एखाद्या ऐतिहासिक विषयावर सिनेमा आल्यानंतर एक गोष्ट हमखास घडते ती म्हणजे वाद… प्रत्येकाची इतिहास समजावून घेण्याची क्षमता वेगळी, मग प्रत्येकाचे रेफरन्स वेगळे आणि या सर्वात नित्यनियमाने होणारी गोष्ट म्हणजे कोणाच्या तरी भावना दुखावल्या जाणे. आता छावा सिनेमाच्या बाबतीतही तेच घडताना दिसत आहे. छावा सिनेमात गणोजी शिर्के यांनी फितुरी केली आणि त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले असं सांगण्यात आलं आहे. याला आता शिर्केंच्या वंशजांनी विरोध केला आहे. सोबतच काही इतिहासकारांच्या मते शिर्केंनी औरंगजेबाला मदत केली नव्हती. याच इतिहासकरांमध्ये एक नाव आहे इंद्रजित सावंत. त्यांच्या मते शिर्के नाही तर ब्राम्हण कारकुनांनी औरंगजेबाला मदत केली होती आणि शंभू राजेंना पकडून दिले होते. (Indrajeet Sawant)
मात्र सावंत यांनी असा दावा केल्यानंतर त्यांना धमकीही मिळाली आहे. नागपूरच्या प्रशांत कोरटकर या इसमाने इंद्रजित सावंत यांना अर्वाच्य भाषेत शिव्या घालत धमकी दिली आहे. ज्याचं कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झालं आहे. महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात फ्रान्स्वा मार्टिन हे नावही सातत्याने घेतलं जात आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण काय आहे ? फ्रान्स्वा मार्टिनच्या आधारावरून कोणता दावा केला जात आहे ? आणि महत्त्वाचं म्हणजे हा फ्रान्स्वा मार्टिन कोण आहे? जाणून घेऊ.
तर शेख निजाम मुकर्रब खानाने संभाजी महाराजांना संगमेश्वर इथं पकडलं. त्यावेळी गणोजी शिर्के आणि त्यांचा भाऊ कान्होजी शिर्के मुकर्रब खाना बरोबर होते असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. शिवाय कोल्हापूर ते संगमेश्वर हा रस्ता ही त्यांनी दाखवला. त्यावेळी त्यांनीच लिड केलं असंही दाखवलं गेलं आहे. पुढे संगमेश्वर इथं छापा टाकला जातो. त्याच वेळी संभाजी राजेंना कसं पकडायचं हे ही शिर्के बंधू सांगतात असं चित्रपटात आहे. पण वास्तविक याचा कोणताही एक ओळीचा पुरावा उपलब्ध नाही असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा आहे. (Indrajeet Sawant)
त्यासाठी काही तत्कालीन कागदपत्रांचा अहवाल सावंत देतात. त्या वेळचा एक महत्त्वाचा पुरावा दिला जात आहे, तो म्हणजे फ्रान्स्वा मार्टिन याची डायरी… हा फ्रान्स्वा मार्टिन फ्रेंचांचा गव्हर्नर होता. त्यावेळी संगमेश्वर जवळ राजापूरला फ्रेंचांची वसाहत होती. त्यामुळे स्वराज्यात काय चाललं आहे हे त्याला राजापूरातून समजत होतं. संभाजी महाराजांना फेब्रुवारी महिन्यात पकडलं गेलं होतं. त्यांनी मार्चमध्येच याबाबत आपल्या डायरीत लिहीलं होतं. संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राम्हण सहकारकूनांनी पकडून दिलं. त्याच ब्राम्हण सरकारकूनानी मोघलांशी आधीच संधान बांधलं होतं. असा उल्लेख त्या डायरीत असल्याचं सावंत सांगतात.
