. (Miss Universe Japan)
मिस जपान 2024 ही स्पर्धा नुकतीच जपानच्या टोकियोमध्ये झाली. या स्पर्धेत 26 वर्षाची कॅरोलिना शिनो ही विजेती ठरली. कॅरोलिनाचा जन्म युक्रेनमध्ये झाला आहे. तिची युक्रेनी आई, शिनो पाच वर्षांची असताना जपानला आली आणि तिथेच स्थाईक झाली. कॅरोलिनाच्या आईनं जपानी व्यक्तिबरोबर लग्न केले. कॅरोलिनाचे संपूर्ण शिक्षण जपानच्या नागोया या भागात झाले. जपानी शाळेमधून शिकलेली कॅरोलिना जपानलाच आपली भूमी मानते. त्यामुळेच तिने मिस जपान या स्पर्धेत भाग घेतला आणि ती जिंकलीही. मात्र आता तिच्या याच विजयानं जपानमध्ये वंशवादाच्या वादाला तोंड फुटले आहे.
कॅरोलिनाच्या युक्रेनी दिसण्यावरुन आता या स्पर्धेच्या आयोजकांवर आणि तिची निवड करणा-यांवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहेत. ही जपानी कुठे दिसते. जपानची प्रतिनिधी म्हणून जगात जाणारी कॅरोलिना हिचा चेहरा कुठल्याही पद्धतीनं जपानी दिसत नाही. मग तिला मिस जपान कुठल्या नियमानं निवडले, असा सवाल विचारण्यात येत आहे.
मुळ जपानी नसलेली तरुणी मिस जपान (Miss Universe Japan) कशी होईल हा प्रश्न विचारण्यात येत असून कॅरोलिनाच्या याच निवडीवर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येत आहे. जपानमध्ये रहाणे वेगळे आणि मुळ जपानी वंशात जन्म घेणे वेगळे, ज्यांचा चेहराही जपानच्या संस्कृतीशी मिळत नाही, त्या युवतीची मिस जपानम्हणून निवड होणे हे हास्यास्पद असल्याचे काहींचे म्हणणे आहे. कॅरोलिनाच्या निवडीमुळे जपानच्या सोशल मिडियावर ट्रेंड व्हायरल झाला असून त्यावर अनेक जपानी नागरिक मत व्यक्त करीत आहेत. काहींच्या मते, बहुसांस्कृतिकता अंगीकारण्याऐवजी जर लोकांनी मुळांच्या आधारे जपानीपणाचे मूल्यमापन करण्याचे गरजेचे आहे.
शुद्ध जपानी रक्त असलेल्यांनाच आपले मानले पाहिजे, अन्यथा जपानमधील जपानी लोकांचा नाश होईल, अशी भीतीही काहींनी व्यक्त केली आहे. तर काहींनी युरोपीय दिसणाऱ्या व्यक्तीला सर्वात सुंदर जपानी म्हटल्यामुळे जपानी व्यक्तिंमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. तसेच हा जपानी सौदर्याचा अपमान असल्याचेही काहींनी लिहिले आहे. तर कॅरोलिनाची मिस जपान म्हणून निवड हा जपानसाठी सर्वात दुःखदायक दिवस असल्याचे मतही काहींनी व्यक्त केले आहे.
कॅरोलिना शिनोच्या या निवडीमुळे मिस जपान स्पर्धेचे (Miss Universe Japan) आयोजकही अडचणीत आले आहेत. कॅरोलिनाची निवड केल्यावर आता त्यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, जपानी सौंदर्य ना दिसण्यात आहे ना रक्तात, पण ते आपल्या हृदयात असायला हवे. कॅरोलिना ही जन्मानं जपानी नसली तरी ती ह्दयानं मात्र पूर्णपणे जपानी आहे, त्यामुळेच तिला मिस जपान हा बहुमान देण्यात आला आहे.
============
हे देखील वाचा : अयोध्येव्यतिरिक्त श्रीरामांची येथे आहेत भव्य मंदिरे
===========
या सर्व वादावर कॅरोलिनानेही आपले मत व्यक्त केले आहे. तिने प्रथम तिला जपानी म्हणून स्विकारल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून जपानमध्ये वास्तव्यास आले. तेव्हापासून जपानी संस्कृतीचा मी अभ्यास केला आहे. याच अभ्यासामुळे आणि जपानी संस्कृतीमुळे मला हा बहुमान मिळाला आहे. माझा जन्म इतर देशात झाला असला तरी आता मी जपानचीच आहे, माझ्या देशाच्या बहुमानासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कॅरोलिनानं सांगितले. आता कॅरोलिना या वादापासून दूर होत, मिस युनिर्व्हसची तयारी करण्यावर जोर देणार आहे. जपानला हा बहुमान मिळवून देण्याचे तिचे स्वप्न आहे. मात्र जपानमध्ये सध्या सुरु असलेला सोशलमिडिया ट्रेंड पहाता कॅरोलिनाच्या निवडीवर टिका करण्याचे प्रमाण वाढले आहे.
सई बने