मासिक धर्म ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. मुलींना वयाच्या बारा ते अठरा वर्षापासून मासिक धर्म अर्थात पाळी यायला सुरुवात होते. महिन्याच्या ठरावीक दिवसात तीन किंवा त्याहून अधिक दिवस रक्तस्त्राव होतो. सुरुवातीला जेव्हा पाळी येते तेव्हा ते खूप त्रासदायक वाटते. पाठदुखी, पोटदुखी यामुळे हैराण व्हायला होतं. अशात मासिक धर्म म्हणजे काय, त्याचे महिला आरोग्यामध्ये किती महत्त्व आहे, याची माहिती मुलींना नसल्यामुळे त्यांची चिडचिड वाढते. या सर्वात ज्या तरुणी योगासने नियमीत करतात त्यांना महिन्यातील या ठराविक दिवसात फारसा शारीरिक त्रास होत नाही. तसेच अतिरिक्त होणारा रक्तस्त्रावही मर्यादित राहू शकतो. (Menstrual cramps and yoga)
सुरुवातीच्या दिवसांत मासिक पाळी येण्यात अनियमितता असते. ही अनियमितता हॉर्मोन्सवर अवलंबून असते आणि हॉर्मोन्सचे संतुलन हे मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. भीती, ताणतणाव, भावनिक ओढाताण या सर्वांचा मासिक पाळीवर परिणाम होतो. नियमीत काही योगासने केल्यास या सर्वांवर सहज आणि सुलभ उपाय मिळतो.
मार्जारासन, व्याघ्रासन, शशांकासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, सर्वांगासन, हलासन, चक्रासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, मत्स्यासन, अर्धमच्छेंद्रासन, विपरीत करणी, उत्तानासन, पादहस्तासन, शीर्षासन, ताडासन अशी विविध आसने तरुणींनी नियमित केली पाहिजेत. या सर्वांमुळे शरीर लवचीक होऊन मानसिक स्वास्थही लाभते. अर्थात मासिक पाळीच्या तीन दिवसाच्या काळात शरीरावर फार ताण येईल, अशी आसने करु नयेत. मात्र त्याआधी आणि नंतरही आसने करण्याचा नियमित सराव ठेवला, तर पाळीच्या काळात फारसा ताण जाणवत नाही.
मासिक पाळीच्या दरम्यान अनुलोम-विलोम, भस्रिका, उज्जयी, भ्रामरी या प्राणायामांनी ताण, चिडचिडेपणा कमी होतो आणि हॉर्मोन्सचे संतुलन राखले जाते. याशिवाय शवासन हेही फायदेशीर पडते. यामुळे शरीरावर आलेला ताण कणी होऊन शरीर शिथिल होण्यास मदत होते. (Menstrual cramps and yoga)
=====
हे देखील वाचा – मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढवायची असेल, तर त्यांना आवर्जून करायला लावा हे योगप्रकार
=====
मासिक पाळीमध्ये काही स्त्रियांना गॅस, अपचन या समस्यांचाही त्रास जाणवतो. यासाठी पवनमुक्तासन फायदेशीर ठरू शकते. या आसनामुळे पोटातील वायू मुक्त होण्यास मदत मिळते. तसंच कंबर, पोट, ओटीपोट आणि मानेच्या स्नायूंचाही चांगला व्यायाम होतो. पोट आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी धनुरासन हे आसन उपयुक्त आहे. यामुळे पोट, पाठ आणि कमरेचे स्नायू देखील मजबूत होतात. तसेच पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत मिळते. मासिक पाळीच्या काळात महिलांची पोट आणि पाठदुखीची हमखास तक्रार असते. या तक्रारीवर हे आसन उपयुक्त आहे. अर्थात ते मासिक पाळीच्या तीन दिवसांच्या काळत न करता अन्य दिवशी नित्यनेमानं केले तरी त्याचा फायदा होतो. (Menstrual cramps and yoga)
याशिवाय सेतु बंधासन हे आसनही तरुणींसाठी खूप फायदेशीर ठरेत. यामुळे शरीराला उर्जा प्रदान होते. आसनामुळे छातीचे स्नायू, मान आणि पाठीचा कण्याला ताण मिळतो. मासिक पाळीमध्ये त्रास होऊ नये यासाठी धनुरासन नित्यनेमानं केल्यास त्याचा फायदा मिळतो. मासिक पाळीमध्ये पोटदुखीची तक्रार युवती करतात, अशावेळी बालासन केल्यास ही तक्रार दूर होते. बालासनाच्या सरावामुळे मन शांत होण्यास मदत मिळते. यामुळे शरीरावरील ताणतणाव कमी होतो. (Menstrual cramps and yoga)
सर्वात फायदेशीर आसन म्हणजे शवासन. या आसनामुळे संपूर्ण शरीरावरील ताण कमी होण्यास मदत होते. योगासनांचा सराव केल्यास शारीरिक तसंच मानसिक आरोग्यास भरपूर लाभ मिळतात. योगासनांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होते. बहुतांश महिलांना मासिक पाळीदरम्यान असह्य त्रास होतो. पाठदुखी, कंबरदुखीमुळे स्त्रियांना फारच थकवा जाणवतो. यासर्वांवर योगासने हा कायमस्वरुपाचा उपाय होऊ शकतो. अनेक तरुणी मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी औषधांचा, पेन किलरचा वापर करतात. पण त्याऐवजी आपल्या दैनंदिनीमध्ये नियमीत योगासनांचा समावेश केल्यास या वेदनांपासून सुटका होऊ शकते.(Menstrual cramps and yoga)
– सई बने