‘काश्मीर की कली’ हा 1964 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आठवला की ओठावर येतात ती त्यातील गाणी. ओ. पी. नय्यर यांची ही गाणी अजरामर आहेत. सोबतच शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण, मदन पुरी आणि अनूप कुमार यांच्या भूमिकांमुळेही चित्रपट ओळखला जातो. काश्मीर की कली हा शर्मिला टागोरचा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मीरचे सौंदर्य जगभरात पोहचले असे सांगितले जाते. या चित्रपटाचे बहुतांशी शुटींग झाले आहे ते काश्मीरच्या बैसरन खो-यामध्ये. याच खो-याला काश्मीरचे मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. पाइन जंगले, लिडर नदी आणि बर्फाच्छादित शिखरांच्या या खो-याचे सौंदर्य प्रत्येक ऋतुमध्ये वेगळं असतं. त्यामुळे पर्यटकांची काश्मीर दौ-यातील पहिली पसंत या बैसरन खो-याला असते. येथे काश्मीर की कली या चित्रपटासह, आरझू, जब जब फूल खिले, कभी कभी, सिलसिला, सत्ता पे सत्ता, रोटी, बेताब अशा लोकप्रिय चित्रपटांचे शुटींग झाले आहे. (Baisaran)
काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम शहरात असलेल्या या बैसरन खो-याला म्हणजेच, काश्मीरच्या मिनी स्वित्झर्लंडला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी रक्तरंजित केले आहे. येथे देशभरातून आलेल्या पर्यटकांवर अमानुषपणे गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. या निघृण हत्याकांडाचा जगभरातून निषेध कऱण्यात येत आहे. मुख्य म्हणजे दशतवाद्यांनी फक्त येथे माणसाला मारले नाही, तर येथील निसर्गालाही दुखावले आहे. गेली अनेक वर्ष या बैरसन खो-यातील पर्यटनावर पेहलगावमधील नागरिक आर्थिकरित्या निर्भर आहेत. हे सर्व खोरे पाइन वृक्षांनी भरले आहे. येथे येण्यासाठी फक्त घोडे, खेचरांचा वापर केला जातो. स्थानिक गाईड या बैसरन खो-याचे महत्त्व पर्यटकांना सांगतात. येथे अनेक खेळ खेळले जातात. घोडेस्वारी हा त्यातला प्रमुख खेळ आहे. त्यामुळे या बैसरन खो-यात रोज हजारो पर्यटक येतात. त्यांच्यासाठी येथे छोटे धाबे आणि अन्य सामुग्री विकणा-या स्थानिकांची संख्या मोठी आहे. (Latest News)
आता हेच बैसरन खोरे रक्तरंजित झाले आहे. काश्मीरमध्ये मे आणि जून महिन्याचे पंधरा दिवस हा पर्यटनाचा प्रमुख हंगाम असतो. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर बहुधा सर्वच पर्यटकांनी आपली बुकींग रद्द करायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत पुढील सहा महिन्यांसाठी तरी बुकींग रद्द होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे दहशतवाद्यांनी जेवढ्या नागरिकांना मारलं, त्यापेक्षा अधिक नागरिकांची रोजीरोटी बंद केली आहे. शिवाय बैसरन खो-याच्या नितांत सुंदर सौंदर्यावर रक्ताचे डाग लावले आहेत. काश्मीरमधील पहलगामच्या आसपासच्या अनेक सुंदर खोरे आहेत, जिथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. गेल्या वर्षापासून पर्यटकांचा हा ओढा काश्मीरकडे वाढला होता. पर्यायानं या सर्व खो-यातही पर्यटकांची नेहमी गर्दी होती. यात आडू व्हॅली, बेताब व्हॅली, चंदनवाडी आणि बैसरन व्हॅली यांची लोकप्रियता खूप आहे. यातही पहलगामची मुख्य बाजारपेठ जवळ असल्यामुळे बैसरन खो-यात पर्यटक अधिक संख्येनं जातात. बैसरन खोरे हे अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामपासून फक्त 5 किमी अंतरावर आहे. (Baisaran)
निसर्गाचे वरदान लाभलेल्या या खो-यामध्ये घोडेस्वारी, झिपलाइनिंग, झॉर्बिंग यासारखे साहसी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जातात. याशिवाय बैसरन खो-यात कॅम्पसाईट ही मोठ्या प्रमाणात होते. अनेक हौशी पर्यटक या खो-यातील मोकळ्या पठारावर उभारलेल्या कॅम्पमध्ये रहातात. येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा देखावा बघण्यासाठी तसेच पाइन वृक्षांनी वेढलेल्या जंगलातील पक्षी बघण्यासाठीही पर्यटकांची मोठी गर्दी होते. येथील लिडर नदीत रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होते. याशिवाय येथून बेताब खोरेही जवळ आहे. याच खो-यात सनी देओलच्या बेताब चित्रपटाचे शुटींग झाले होते. तेव्हापासून या खो-याला बेताब खोरे म्हणून ओळख मिळाली. या दोन्ही खो-यात घोडेस्वारी मोठ्या प्रमाणात केली जाते. हा संपूर्ण परिसर दाट देवदार जंगलांनी वेढलेला आहे. (Latest News)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?
=======
प्रत्येक ऋतुमध्ये या बैसरन खो-याचे सौंदर्य वेगळे असते. बैसरन व्हॅली हिवाळ्यात अवर्णनीय सुंदर दिसते. सर्व झाडे बर्फाने झाकलेली असतात. पर्यटक पोनीच्या सहाय्यानं या बैसरन खो-यात जातात, आणि बर्फाचा आनंद घेतात. म्हणूनच भारताचे मिनी-स्वित्झर्लंड म्हणून या खो-याची ओळख आहे. हिवाळा संपत आला की हा सर्व भाग रानफुलांनी सजून जातो. मोकळे हिरवेगार कुरण पाहिल्यावर पर्यटकांना पृथ्वीवरील स्वर्ग बघितल्याचा आनंद मिळतो. याशिवाय बेसरन खोरे अमरनाथ यात्रेसाठीही प्रसिद्ध आहे. दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात होणारी अमरनाथ यात्रा पहलगाम आणि बालताल या दोन मार्गांनी होते. हा मार्ग बैसरन खो-यातूनच जातो. समुद्रसपाटीपासून 2100 मीटर उंचीवर असल्याने या खो-यातील हवामान नेहमीच थंड राहते. आता याच निसर्गाचे वरदान लाभलेल्या बैसरन खो-याला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रक्तरंजित केले आहे. (Baisaran)
सई बने