भारतापासून 4734 किमी अंतर असलेल्या दक्षिण कोरिया या देशामध्ये मार्शल लॉ जाहीर झाल्याची बातमी आली आणि मार्शल लॉ म्हणजे नेमकं काय याची चर्चा सुरु झाली. आपल्याकडे ही चर्चा सुरु असतांना दक्षिण कोरियामध्ये या मार्शल लॉच्या विरोधात मोठं जनआंदोलन झालं. जनतेचा विरोध पहाता राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी जाहीर केलेला हा मार्शल लॉ अवघ्या सहा तासात मागे घेतला. यावर चोहोबाजुनी टिका झेलत असलेल्या राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल हेच एकाकी पडल्याचे दृष्य दक्षिण कोरियामध्ये आहे. येथील संसदेने पूर्ण बहुमताने मार्शल लॉ काढून टाकण्याच्या बाजूने मतदान केले. आता येथे राष्ट्रपतींनाच त्यांच्या पदावरुन पायउतार व्हावे लागेल अशी परिस्थिती आहे. मात्र राष्ट्रपतींनी हे आत्मघातकी पाऊल टाकले का, याची चर्चा सुरु असतांना राष्ट्रपतींच्या पत्नीचे, दक्षिण कोरियाची फर्स्ट लेडी किम क्योन यांचे नाव पुढे आले. (Martial Law)
फर्स्ट लेडी किम यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. त्यापैकी अनेक आरोपांच चौकशीही चालू आहे. आपल्या बायकोला या सर्वांतून वाचवण्यासाठी राष्ट्रपतींनी थेट देशावर मार्शल लॉ चे संकट लादल्याची माहिती पुढे आली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी मार्शल लॉ लागू केल्याची बातमी आली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. मात्र अवघ्या सहा तासात हा निर्णय त्यांना मागे घ्यावा लागला. आणि मग या आत्मघातकी निर्णयामागे त्यांची पत्नी, दक्षिण कोरियाची फर्स्ट लेडी किम क्योन, असल्याचे स्पष्ट झाले. दक्षिण कोरियामध्ये 1980 नंतर प्रथमच मार्शल लॉ जाहीर करण्यात आला होता. मात्र तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे. राष्ट्रध्यक्षांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे मत जाहीर करत अनेक कोरिअन नागरिक रस्त्यावर उतरले. यावर हा निर्णय घेण्यासाठी यून सुक येओल यांनी आपल्या शेजारी उत्तर कोरियाकडून आलेल्या धमकीचा उल्लेख केला. लष्कराच्या जवानांनी सरकारी इमारतींचा ताबा घेण्यास सुरुवात केली. मात्र हजारो आंदोलक या निर्णयाच्या विरोधात संसदेबाहेर जमले. विरोधी पक्षही या विरोधात उतरले. (International News)
फारकाय पण राष्ट्राध्यक्षांच्या पक्षाचे नेतेही या मार्शल लॉच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करु लागले. शेवटी वाढता विरोध पाहता याबाबत मतदान झाले आणि 190 सदस्यांनी मार्शल लॉ हटविण्याच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर अध्यक्ष येओल यांना आणीबाणी लागू करण्याचा निर्णय मागे घेतला. हा निर्णय झाल्यावर असा निर्णय राष्ट्राध्यक्षांनी कोणाशीही चर्चा न करता कसा घेतला, यावर चर्चा सुरु झाली. त्यातून दक्षिण कोरियाची फर्स्ट लेडी किम क्योन यांचे नाव पुढे आले. सोबत किम क्योन यांच्यावर चालू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही जंत्री पुढे आली, या सर्वांतून आपल्या बायकोला वाचवण्यासाठीच राष्ट्राध्यक्षांनी थेट देशात मार्शल लॉ आणला अशी चर्चा आता दक्षिण कोरियामध्ये चालू आहे. दक्षिण कोरियाची फर्स्ट लेडी किम क्योन या उद्योजिका आहेत. कोवाना कंटेंटस नावाची त्यांची कंपनी आहे. किमने 2012 मध्ये युन सुक येओल यांच्याबरोबर लग्न केले. युन सुक येओल हे 2022 मध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि किम फर्स्ट लेडी. पण या नावाशिवाय किम यांना दक्षिण कोरियामध्ये ‘किम क्यों-ही रिस्क’ याच नावानं संबोधले जाते. म्हणजेच पतीच्या राजकीय प्रतिष्ठेला हानी पोहचवणारी महिला. (Martial Law)
=====
हे देखील वाचा : बुशरा नावामागचे गुढ !
========
किमच्या बाबत गाजलेला पहिला घोटाळा हा एका लक्झरी हँडबॅगवरून होता. कोरियन-अमेरिकन पाद्री चोई जे-यंग यांना किमकडून 1.8 लाख किमतीची ख्रिश्चन डायर बॅग स्वीकारतानाचा व्हिडिओ जाहीर झाला आणि खळबळ उडाली. दक्षिण कोरियाच्या भ्रष्टाचारविरोधी कायद्यानुसार, सरकारी अधिकारी 63,000 हजारापेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू देऊ शकत नाहीत, वा घेऊही शकत नाहीत. यानंतर किमवर चक्क पीएचडीचा प्रबंध चोरल्याचाही आरोप आहे. अल्मा मॅटर, कूकमिन विद्यापीठातील ही घटना आहे. येथील 16 प्राध्यापकांच्या गटाने किमचा पीएचडी प्रबंध चोरीचा असल्याचा आरोप केला होता. पण याप्रकरणाची चौकशी करण्यात आली नाही. किम यांच्यावर दक्षिण कोरियाची आयात कंपनी ड्यूश मोटर्सशी संबंधित स्टॉक मॅनिप्युलेशनचाही आरोप आहे. याशिवाय अन्य गंभीर ओरोप किम यांच्यावर आहेत, काही आरोपांची चौकशी चालू आहे. हा चौकशीचा ससेमिरा कमी व्हावा म्हणून किम यांनीच आपल्या पतीला देशात मार्शल लॉ जाहीर करण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आता सुरु आहे. (International News)
सई बने