Home » मंडीच्या पंचवक्त्र मंदिरात केदारनाथासारखा ‘चमत्कार’

मंडीच्या पंचवक्त्र मंदिरात केदारनाथासारखा ‘चमत्कार’

by Team Gajawaja
0 comment
Panchvaktra Temple
Share

हिमाचल प्रदेशात पावसाचं धुमशान चालू आहे. हजारो नागरिक या पावसाच्या मा-यामुळे बेघर झाले आहेत. अनेक कार, ट्रक या लोंढ्यात खेळण्याच्या गाड्यांसारखे वाहून जात आहेत. हिमाचल प्रदेशमधील दुमजली इमारतीही या पाण्यात स्वाहा झाल्या आहेत. फारकाय रस्ते आणि पूलही पाण्यानं गिळले आहेत. सर्वत्र हिमाचल राज्य पावसाच्या दहशतीखाली आले आहे. या पावसामुळे 2013 साली झालेल्या केदारनाथ घटनेची आठवण सर्वांनाच होत आहे. तसंच पावसाचं धुमशान सर्वत्र हिमाचल आणि उत्तरांचलमध्ये चालू आहे. हिमाचलप्रदेशमधील सर्वच नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. अशाचप्रकारे चित्र हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातही आहे. येथील बियास नदी धोक्याच्या पातळीच्यावर असून या नदीच्या काठावरील ऐतिहासिक पंचवक्त्र महादेव मंदिरही (Panchvaktra Temple) या पुराच्या गर्तेत सापडले आहे. या मंदिराला प्रती केदारनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. आता हे मंदिर पाण्याच्या प्रचंड प्रवाहाखाली आहे. मात्र हा वेगवान प्रवाहही मंदिराला कुठलेच नुकसान करु शकला नाही. या घटनेमुळे केदारनाथ जलप्रलयाची आठवण येथील शिवभक्तांना करुन दिली आहे. अत्यंत प्राचीन असलेल्या पंचवक्त्र महादेव मंदिराची (Panchvaktra Temple) उभारणी केदारनाथ मंदिरासारखीच आहे. त्यामुळे महादेवानं येथेही आपल्या अस्तित्वाचा दाखला दिल्याची भावना बोलून दाखवली आहे.  

हिमाचल प्रदेशमधली बियास नदीच्या काठावर बांधलेल्या पंचवक्त्र महादेव मंदिर (Panchvaktra Temple) पुराच्या पाण्यानं वेढलं गेले आहे. बरोबर दहावर्षापूर्वी मंदाकिनीने उग्र रूप धारण केले तेव्हा केदारनाथ मंदिर आणि नदीच्या प्रवाहादरम्यान एक खडक आला. त्यामुळे केदारनाथ मंदिर सुरक्षित राहिले. आता हिमाचलमधील पुरामुळे जिथे एकीकडे पूल, डोंगर आणि मोठमोठी घरे कोसळली, तिथे हे पंचवक्त्र महादेव सुरक्षित राहिले आहे.  हा एक चमत्कार असल्याची भक्तांची भावना आहे. मंडीचे प्रसिद्ध ऐतिहासिक पंचवक्त्र मंदिर (Panchvaktra Temple) 300 वर्षांहून अधिक जुने आहे. हे मंदिर राजा सिद्ध सेन यांनी 1684 ते 1727 या दरम्यान बांधल्याची माहिती आहे. मंडीमध्ये बांधलेले हे प्राचीन पंचवक्त्र महादेव मंदिर (Panchvaktra Temple) समृद्ध इतिहासाचे साक्षीदार आहे. या मंदिरात असलेल्या पाचमुखी शिवमूर्तीमुळे मंदिराला पंचवक्त्र असे नाव पडले आहे. पंचवक्त्र मंदिराच्या गर्भगृहात पाच मुखे असलेली शंकराची मोठी मूर्ती आहे. असे मानले जाते की, ही पाच मुखे शिवाची वेगवेगळी रूपे दर्शवतात, ती म्हणजे ईशान, अघोरा, वामदेव, तत्पुरुष आणि रुद्र. मंदिराचा मुख्य दरवाजा बियास नदीच्या दिशेने आहे. यासोबतच दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत. मंदिरात नंदीची भव्य मूर्ती देखील आहे, ज्याचे मुख गर्भगृहाच्या दिशेला आहे. 

शिखर स्थापत्यकलेच्या आधारे हे मंदिर बांधले गेले आहे. केदारनाथ मंदिरासारखी रचना असलेल्या या मंदिरात भक्त मोठ्या श्रद्धेनं येतात.  आता संपूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये अधिक महिना सुरु झाला आहे.  यामुळे या मंदिरात येणा-या भक्तांची संख्याही वाढली होती. पण गेल्या आठवडाभर पडणा-या मुसळधार पावसानं मंदिरात जाणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. या पावसामुळे येथील प्रसिद्ध व्हिक्टोरिया ब्रिजलाही पुराने वेढले आहे. गेल्या कित्येक वर्षात बियास नदीचे महाविक्राल रुप पाहिले नसल्याचे स्थानिक सांगत आहेत. या नदीच्या महापुरात सर्व नष्ट होत असतांना पंचवक्त्र मंदिराला (Panchvaktra Temple) कोणतीही इजा झालेली नाही. मंदिराला चारही बाजूंनी पाण्याने वेढले आहे, परंतु मंदिराला त्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही.  

=========

हे देखील वाचा : पावसाळ्यात टॅटू काढणे किती सुरक्षित? अशी घ्या काळजी

=========

मंडीला छोटी काशीही म्हणतात. काशी नगरी गंगेच्या तीरावर वसलेली आहे. त्याचप्रमाणे मंडीही बियास नदीच्या काठी वसलेली आहे.  दोन दिवसांपूर्वी बियास नदीचे पाणी येथील पंचवक्त्र मंदिरात (Panchvaktra Temple) पोहोचले. सायंकाळपर्यंत मंदिराभोवती महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली.  काही वेळानं मंदिर पूर्णपणे पाण्याखालीही गेले, तेव्हा भक्तांमध्ये भीती निर्माण झाली होती. पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित असल्याचे एक दिवसानंतर थोडे पाणी उतरल्यानं स्पष्ट झाल्यावर भक्तांमध्ये आनंद आहे.  

पंचवक्त्र महादेव मंदिर भारतीय पुरातत्व विभागानं सुरक्षित केले आहे. सुकेती आणि बियास नद्यांच्या संगमावर वसलेले, पंचवक्त्र मंदिराचे (Panchvaktra Temple) सौंदर्य भक्तांना आकर्षित करते. या पाचमुखी महादेवाच्या मंदिराला भेट देण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. अधिक महिन्याच्या पहिल्या सोमवारी येथे उत्सव होणार होता. पण बियास नदीच्या उग्रपुरामुळे सध्या चित्र बदलले आहे. 

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.