Home » मुलीच्या लग्नात आग्रह करूनही आचार्य अत्रे जेवायला बसले नाहीत कारण … 

मुलीच्या लग्नात आग्रह करूनही आचार्य अत्रे जेवायला बसले नाहीत कारण … 

by Team Gajawaja
0 comment
Pralhad Keshav Atre
Share

आचार्य अत्रेंचा (Pralhad Keshav Atre) हजरजबाबीपणा, त्यांचं अमोघ वक्तृत्व, नीडर वृत्ती आणि साहित्य- कलेपासून राजकारणापर्यंत प्रत्येक आघाडीवर गाठलेली सर्वोच्च पातळी यांचे शेकडो किस्से प्रसिद्ध आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्या पहाडी व्यक्तिमत्त्वामागे दडलेला कडक शिस्तीचा, पण तितकाच हळवा बाप आणि सहृदयी माणूस जाणून घेण्यासारखा आहे. 

पुलं देशपांडे एकदा गमतीनं म्हणाले होते, “अत्रेना लहानपणी पाढे बहुधा बे एके बे, बे दुणे चार असे नाही, तर एक लाख एके एक लाख, एक लाख दुणे दोन लाख असेच शिकवले गेले असणार!” आचार्य अत्रे यांचं भाषण किंवा लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजेच त्यांची ‘सुपरलेटिव्ह’ भाषा. त्यांची ही शैली माहीत असणाऱ्यांना पुलंच्या या विधानातली गंमत नक्की कळेल. (Memories of Pralhad Keshav Atre)

अत्रे होतेच तसे. त्यांच्यावर आत्तापर्यंत कितीतरी पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्यांचा हजरजबाबीपणा आणि गमतीशीर कोट्यांचं संकलन असलेली खास पुस्तकंही निघाली. अत्रे यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहून ठेवलेलं असलं तरीही, प्रल्हाद केशव अत्रे नावाचा हा माणूस डिकोड करणं आजही अवघड आहे. वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव आणि कलागुण यांचं अफलातून रसायन त्यांच्या ठायी होतं. 

पहिलं राष्ट्रपती पदक मिळवणारा सिनेमा, असंख्य गाजलेली विनोदी नाटकं, आजही मापदंड ठरणारे त्यांचे अग्रलेख, इथपासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला त्यांचा सिंहाचा वाटा असा त्यांच्या कार्याचा धावता आढावा घ्यायचा म्हटलं, तरी एका माणसानं एकाच जन्मात इतकं सगळं केलंय यावर विश्वास बसत नाही.

कडक शिस्तीचा हळवा बाप

लेखक, संपादक, नाटककार, वक्ते म्हणून आचार्य अत्रे कसे होते, ते हजरजबाबीपणा दाखवून समोरच्याला नेहमीच कसं गप्प करायचे याचे शेकड्यांनी किस्से प्रसिद्ध आहेत. पण व्यक्तीगत जीवनातले अत्रे कसे होते; वडील, पती, आजोबा आणि कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं होतं; हे जाणून घेणं विशेष उत्सुकतेचं आहे. त्यांच्या या बाजूचं मनोज्ञ चित्रण त्यांच्या मुली शिरीष पै आणि मीना देशपांडे यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून वाचायला मिळतं. 

शिरीष पै लिहितात, “आमच्या वडिलांमध्ये एक प्रकारचा साहेबी थाट होता, त्यांनीच आम्हाला त्यांना ‘पपा’ म्हणायला शिकवलं. त्यांना लिखाण करताना पाहाणं हा खूप रम्य सोहळा असायचा. लिखाणाची लय लागल्यानंतर ते कागदामागून कागद लिहित सुटायचे. त्यांच्या लिखाणातले सगळे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत राहायचे. त्यांना लिहिताना पाहात राहाणं हा माझा लहानपणीचा आवडीचा कार्यक्रम होता. त्यांचा आवेश पाहून त्यांनी काय लिहिलंय याची उत्सुकता शीगेला पोहोचलेली असायची. त्यांचे लिहून झालेले कागद मी अधाशासारखे वाचच राहायचे… पण लहानपणीच्या त्यांच्याबरोबरच्या सर्वात छान आठवणी त्यांच्यासोबत केलेल्या प्रवासाच्या आहेत. (Memories of Pralhad Keshav Atre)

आमचा खंडाळ्याचा बंगला त्यांना अतिशय प्रिय होता. त्या बंगल्याच्या दारात उभं राहून ते दूरवर दिसणारे राजमाचीचे धूसर निळे डोंगर न्याहाळात स्तब्ध उभे राहायचे, तर कधी रात्रीच्या वेळेस कमरेवर हात ठेवून काजव्यांनी भरलेली झाडं पाहात कितीतरी वेळ तसेच उभे असायचे. अशावेळेस त्यांच्या मनात शिरून त्यांचे विचार वाचता आले असते, तर किती बरं झालं असतं असं वाटायचं.” 

