बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील पुनौरा धाम येथे आता भव्य अशा माता जानकी मंदिराची पायाभरणी कऱण्यात आली आहे. येत्या काही वर्षात अयोध्येतील श्रीराम मंदिरासारखे माता जानकीचे हे मंदिर तयार होणार असून या मंदिरामुळे पुनौरा धाममधील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. हा संपूर्ण परिसर जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 882 कोटी 87 लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून या योजनेअंतर्गत, मंदिर संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी 50 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. (Bihar)
या जमिनीसह, पुनौरा धामचे एकूण क्षेत्रफळ आता 67 एकर होणार आहे. यामुळे सीतामढी शहराचा मोठा विकास होणार असून या भागातील अन्यही मंदिरांचे सुशोभिकरण करण्याची सरकारची योजना आहे. अयोध्येत श्री राम मंदिर 22 जानेवारी 2024 रोजी भाविकांसाठी खुले करण्यात आले. या दिवसापासून बिहारमधील सीतामढी येथील माता सीता मंदिराची चर्चा सुरु झाली होती. बिहारमधील सीतामढी हे माता सीता यांचे जन्मस्थान असल्याचेही सांगितले जाते. असे मानले जाते की, सीतामढीचे पुनौरा गावात राजा जनक जमीन नांगरत असतांना त्यांना बालरुपातील सीता माता मिळाल्या. राजा जनकाच्या नांगराच्या फळाला एक कलश लागला. या मोठ्या कलशामध्ये एक बाळ होतं. ही तेजपुंज कन्या पाहून राजा जनक यांनी देवाचा आशीर्वाद समजून हे बाळ आपले मुल म्हणून स्विकारले. त्याच माता सीता होय. (Social News)
जमिनीत माता सीता मिळाल्यामुळे त्यांचे नाव सीता ठेवण्यात आले. बृहद विष्णू पुराणानुसार, सीतेचा जन्म सुमारे तीन योजनेत म्हणजे जनकपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर झाला होता. त्यामुळे माता सीता यांचे येथे भव्य मंदिर व्हावे अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारल्यावर आता माता सीता यांचेही असेच भव्य मंदिर उभारण्याची मागणी अधिक होऊ लागली. त्यानंतरच या माता जानकी मंदिराचा आराखडा तयार करण्यात आला. बिहारमधील सीतामढी येथे, सीता मातेच्या प्रकटीकरणाच्या ठिकाणी आता हे मंदिर उभारण्यात येत आहे. 8 ऑगस्ट रोजी सीतामढीतील पुनौरा धाम जानकी मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याहस्ते करण्यात आली. अयोध्येतील श्री राम मंदिरानंतर आता देशाला असे मोठे धार्मिक स्थळ म्हणून या मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. हा सर्व मंदिर परिसर सीतामढी शहरापेक्षा मोठा असणार आहे. (Bihar)
बिहारमधील सर्वात विशाल मंदिर म्हणून माता जानकी मंदिर तयार होणार आहे. अयोध्येत श्री राम मंदिर बांधणाऱ्या वास्तुशिल्प कंपनीकडूनच या माता जानकी मंदिर संकुलाची रचना केली जात आहे. प्रस्तावित मंदिराची उंची 156 फूट आहे. अयोध्येमधील श्रीराम मंदिर हे 161 फूट उंचीचे आहे. त्यापेक्षा माता जानकी मंदिराची उंची पाच फुटांनी कमी ठेवण्यात आली आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि स्वागत केंद्र संकुलाच्या पूर्व टोकाला असेल. प्रवाशांसाठी सुविधा केंद्र आणि ग्रंथालय उत्तरेकडे असणार आहे. या ग्रंथालयात माता सीता यांच्या जन्मस्थळाचे महत्त्व सांगणारे ग्रंथ आणि अन्य धार्मिक ग्रंथ ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मंदिरात देशभरातून भाविक येणार आहेत, त्यांच्यासाठी सुसज्ज असे भंडारा स्थळ असणार आहे. भंडारा स्थळ आणि यज्ञ मंडप मंदिराच्या दक्षिण द्वारावर असेल, तर जानकी कुंड आणि संग्रहालय पश्चिमेकडे असेल. (Social News)
==============
हे देखील वाचा : Uttar Pradesh : देवराह बाबांच्या अखंड ज्योतीचे रहस्य !
===============
मंदिर संकुलाचे मुख्य गर्भगृह मध्यभागी असणार आहे. यामुळे मंदिरामध्ये सर्व दिशांनी प्रवेश करता येणार आहे. भाविकांची गर्दी झाल्यावर या गर्दीचे नियोजन करण्यासाठी सोयीचे ठरणार आहे. माता जानकी मंदिरात येण्यासाठी भाविक प्रथम उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वारातून संकुलात प्रवेश करतील. सुरक्षा तपासणी, स्वागत केंद्र, माहिती काउंटर आणि नकाशा मार्गदर्शक येथे उपलब्ध असेल. तेथून भाविक थेट मंदिर मार्ग, बाग, कुंड आणि यज्ञ मंडपाकडे जातील. प्रभू श्री राम मंदिराप्रमाणे या मंदिरातही वृद्ध आणि अपंग प्रवाशांसाठी ई-कार्ट सेवा उपलब्ध असणार आहे. माता जानकी मंदिरासोबत पुनौरा धाममध्ये आंतरराष्ट्रीय सुविधा उभारण्यात येणार आहेत. पर्यटन सेवा, हॉटेल्स, स्थानिक हस्तकला केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. (Bihar)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics