आपला कॉलेज, ट्रेकिंग किंवा इतर कोणताही ग्रुप असो, माथेरानचा प्लॅन झाला नसेल, असं होच शकत नाही. अगदीच फॅमिलीपासून ते कपल्ससाठीही हा थंड हवेचं हॉट स्पॉट आहे. मुंबईकर तर अगदीच दोन-अडीच तासात माथेरानला टच होतात. माथेरान तसं वनांनी वेढलेलं एक सुंदर टुरिस्ट लोकेशन आहेच, यासोबतच इथल्या सर्व पॉइंट्सवरून हिरवेगार आणि उंचच्या उंच डोंगरांची रांग दिसते. एकंदरीत दोन दिवसांचा मस्त प्लॅन होतोच… पण पर्यटकांच्या गर्दीने सजणारा हाच माथेरान बंद होणार असल्याच्या चर्चा सध्या सगळीकडेच पसरल्या आहेत. अशा चर्चा का होत आहेत आणि माथेरान खरच बंद होणार का ? जाणून घेऊ.(Matheran Closed)
ब्रिटिश काळापासून माथेरान थंड हवेचं ठिकाण म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पण याच माथेरानची आता बदनामी होत आहे. आणि असा आरोप स्वत: माथेरानकरांनीच केला आहे. त्याचं झालय असं की, माथेरानमध्ये वेगवेगळे व्यवसाय करणारे लोकं मोठ्या संख्येने आहेत.पण आता माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणूकीचे तसेच लुटीचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे माथेरान बदनाम होतोय आणि या सर्वाचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर वाईट परिणाम होतोय. त्यामुळे पर्यटकांची होणारी लूट थांबवा नाहीतर आम्ही येत्या १८ मार्चपासून माथेरान बंद करून टाकू, असा इशारा माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने घेतला आहे. (Current News)
गेल्या काही महिन्यांपासून माथेरानमध्ये पर्यटकांची फसवणूक होतेय, त्यांना लुटलं जातय, अशा सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात दिसून येताहेत. पर्यटक माथेरानमधले आपले वाईट अनुभव शेअर करत आहेत. कित्येकांनी याबाबत तक्रारीसुद्धा केल्या आहेत. पर्यटकांकडून जास्त भाडे वसूल केले जात आहेत. याशिवाय पर्यटकांच्या पर्सनल बाईक किंवा कारची हवा काढण, पहिल्यांदा येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करण, त्यांच्याकडून दुप्पट तिप्पट भाड आकारण… अशा गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी काहितरी उपाययोजना करावी यासाठी माथेरान पर्यटन बचाव समितीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. (Matheran Closed)
समितीकडून विविध मुद्दे निश्चित करण्यात आले होते आणि त्यात सुधारणा करण्याची मागणी प्रशासनाला केली होती. ते मुद्दे आधी जाणून घेऊया.
सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार-रविवारी घाटपायथ्याला ट्रॅफिक होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवावा.
घाटाच्या सुरुवातीलाच ओला, उबर किंवा परमिट असलेल्या टुरिस्ट गाड्या यांना बंदी असल्याचा फलक तात्काळ हटवावा.
घोडेचालकांना पर्यटकांबरोबर पार्किंगच्या जागेत contact करण्यास पूर्णपणे बंदी घालावी.
इथल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांसाठी माहीती आणि सुविधा केंद्र तातडीने चालु करावं. तसच दस्तुरी नाक्यावर कायम पोलिस बंदोबस्त असावा.
पर्यटक एकाच ठिकाणाहून माथेरानमध्ये येतील अशी व्यवस्था तातडीने नगरपरिषद आणि वनखात्याने सुरू करावी.
आदिवासी लोकांनी त्यांचे रस्त्यावरचे स्टॉल हटवावे.
पार्किंगच्या जागेवर आणि घोड्यांच्या स्टैंडच्या ठिकाणी घोडे, रिक्षा आणि कुली यांचं एक दरफलक लावावं.
पार्किंग भागात सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत ते लवकरात लवकर चालु करावेत आणि कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी.
असे अनेक मुद्दे घेऊन समिती आक्रमक दिसून आली आहे. येत्या सोमवारी म्हणजेच १७ मार्चला शेवटची बैठक प्रशासन पातळीवर होणार आहे. त्यावेळी सकारात्मक निर्णय नाही झाला तर १८ मार्च म्हणजेच मंगळवारपासून माथेरान बंदला सुरुवात होणार आहे. समितीच्या म्हणण्यानुसार या गैर प्रकारांमुळे माथेरानच्या पर्यटनाला तर गालबोट लागतच आहे, पण यासोबतच, माथेरानची आणि माथेरानकरांची बदनामी होतेय. मात्र समितीच्या या तक्रारीनंतर स्थानिकांनी देखील आपली बाजू मांडली आहे. (Matheran Closed)
=============
हे देखील वाचा : Scarface : जगातला सर्वात शक्तिशाली सिंह ज्याचं राज्य १ लाख एकरपर्यंत होतं
=============
यानंतर अजून एक मुद्दा उफाळून वर आला तो म्हणजे इथल्या स्थानिक आदिवासी नागरिकांचा मुद्दा ! समितीच्या माथेरान बंदच्या निवेदनात येथील आदिवासी लोकांचे रस्त्यावरील स्टॉल हटवण्याची मागणी केलीये. दरम्यान त्याबाबत माथेरान डोंगरातील आदिवासी नागरिकसुद्धा आक्रमक झाले असून “जंगल बचाव; आदिवासी बचाव” अशी भूमिका आता आदिवासी संघटनेनेच घेतली आहे. माथेरान मूळ शहर वगळता डोंगरात असंख्य आदिवासी वाड्या आहेत. त्या वाड्यांमध्ये राहणारे आदिवासी लोक हे व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर स्टॉल लावून बसतात. त्यामुळे आदिवासी लोकांच्या विषयी अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या समितीचा विरोध इथल्या स्थानिक आदिवासी संघटनेने घेतला आहे. (Matheran Closed)
एकंदरीत माथेरानमुळे पर्यटनाला चांगला हातभार लागतो. आणि माथेरानसारखी जागा बंद होणं म्हणजे हजारो लोकांचं नुकसान त्यामुळे हे प्रकरण निश्चितच राज्य प्रशासनपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे आता १८ मार्चच्या आधी यावर काही तोडगा निघतोय की १८ मार्चपासून माथेरान बंद होतय, हे लवकरच कळेल.