प्रचंड राग आणि तितकाच पराकोटीचा हळवेपणा असं मिश्रण त्यांच्यात होतं. असामान्यांइतकेच सामान्यांवरही प्रेम करण्याची त्यांची क्षमता आश्चर्यचकित करणारी होती. असाच एक प्रसंग शिरीष पै यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे – “माझ्या लग्नातल्या मेजवानीच्या पहिल्या दोन पंगतींना ते आग्रह करून सर्वांना वाढत होते, पण स्वतः काही जेवायला बसेनात. आमची सगळ्यांची जेवणं झाली, तरी ते उपाशीच होते. अखेर शेवटी नोकरांची पंगत बसली, तेव्हा त्यांच्याबरोबर पपा जेवायला बसले. त्याक्षणी मला स्वतःचीच लाज वाटली. पुढे मिनीच्या (धाकटी बहीण) लग्नातही त्यांनी असंच केलं.” (Memories of Pralhad Keshav Atre)

====

हे देखील वाचा – घरातून फक्त ४०० रुपये घेऊन निघाले होते गुजरामल मोदी, जाणून घ्या मोदी शहराचा इतिहास

====

सुख- दुःख सारखेच

अत्रेंनी खूप मोठे यश पाहिले आणि त्याबरोबर अपयशही सोसलं. सिनेमा व्यवसायानं त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली, पण आर्थिक लाभ फारसा झाला नाही. परिस्थिती इतकी कठीण होत गेली, की एक दिवस आता दिवाळं वाजतं की काय, असं वाटायला लागलं. शिरीष पै लिहितात की, “ज्यांची तोडंही पाहू नयेत अशी माणसं दिडकी- दिडकीसाठी त्यांच्या पाठी रोज तगादा लावत होते. ते दिवस आठवले की, अंगावर शहारा येतो, पण पपा अतिशय धडाडीनं त्या प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत राहिले. एकदा ते म्हणाले, ‘पहाडाशी टक्कर देताना, पहाड फुटला पाहिजे, डोकं फुटता कामा नये. ते दुःख त्यांनी एकट्याने भोगले, पण सुखात कायम सर्वांना भागीदार करून घेतलं.”

मान्यवरांच्या आठवणी 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि आचार्य अत्रे यांच्यात खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. पण ते नातं सुरू होण्यापूर्वीची एक खास आठवण बाबासाहेबांनी सांगितली होती, “मी अतिशय हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत राजा शिवछत्रपती पुस्तक लिहिलं आणि १९५८ साली त्याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. तेव्हा हजार पानांचं ते पुस्तक फक्त ३० रुपयांना विकायला होतं, पण पुस्तकाला उठाव नव्हता. अत्रेंनी मला काहीही कल्पना न देता त्यांच्या मराठा दैनिकात त्या पुस्तकावर अग्रलेख लिहिला. अग्रलेखाचं नाव ‘राजा शिवछत्रपती’ होतं, पण त्यात त्यांनी माझ्याबद्दल, माझ्या पुस्तकाबद्दल लिहिलं होतं. 

बसमधून प्रवास करत असताना सहप्रवासी मराठा वाचत असताना तो अग्रलेख माझ्या नजरेस पडला आणि मला भरून आलं. बसमध्येच तो अग्रलेख वाचत असतानाच मी घळाघळा रडायला लागलो. त्या लेखात त्यांनी मनापासून माझं कौतुक केलं होतं. माझं ते पुस्तकं पाहायला आई- वडील हयात नव्हते, पण अत्रेंनी ते वाचलं याचा मला कोण आनंद झाला. मी त्यांना पुस्तक भेट म्हणून सुद्धा पाठवलेलं नव्हतं, पण त्यांनी ते वाचलं आणि त्यावर लिहिलं. त्या लेखानंतरच्या पुढच्या चार- पाच महिन्यांत पुस्तकाच्या तीन हजार प्रतींची विक्री झाली, दुसरी आवृत्ती काढली आणि ती ही लगेच संपली.” (Memories of Pralhad Keshav Atre)

अत्रे गेल्यानंतर आजपर्यंत त्यांच्याच शैलीत ‘त्यांच्यासारखा माणूस दहा हजार वर्षांत परत होणं शक्य नाही,’ असं अनेकांनी म्हटलं आहे आणि आजही त्यात बदल झालेला नाही आणि होणारही नाही!

कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.