Home » Margashirsha : मार्गशीर्षातील गुरुवारच्या पूजेची मांडणी कशी करावी?

Margashirsha : मार्गशीर्षातील गुरुवारच्या पूजेची मांडणी कशी करावी?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Margashirsha
Share

कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ आणि पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते, ज्यामुळे घरात समृद्धी आणि वैभव येते असे मानले जाते. या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. या महिन्यात स्नान करणे, दान करणे आणि दिवे लावणे यांसारख्या गोष्टींमुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते. लक्ष्मीच्या कृपेसाठी हे व्रत महत्त्वाचे मानले जाते. या महिन्यातील गुरुवारी घरात महालक्ष्मीचे प्रतीक म्हणून घटस्थापना केली जाते आणि घटाला महालक्ष्मीच्या रूपात सजवले जाते. महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार – २७ नोव्हेंबर रोजी, तर दुसरा गुरुवार – ०४ डिसेंबर, तिसरा गुरुवार – ११ डिसेंबर आणि चौथा शेवटचा गुरुवार – १८ डिसेंबर रोजी असणार आहे. (Margashirsha)

मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधी
मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जातात आणि पूजा मांडली जाते. मार्गशीर्ष मधील गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. आपल्या देवघरातील देवांची पूजा करावी. महालक्ष्मीच्या व्रतासाठी चौरंग मांडावा त्याभोवती रांगोळी काढावी. चौरंगावर वस्त्र अंथरावे त्यावर तांदळाने स्वस्तिक काढावे मग देवीची मूर्ती किंवा फोटो चौरंगावर स्थापित करावा. एका कलशात पाणी घ्यावे त्यात एक रुपयाचे नाणे थोड्या अक्षता टाकाव्यात नारळ ठेवावा. (Guruvar)

कलशाला हळदी कुंकू लावून हा कलश चौरंगावर ठेवावा. एका बाजूला विड्याची पाने मांडावीत पाच फळे ठेवावीत. धूप दीप अगरबत्ती लावावी देवीला फुले वाहावीत हार घालावा फुलांची वेणी घालावी. काहीजण नारळाला शृंगार करून सजवता. त्यामुळे तुम्ही आपल्या पद्धतीप्रमाणे पूजा मांडणी करू शकता. पूजेची मांडणी झाल्यांनतर देवीची व्रत कथा वाचावी व मंत्रजप करून शेवटी आरती करावी. आरती झाल्यांनतर खिरीचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. सुवासिनी बोलावून हळदी-कुंकू करावे. () Marathi News

Margashirshaमनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. शक्य असल्यास मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी उपवास करावा आणि संध्याकाळी गोड जेवण करून उपवास सोडावा. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. शक्यतो या महिन्यात शिळे किंवा थंड अन्न खाणे टाळावे आणि ताजे अन्न खावे. (Mahalaxmi Guruvar)

मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा
सौराष्ट्र राज्यात एक राजा राज्य करत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो राजा शूर, दयाळू आणि प्रजाहितदक्ष होता. त्याला चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यांचे ज्ञान होते. या राजाच्या राणीचे नाव होते. सुरतचंद्रिका. राणी दिसायला सुंदर, सुलक्षण आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण आठ अपत्ये होती. सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा-राणीने कन्येचे नाव शामबाला ठेवले होते. (Margashirsha)

========

Margashirsha : जाणून घ्या मार्गशीर्ष गुरुवारांचे महत्त्व

========

एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल; प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले, तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे परिधान केली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत-टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, “कोण गं बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय ? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली, “माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलेय. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले, तर त्या माझ्यावरच रागावतील. (Top Trending Marathi Headline)

तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली. तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्‍नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी-तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. (Todays Marathi HEadline)

Margashirsha

मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणार्‍या श्रीमहालक्ष्मी-व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती, समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती-पत्‍नी लक्ष्मी-लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. (Marathi)

तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत? मी करीन ते नेमाने. म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. ती उठली व काठी टेकीत निघणार, तेवढ्यात राणी महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण गं तू? इथे कशाला आलीस ? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलून दिले. ती म्हातारी प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती, हे राणीला कळले नाही. (Marathi News)

राणीचा तो उर्मटपणा पाहून देवी महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार, तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला कळवळून म्हणाली, आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली. तिने शामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. (Latest Marathi News)

पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नियम पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा-समाधानाने सुरु झाला लागला. इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव, ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली. अन्न-पाण्यासाठी ती तरसली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे; पण तो तरी काय करणार? एकेक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. (Top Marathi Headline)

एक दिवस भद्रश्रवाला वाटले, मुलीकडे जावे, तिला पहावे आणि चार-आठ दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून-चालून तो खूप दमला होता; म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शामबालालाही ते समजले. शामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान-सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली.  (Latest Marathi Headline)

Margashirshaभद्रश्रवा परत जायला निघाला, तेव्हा शामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे, हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय? हंड्यात धन नव्हतेच. होते फक्त कोळसे… महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला. (Top Marathi News)

दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक-एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली. तेव्हा शामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शामबालाने आईकडूनही महालक्ष्मी-व्रत करवून घेतले. चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. (Top Trending Headline)

पुढे काही दिवसांनी आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणुन शामबाला माहेरी आली. पण ‘बाप’ भेटायला गेला असताना त्याला शामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता; पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही,’ हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. (Social Updates)

स्वगृही आल्यावर मालाधराने शामबालेला विचारले, ” माहेराहून काय आणलंस?” शामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले, तर हंड्यात मिठाचे खडे ! मालाधराने चकित होत पत्‍नीला विचारले, “हे काय? या मिठाचा काय उपयोग? शामबाला म्हणाली, “थोडं थांबा, म्हणजे कळेलच.” त्या दिवशी शामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न-पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. “हा मिठाचा उपयोग!’ शामबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले. (Top Stories)

===========

Champashashti : मल्हार मार्तंडाचे नवरात्र आणि चंपाषष्ठीचे महत्त्व

===========

हे महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करेल, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील. महालक्ष्मीची ही कथा, कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ॥ ॐ महालक्ष्मी नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः । (Social News)

(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.