Home » Mata Shankabhari Devi : दुष्काळ निवारण्यासाठी आलेली माता शांकभरी !

Mata Shankabhari Devi : दुष्काळ निवारण्यासाठी आलेली माता शांकभरी !

by Team Gajawaja
0 comment
Mata Shankabhari Devi
Share

नवरात्रौत्सवात देवी दुर्गा मातेची विविध रुपात पूजा केली जाते, यात माता शांकभरी देवीला शताक्षी म्हणून ओळखले जाते. पृथ्वीवर पडलेल्या दुष्काळाला दूर करण्यासाठी दुर्गा माता, माता शांकभरीच्या रुपात आल्याचे सांगितले जाते. याच माता शांकभरीचे भव्य आणि पौराणिक मंदिर उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथे आहे. सहारनपूरच्या शिवालिक पर्वतरांगांमध्ये असलेले माता शाकंभरी देवी मंदिर हे श्रद्धा आणि भक्तीचे एक प्रमुख केंद्र आहे. सातत्यानं होत असलेल्या चमत्कारामुळे प्रसिद्ध झालेल्या या मंदिरामध्ये नवरात्रौत्सवात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. देवीचे मंदिर जिथे आहे, तो भाग जसमोर गावात आहे. (Mata Shankabhari Devi)

येथील संस्थानिकांची ही शांकभरी देवी कुलदैवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या शांकभरी देवीच्या मंदिराची सगळी व्यवस्था आजही तेथील संस्थानिकांचे वंशज घेतात. याच भागात अन्य दोन महत्त्वाची मंदिरे आहेत. यातील एक मंदिर म्हणजे, भूरा-देव. भूरादेव हे देवी शाकंभरीचे रक्षक मानले जातात. त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय माता शांकभरीची यात्रा पूर्ण मानली जात नाही. त्यामुळे सध्या हा सगळाच परिसर देवीच्या भक्तांनी भरुन गेला आहे. सहारनपूरमधील शिवालिक टेकड्यांवर असलेल्या मात शाकंभरी देवी मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त फुलांची आणि दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. माता शाकंभरी ही देवी दुर्गेचा अवतार असल्याचे सांगितले जाते. दुर्गा सप्तशतीमध्येही देवीच्या या रुपाचा महिमा सांगितला आहे. या शक्तिपीठामध्ये मातेचे दर्शन घेतल्यावर घरामध्ये कायम अन्नधान्यांची भरभराट होते, अशी मान्यता आहे. (Social News)

माता शाकंभरीच्या या रुपाबाबत एक कथा सांगितली जाते. भगवान ब्रह्माकडून वरदान मिळाल्यानंतर, दुर्गम नावाच्या राक्षसाने देवांवर आणि मानवावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानं अनेक देवांना बंदी केले. मनुष्यांची हत्या केली. यामुळे पृथ्वीवर सर्वत्र त्राहीमाम स्थिती निर्माण झाली. दुर्गम राक्षसाच्या अत्याचाराचा परिणाम निसर्गावरही झाला. पृथ्वीवरही सर्व हिरवळ सुकून गेली. धान्य खराब झाले. पिके नष्ट झाली. जंगलांना आग लागली. पृथ्वीवर भयानक दुष्काळ पडला. त्यामुळे देवांनी यातून मुक्ताता व्हावी म्हणून माता शक्तिची आराधना केली. माता आदिशक्ती यामुळे प्रकट झाली आणि तिने पृथ्वीवरील दुःख कमी करण्यासाठी दुर्गम राक्षसासोबत युद्ध केले आणि त्याचा नाश केला. पृथ्वीवर दुष्काळामुळे, वनस्पती जवळजवळ पूर्णपणे नाहीशी झाली होती. तेव्हा माता दुर्गेने पृथ्वीवर बाण सोडला. हा बाण जिथे लागला तिथून पाण्याचा प्रवाह बाहेर आला. (Mata Shankabhari Devi)

आता त्या स्थानाला गंगा म्हणून ओळखले जाते. माता देवीच्या शक्तीने मुसळधार पाऊस पडला. यामुळे पृथ्वीवर हिरवळ परत आली. वनस्पती वाढू लागल्या. देवी शांकभरीच्या आशीर्वादानं भाजीपाला तयार झाला आणि मानवाची भूक भागवली गेली. शांकभरी मातेच्या या शक्तिपीठाचे महत्त्व देवीमातेच्या यात्रेमध्येही आहे. वैष्णोदेवीपासून सुरू होणाऱ्या नऊ देवींच्या यात्रेत माँ चामुंडा देवी, माँ वज्रेश्वरी देवी, माँ ज्वाला देवी, माँ चिंतापुरानी देवी, माँ नैना देवी, माँ मनसा देवी, माँ कालिका देवी, माँ शाकंभरी देवी सहारनपूर यांचा समावेश आहे. शिवालिक खोऱ्यात असलेल्या माता शाकंभरी मंदिराच्या गर्भगृहात श्रीगणेशासह माता शाकंभरी, भीमा देवी, भ्रभरी देवी आणि शताक्षी देवी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरात मातेच्या चरणी लीन होणा-या भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांचे कुटुंब सर्व प्रकारे सुखी आणि समृद्ध होते, अशी धारणा आहे. (Social News)

========

हे देखील वाचा : 

Chhattisgarh : दंतेश्वरी मातेचा महिमा !

=========

माता शांकभरी मंदिराच्या पूर्वेला बाबा भूरा देव म्हणजेच भैरवनाथांचे मंदिर आहे. असे मानले जाते की, मातेचे दर्शन घेण्यापूर्वी, मातेचे सेनापती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा भैरव यांचे दर्शन घ्यावे लागते. त्यानंतरच या सिद्धपीठाची यात्रा पूर्ण झाली, असे मानली जाते. माता शांकभरीच्या दरबारी नवरात्रांमध्ये भक्तांचा मेळा भरतो. येथे देशाच्या कानाकोप-यातून हजारो भाविक दाखल होतात. तसेच होळीमध्येही माता शाकंभरीचे दर्शन घेतले जाते. याशिवाय आश्विन आणि चैत्र नवरात्रौत्सवही येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला माता शाकंभरीचा प्रकट दिवस साजरा केला जातो. यावेळी देवीला 56 पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. या सोहळ्यालाही देशभरीतून हजारो भाविक उपस्थित असतात. (Mata Shankabhari Devi)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.