अरविंद विष्णू गोखले यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९१९ रोजी झाला. त्यांचे मूळचे घराणे कोकणातल्या चिपळूणजवळ बल्लाळेश्वर या गावचे. त्यांचे वडील विष्णू नारायण गोखले हे लंडन विद्यापीठाचे पी. एच. डी. होते. तर त्यांची आई रविकिरण मंडळामधील लोकप्रिय कवी श्री. बा. रानडे यांची बहीण होती. अशा सुशिक्षित आईवडिलांच्या पोटी अरविंद गोखले यांचा जन्म त्यांच्या आजोळी इस्लामपूरला झाला.
बालवयातच गोखले यांनी कथालेखनास सुरवात केली होती. शाळेच्या हस्तलिखितामध्ये आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या वार्षिकामध्ये त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. ‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात इ.स. १९३५ मध्ये प्रसिद्ध झाली.
पुढे ते दिल्लीला शिक्षणासाठी गेले असतांनाही त्यांच्या ७ ते ८ कथा प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या आईच्या कुटुंबियांकडून त्यांचा वाङमयीन पिंड जोपासला गेला. पण वडिलांना मात्र त्यांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे असे वाटत असे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे ते बी. एस. सी. झाले. बी. एस. सी. ला त्यांना सुवर्णपदक मिळाले.
त्याचप्रमणे त्यावेळी अरुणा असफअली ह्यांच्या प्रेरणेने त्यांनी एक गुप्त रेडिओ स्टेशन चालवून स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता.
१९४३ मध्ये पुण्याच्या शेतकी महाविद्यालयात ते शिकवू लागले. १९५७-५८ मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून एम.एस. ही पदवी त्यांनी मिळवली. पुढे दिल्लीच्या ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये सायटो जेनेटिक्स आणि प्लांट ब्रिडिंगवर त्यांनी संशोधन केले. १९६३ साली ते मुंबईला आले. त्या आधी १९४५ मध्ये त्यांची सत्यकथेच्या विशेष अंकात ‘कोकराची कथा’ या नावाची कथा प्रकाशित झाली होती त्या कथेने पूर्वापार चालत आलेले कथेचे स्वरूप आणि ढाचा मोडीत काढले.
कथेसंबंधी वेगळ्या प्रकारचे चिंतन आणि नवीन वाटा अरविंद गोखले (Arvind Gokhale) यांनी दाखवून दिल्या, त्यामुळे त्यांना नवकथाकार म्हणून मान्यता मिळाली. पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर आणि गंगाधर गाडगीळ हे खरे नवकथाकार म्हणून ओळखले जात होते परंतु गोखले यांनी त्यांच्यापेक्षा वेगळ्या कथा लिहिल्या. त्यांच्या कथेतील वेगळेपण म्हणजे त्यांनी निर्माण केलेले पात्र किंवा व्यक्ती यांच्या अंतर्मनात काय चालले आहे ह्याचा ते वेध घेत असत.
त्यांच्या कथांमधून स्त्री-पुरुष संबंधांमधील वेगळ्या पैलूंचे दर्शन वाचकांना झाले. त्यांच्या कथांमधून लेखक आणि ते पात्र कधी विभक्त तर कधी एकरूप झालेले दिसून येतात. त्यांनी लिहिलेल्या मिथिला, अधर्म, गिलावा या कथा प्रेमाविषयी अनेक गोष्टी स्पष्ट करतात.
गोखले यांनी जवळजवळ पन्नास वर्षे निष्ठतेने लेखन केले. त्यांनी जे लेखन केले ते संपूर्ण चिंतन, मनन करून लिहिले. त्यांच्या कथांमधली पात्रांच्या मनाचे कंगोरे हे दिसतात, जाणवतात. त्यांच्या प्रतिमा सतत नव्याचा शोध घेतांना आढळतात. कथालेखनामध्ये त्यांनी अनेक प्रयोग केले लघुतम कथा, दीर्घकथा असे कथांच्या आकारावरून प्रकार पाडले गेले. त्याचप्रमाणे साखळी कथा म्हणजेच तीच पात्रे पुन्हा पुन्हा घेऊन लिहिलेल्या सहा कथांचा संग्रह ‘उजेडाचे वेड’ या नावाने प्रसिद्ध झाला. एकाच अनुभवाच्या दोन बाजू दाखवणाऱ्या दोन कथांचा संग्रह ‘जोडाक्षर’, तर एकाच अनुभवाच्या तीन बाजू दाखवणारा ‘त्रिधा’ गोखले यांनी लिहिला.
त्यांनी साडेतीनशेहून अधिक कथा लिहिल्या. त्यांच्या बर्याच कथा, नजराणा (१९४४) ते दागिना (१९७२) पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ‘कातरखेळ’, ‘मंजुळा’, ‘रिक्ता’, ‘कॅक्टस’, ‘विघ्नहर्ती’ ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत.
अरविंद गोखले यांच्या अनेक कथांचे यूरोपीय व भारतीय भाषांतून अनुवाद झालेले आहेत. स्वतंत्र कथालेखनाखेरीज काही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद त्यांनी केले आहेत ; तसेच ना.सी. फडके, वामन चोरघडे, व्यंकटेश माडगूळकर ह्यांच्या निवडक कथांचे संपादन देखील केले आहे. त्यांनी मराठीतील १९५९ ते १९६३ मधील निवडक कथांची वार्षिके प्रसिद्ध केली आहेत. ‘अमेरिकेस पहावे जाऊन’ हे अरविंद गोखले यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक आहे.
‘त्रेपन्न पत्ते’ या त्यांच्या कथासंग्रहात एकाच अनुभवावर लिहिलेल्या ५ ते ७ लघुतम कथा एकत्र आहेत.
अरविंद गोखले यांनी ३५ लघुकथा संग्रह, ५ लघुतम कथासंग्रह, ६ दीर्घकथा संग्रह आणि १० ललित लेखसंग्रह लिहले आहेत. अनवांच्छित, अनामिका, कथाई, कथांतर, केळफूल, चाहूल, जन्मखुणा, दागिना, नजराणा, निर्वाण, शकुंत, शुभा अशी त्यांच्या पुस्तकांची नावे आहेत. १९६० साली गोखले यांना आशियाई, आफ्रिकी, अरबी कथा, एनकाउंटर मासिक, लंडन – येथे प्रथम परितोषिक ‘गंधवार्ता’ या कथेसाठी मिळाले. त्यांना केंद्र सरकारची ‘एमीरेटस फेलोशिप’ १९८४ ते १९८६ पर्यंत मिळाली, त्याचप्रमाणे १९९१ साली महाराष्ट्र साहित्य परिषद तर्फे सुदीर्घ सेवेबद्दल पुरस्कारदेखील मिळाला. अरविंद गोखले यांच्या अनामिका, मिथिला आणि शुभा या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली आहेत.
त्यांच्या लघुकथांचे ‘अरविंद गोखले यांची कथा’ या नावाने संकलन करून ते भालचंद्र फडके यांनी संपादित करून प्रकाशित केले आहे.
अशा नवकथाकार अरविंद गोखले यांचे २४ ऑक्टोबर १९९२ मध्ये एका छोट्या अपघातामुळे निधन झाले.
सतीश चाफेकर