त्यामुळेच मग शिर्केंनी नशीब तर स्वराज्यातील काही ब्राह्मण कारकूनांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं अशी थियरी इंद्रजित सावंत पुढे करतात. यामुळेच मग सावंतांची अशी थियरी मांडणं ब्राह्मण समाजाच्या विरोधात बोलणं असल्याचा राग धरून प्रशांत कोरटकर या इसमाने सावंत यांना फोन करून धमकी दिली, त्यानं शिव्या दिल्या सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही काही अपशब्द बोलले. प्रशांत कोरटकर या इसमाविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra Politics)
मात्र या सर्वात एक नाव सतत आलं ते म्हणजे फ्रान्स्वा मार्टिन. याच्याबद्दल बोलायचं झाल्यास दक्षिण भारतातील पाँडिचेरी या तत्कालीन फ्रेंच वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा आयुक्त आणि व्यापारी म्हणूच त्याची ओळख आहे. त्याचा जन्म पॅरिसमध्ये झाला. त्याचे वडील पॅरिसमधील छोटे व्यापारी होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या वडिलांचा व्यापार सांभाळण्यास सुरुवात केली. पुढे त्याने १६६४ मधे सुरू झालेल्या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीत व्यापारी म्हणून नोकरी पतकरली. या काळात त्याने मादागास्कर, सुरत, मछलीपट्टम येथे प्रवास केला. १ मार्च १६६५ रोजी तो मायदेश सोडून मादागास्करला गेला. तेथे चार वर्षे काढून १६६९ मध्ये तो सुरतेला पोहोचला. यानंतर त्याची पाँडिचेरी येथे व्यापारी म्हणून नेमणूक झाली . पुढे तो येथे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा संचालक म्हणून काम बघू लागला. (Indrajeet Sawant)
याच काळात भारतात त्या ज्या राजकीय घडामोडी घडत होत्या त्याची नोंद हा फ्रान्स्वा मार्टिन करून ठेवत होता. फ्रान्स्वा मार्टिन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही अनेक नोंदी करून ठेवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील हल्ल्याबद्दल ऐकलेली माहिती लिहताना तो म्हणतो, ‘प्रसिद्ध शिवाजी राजाने चार ते पाच हजाराची फौज घेऊन सुरतेवर हल्ला केला. त्याने सोने, चांदी, मौल्यवान जवाहीर आणि इतर सामानाची अगणित लूट केली. आम्ही आमचा दूत नजराणा घेऊन त्याच्याकडे पाठवला, म्हणून त्याने आमच्या वखारीवर हल्ला केला नाही. पण इंग्रजांच्या वखारीवर हल्ला केला, मात्र इंग्रजांनी त्यांच्या वखारीचे संरक्षण केले. त्याने डच वखार दूर असल्यामुळे त्यांच्या वखारीवर हल्ला केला नाही. सुरतेतील लोक स्वतःच्या संरक्षणासाठी शहराबाहेर गेले होते; परंतु ते जेव्हा परतले तेव्हा त्यांचे सर्व सामान लुटले असल्याचे त्यांना दिसले.’ मार्टिनने त्याच्या लेखनात वखारीला ‘लॉजʼ म्हणून संबोधले आहे. (History)
===============
हे देखील वाचा : Maratha History : मोघलाई की पेशवाई पहिली आली ? नेमकं सत्य काय ?
===============
शिवाजी महाराजांच्या कर्नाटक मोहिमेबद्दल तो लिहितो, शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह गोवळकोंड्याला आले. त्यांचे गोवळकोंड्यात मोठा नजराणा देऊन भव्य स्वागत झाले. गोवळकोंड्याच्या राजाकडून शिवाजी महाराजांना सहकार्य करण्याबाबत कर्नाटकातील सर्व सरदारांना पत्रे पाठवण्यात आली.ʼ तसेच शिवाजी महाराजांनी वेल्लोर, जिंजी वगैरे आदिलशाही मुलूख जिंकून घेतल्याचे वर्णन त्याने केले आहे. मार्टिन सप्टेंबर १६९३ ते फेब्रुवारी १६९४ या काळात तो डचांचा युद्धकैदी होता. त्याने फ्रान्समधून निघाल्यापासून मृत्यू होईपर्यंतच्या प्रत्येक दिवसाच्या नोंदी आपल्या दैनंदिनीत लिहून ठेवल्या व त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या. त्याच्या दैनंदिनीचे मेम्वार दि फ्रान्स्वा मार्टिन या नावाने तीन खंड पाँडिचेरी येथे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. (Indrajeet Sawant)
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम, औरंगजेबाची दक्षिण मोहीम आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेबद्दल विस्तृत माहिती मिळते. याचबरोबर तत्कालीन व्यापार, आदिलशाही, गोवळकोंड्यामधील राजकारण, पूर्वेकडील इंग्रज, डच, पोर्तुगीज कंपन्यांची व्यापारवाढ, दक्षिण समुद्रातील डच व इंग्रज लोकांच्या हालचाली, सुरत, मद्रास, मदुराई, सयाम, चीन येथे झालेला धर्मप्रसार यांबद्दल भरपूर माहिती मिळते. तसेच गोवळकोंडा व डच यांच्यातील संघर्षाबद्दलही माहिती मिळते. आता याच फ्रान्स्वा मार्टिनने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात कोणाचा हात होता ? याबद्दल जी नोंद केली आहे त्यावरूनच वादंग निर्माण झाला आहे.