3000 पेक्षा जास्त गाणी, 3500 कविता, 25 कथा, 5 नाटकं, 325 ते 400 चित्रपटांसाठी गीतकार म्हणून का, 11 राज्य पुरस्कार, लावणीकार म्हणून ज्यांची ओळख झाली पण तितक्याच सहजतेनी अंतर्मुख करणारी भक्तीगीतेही त्यांनी लिहिली अशी प्रदिर्घ कारकीर्द असलेले जगदीश खेबुडकर (Jagdish Khebudkar) ज्यांना शब्दप्रभु असही संबोधलं जातं त्यांचा आज जन्मदिन.
1960 साली रंगल्या रात्री अशा या पहिल्या चित्रपटात ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ ही लावणी लिहील्यानंतर नंतर अनेक चित्रपटांसाठी वेगवेगळया लावण्या लिहिल्या पण नंतर मात्र लावणीकार हा शिक्का बसू नये म्हणूनअनेक भक्तीगीते लिहिली. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, देहाची तिजोरी असेल, विठू माऊली तू माऊली जगाची, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना किंवा स्वप्नांत रंगले मी चित्रात दंगले मी यांसारखी भावगीतेही लिहिली आणि ती आजही जवळ जवळ प्रत्येक मैफिलित तितक्याच आवडीनी गायली जातात. त्याचबरोबर पोवाडे, गण गौळण, अंगाईगीत, कीर्तन, भारुड असेही अनेक प्रकार त्यांनी हाताळले.
वयाच्या 16व्या वर्षी आपलं स्वतः च घर जळताना पाहून त्यांनी ‘मानवते तू विधवा झालीस’ ही पहिली कविता लिहिली. आणि तेव्हा पासून खेबुडकरांच्या काव्य प्रवासाला सुरुवात झाली. कोल्हापूर येथील प्रायव्हेट स्कुल जिथे खेबुडकर शिकले, त्याच शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षक म्हणून 35 वर्ष काम केलं. जगदीश खेबुडकर यांना वाचनाची खूप आवड होती. संतांच्या गाथे पासून ते अनेक नवनवीन प्रकाशित पुस्तकांपर्यंत 10000 पुस्तके त्यांच्या संग्रही होती.
जगदीश खेबुडकर यांनी वसंत पवार, सुधीर फडके, राम कदम, अनिल – अरुण अश्या अनेक संगीतकारांबरोबर काम केलं. अनेकदा चाली बरहुकूम शब्द लिहिण्याचे प्रसंगही त्यांच्यावर आले. त्यातलच एक गाणं ‘एकतारी संगे एकरूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो’ या गाण्याची चाल आधी बनवली गेली आणि मग त्यावर खेबुडकरांनी शब्द लिहिले. याचप्रमाणे खेबुडकरांना गाण्याची, अनेक वाद्यांची समज होती.
ग दि माडगूळकर हे जगदीश खेबुडकरांचे आदर्श, ते गदिमांना गुरुतुल्य मानायचे. तसेच भा. रा. तांबे, बा. सी. मर्ढेकर हे देखील खेबुडकरांसाठी आदरणीय होते.
1972 सालचा पिंजरा हा चित्रपट. या चित्रपटातील सगळी गाणी खूप गाजली. या मागची गोष्ट खेबुडकर सांगतात या चित्रपटासाठी त्यांनी 110 गाणी लिहिली होती आणि त्यातली फक्त 10 गाणी निवडली होती. आजही ही गाणी आवडीनी ऐकली जातात, गायली जातात. जगदीश खेबुडकर यांना अनेक चित्रपटांच्या गीत लेखनासाठी 11 राज्य पुरस्कार मिळाले आणि त्यांना मिळालेल्या एकूण पुरस्कारांची यादी केली तर जवळ जवळ 350 पुरस्कार मिळाले आहेत.
जवळ जवळ 50 वर्ष जगदीश खेबुडकरांच्या लेखणीने अनेक उत्तमोत्तम गाणी दिली. गीत लेखनातल्या प्रत्येक प्रकाराला जगदिश खेबुडकर यांनी योग्य न्याय दिला असा म्हंटल तर ते खोट ठरणार नाही.
अश्या या गीतकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज जरी जगदीश खेबुडकर हे शरीराने या जगात नसले तरी त्यांच्या प्रत्यके गाण्यांतून रसिक प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.
– सई मराठे