Home » कोण आहेत अश्विनी भिडे? कशी मिळाली मेट्रो वुमनची ओळख?

कोण आहेत अश्विनी भिडे? कशी मिळाली मेट्रो वुमनची ओळख?

by Team Gajawaja
0 comment
Metro Woman Ashwini Bhide
Share

शिंदे- फडणवीस सरकार कार्यरत झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी अश्विनी भिडे यांना परत एकदा मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्याचा निर्णय तातडीनं घेण्यात आला आणि यानिमित्ताने ही मेट्रो वुमन नव्याने चर्चेत आली. अश्विनी भिडे (Metro Woman Ashwini Bhide) यांना मेट्रो वुमन का म्हटलं जातं, त्यांच्या निमित्ताने सुरू असलेला वाद नेमका काय आहे आणि त्यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी घडली याविषयी…

तासगाव- कराडच्या शाळेत शिक्षण, गुणवत्ता यादीत येऊनही सायन्स- कॉमर्सऐवजी आर्ट्स शाखेची निवड, आजूबाजूला कोणालाच प्रशासकीय सेवेची फारशी माहिती नसतानाही त्याच क्षेत्रात जाण्याचा घेतलेला निर्णय आणि मग, मिळालेल्या प्रत्येक पदावर धडाडीने केलेलं काम… अशी आयएएस अश्विनी भिडे यांची थोडक्यात ओळख सांगता येईल. पण सध्या त्यांची ‘मेट्रो वुमन’ ही ओळख जास्त चर्चेत आहे.

अशी मिळाली मेट्रो वुमनची ओळख

२०१५ मध्ये भाजप- सेनेची युती सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाकांक्षी ‘मुंबई मेट्रो’ प्रकल्पाची घोषणा करत भिडे यांना त्या प्रकल्पाच्या संचालकपदी नेमलं होतं. कुलाबा- वांद्रे-सिप्झ असा मेट्रो-३ चा ३३ किलोमीटरचा प्रवास असून त्यात २६ स्टेशन्स अंडरग्राउंड बांधली जाणार आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधांची सखोल माहिती असलेल्या अश्विनी भिडे यांनी या प्रकल्पाची धुरा हाती घेतल्यापासूनच प्रचंड वेगाने काम सुरू केली. या प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता त्यापुढची आव्हानंही मोठी आणि तीव्र होती. जमीन संपादन करणे, पर्यावरण खात्याकडून विविध परवानग्या मिळवणे, प्रदुषणाचे नियम सांभाळून काम करणे, नाराज रहिवाशांची समजूत घालून त्यांच्या स्थलांतरापर्यंत विविध गोष्टी त्यांनी जातीने पार पाडल्या. त्यांची काम करण्याची आणि इतरांकडून काम करवून घेण्याची पद्धत, त्यांचं ज्ञान व धडाडी आणि मुख्य म्हणजे, मेट्रोच्या कामाचा वेग पाहून त्यांना आपसूक ‘मेट्रो वुमन’ असं नाव मिळालं. मात्र, हे बिरूद आज त्यांच्या कौतुकाचा आणि आज टीकेचाही विषय झालं आहे. त्याला कारण ठरलं, ते ‘मेट्रो- ३’ची कारशेड. (Metro Woman Ashwini Bhide)

टीका आणि बदली

मेट्रोची कारशेड आरेमध्ये बांधण्यावरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात तीव्र मतभेद झाला. आदित्य ठाकरेंनीही आरेमध्ये कारशेड उभारण्यास व त्यासाठी तिथली झाडे तोडण्यास विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला. आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना अश्विनी भिडे आणि आदित्य ठाकरे यांच्यात कारशेडवरून वाद झाला. पर्यावरणवाद्यांनीही वृक्षतोडीला कडाडून विरोध केला, मात्र आरेची जागा तांत्रिकदृष्ट्या कारशेडसाठी योग्य असल्याच्या मुद्द्यावर त्या ठाम राहिल्या. नंतर, कोर्टाचा आदेश आल्यानंतर रात्री काळोखातच आरेमधली २००० झाडं कापण्यात आली आणि त्यावरून अश्विनी भिडे यांच्यावर प्रचंड टीका झाली. पुढे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर साहजिकच त्यांना तातडीने मेट्रोच्या कामातून बाजूला करण्यात आलं. (Metro Woman Ashwini Bhide)

परत संचालकपदी

गेल्या महिन्याभरात कोणाच्याही ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रातल्या सत्तेची सूत्र फिरली आणि शिंदे-फडणवीस असं सरकार रूढ झालं. त्यांचं सरकार आल्यापासूनच अश्विनी भिडे परत मेट्रोत येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आणि झालंही तसंच. अश्विनी भिडे यांना परत संचालकपदी नेमल्यापासून सोशल मीडियासह सगळीकडे दोन विरूद्ध मतांचे गट पाहायला मिळत आहेत. एकीकडे अश्विनी भिडे यांच्या धडाडीचे दाखले देत मेट्रो प्रकल्प त्यांच्याच नियंत्रणाखाली पूर्णत्वाला जाणं योग्य असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे, तर दुसरीकडे पर्यावरणवादी अर्थातच नाराज आहेत. (Metro Woman Ashwini Bhide)

======

हे देखील वाचा – कोण आहेत ‘तेमजेन इमना अलांग’ ज्यांचे व्हिडीओ होतायत सोशल मीडियावर व्हायरल..

======

१९९५ च्या महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांनी आपल्या २७ वर्षांच्या करिअरमध्ये महाराष्ट्रात इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर नागपूर, सिंधुदुर्ग अशा बऱ्याच ठिकाणी भरीव काम केलं. कमी खर्चात लघु जलसिंचन करणारे बंधारे त्यांनी वनराई संस्थेच्या मदतीने उभारले, जे आजही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या देखरेखीखाली इस्टर्न एक्सप्रेस फ्री-वे आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रकल्पही तयार झाले आहेत. अशी भरीव कामगिरी करणाऱ्या आश्विनी आता विरोध आणि टीका सहन करून मेट्रो प्रकल्प यशस्वीपणे पूर्णत्वास नेणार का, हे मात्र येणारा काळच ठरवेल. (Metro Woman Ashwini Bhide)

– कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.