मधुगंधा कुलकर्णी मराठी मनोरंजनविश्वातील नावाजलेले नाव आहे. आपल्या प्रतिभेच्या जोरावर तिने या क्षेत्रात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले. अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका, निर्माती अशा विविध भूमिका साकारणारी मधुगंधा म्हणजे एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व आहे. छोट्या पंढरपूर शहरातून मुंबईत येत तिने स्वतःची ओळख तयार केली. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिने माध्यमांमध्ये तिने तिच्या लिखाणाची छाप सोडली. लवकरच मधुगंधाची निर्मिती असलेला ‘मु.पो. बोंबिलवाडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सध्या मधुगंधा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने नुकतीच सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट. मधुगंधाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून, यात तिने तिचा २०१४ साली आलेल्या एलिझाबेथ एकादशी आणि आता आगामी ‘मु.पो. बोंबिलवाडी’ या दोन चित्रपटांचे पोस्ट शेअर करत तिचा प्रवास थोडक्यात व्यक्त केला आहे.
मधुगंधाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “माझं बालपण पंढरपुरात गेलं, वडील खूप लहान असताना वारले, त्याच्या मागे मुलांना शिकवून मोठं करण्याची धडपड माझी आई करत होती. तिचा आटापिटा कळत होता म्हणून मी आणि माझ्या भावाने बांगड्या विकण्याचा छोटा व्यवसाय केला… आणि त्या अनुभवाचा पुढे झाला एलिझाबेथ एकादशी !
View this post on Instagram
दहा वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवला…ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल… फक्त पॅशन होती… स्वतःचे पैसे घालून सिनेमा बनवला…परेशचे बाबा पाठीशी उभे राहील… माझं गाव पंढरपूर मदतीला धावून आलं…शैलेश बडवे, श्रीकांत बडवे… खूप मदत झाली… आमची चित्रपटातली मुलांची फौज… सगळे चित्रपटाच्या पाठीशी उभे होते… चित्रपट बनवला पण पुढे काय करायचं माहित नव्हत… त्यावेळी झी स्टुडिओच्या नावाचा खूप दबदबा होता… निखिल साने सिनेमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. उत्तम मार्केट केला…घरोघरी पोचवला.सगळे अवॉर्डज मिळाले. नॅशनल सुवर्ण कमळ… बॉक्स ऑफिसलाही धमाका… एलिझाबेथ माझ्यासाठी पहिला वाहिला निर्मितीचा अनुभव होता… सुखद झाला निखिल साने यांच्या सोबतीने, पाठिंब्याने!
दहा वर्षापूर्वी हे सगळं झालं….!
पुढे खूप टक्केटोणपे, खूप चांगले वाईट अनुभव घेतले. चांगल्या अनुभवांनी प्रोहोत्सान दिलं तर वाईट अनुभवांनी शिक्षण! ५ सिनेमे बनवले, त्यातल्या तीन सिनेमांना नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि सर्व सिनेमांना रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम! त्याबळावरच पुन्हा एकदा मोठी झेप घेतोय आता ‘मुक्काम पोस्ट बोबिलवाडी’. वेगळा विषय आणि सुसाट मनोरंजन हा उद्देश. Loaded with laughter याचा प्रत्यय तो चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाला येईलच!
१ जानेवारी २०२५ पासून आमचा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आपला होणार… हेतू प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन हाच आहे. रसिकहो आमच्या सगळ्या चित्रपटावर तुम्ही भरभरून प्रेम केलंत तसंच या चित्रपटाला ही तुमचं उदंड प्रेम आणि प्रतिसाद मिळो ही नटेश्वर चरणी प्रार्थना!”
दरम्यान मधुगंधाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसोबतचा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा देत तिच्या मेहनतीचे आणि तिच्या प्रतिभेचे कौतुक केले आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या दरम्यान, ‘मु.पो. बोंबिलवाडी’ या चित्रपटात अभिनेते प्रशांत दामले, आनंद इंगळे, मनमीत पेम, प्रणव रावराणे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, रितिका श्रोती, दिप्ती लेले असे अनेक दमदार कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात मोठी उत्सुकता देखील पाहायला मिळत आहे.