अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या प्रतिभेने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. उत्तम अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम कवियत्री, यशस्वी उद्योजिका, उत्तम वक्ता, एक उत्तम निर्माती आणि उत्तम सूत्रसंचालिका आहे. प्राजक्ताने नेहमीचीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आल्यानंतर वाहवाहीच मिळवली. प्राजक्ताच्या लोकप्रियेत भर घालणारी, करियरचा टर्निंग पॉईन्ट किंवा तिच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला तो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो. या शोमुळे प्राजक्ताला एक नवीन ओळख मिळाली आणि तिच्यातील सूत्रसंचलनाचाची एक वेगळी बाजू देखील रसिकांसमोर आली.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्राजक्ता होस्ट करते. या शोने देशात नव्हे तर परदेशातही अमाप लोकप्रियता मिळवली. शो मधील हास्यवीरांमुळे हा शो तुफान गाजत असला तरी प्राजक्ताचे सूत्रसंचालन आणि तिची शैली अंदाज या शो ला एक वेगळाच तडका लावून जातो. प्राजक्ताच्या लोकप्रियतेत भर घालणारा तिला वेगळी ओळख देणारा आणि उत्तम सूत्रसंचालिका म्हणून तिला उभे करण्यामध्ये या शो चा मोठा हात आहे. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या शो ला प्राजक्ताने सुरुवातीला चक्क नकार दिला होता. खुद्द प्राजक्तनेच याबद्दल एका मुलाखतीमध्ये खुलासा केला.
सध्या प्राजक्ता तिच्या ‘फुलवंती’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमामध्ये ती अभिनय करताना निर्माती म्हणून देखील पदार्पण करत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान प्राजक्ताने तिच्या या नाकाराबद्दल सांगितले. ‘मिरची मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने आधी हास्यजत्रेसाठी नकार दिला होता मात्र नंतर तिचा हा नकार होकारामध्ये कसा बदलला त्यामागची गोष्ट सांगितली.
प्राजक्ता म्हणाली, “मी झी मराठी’वर मी ‘गूड मॉर्निंग महाराष्ट्र’ हा शो होस्ट केला होता. त्यानंतर मी पुढे काहीच होस्ट केले नाही. त्यामुळे, हास्यजत्रेच्या टीमला वाटले की आपण प्राजक्ताला सूत्रसंचालनासाठी विचारू. त्यांनी मला संपर्क केला आणि मी लगेच त्यांना सांगितले की… नाही! मला जमणार नाही. एकतर रिअॅलिटी शो, आणि त्यातही कॉमेडी कार्यक्रम… माझा खरंच काहीच संबंध नाही. मी उगाच त्यांचे पंच पाडेन… मला खरंच याचा काहीच गंध नाही, सेन्स ऑफ ह्युमर नाही. त्यामुळे मला जमणार नाही. असे मी त्यांना सांगितले.”
“पुढे, दोन दिवसांनी त्यांनी पुन्हा मला फोन केला आणि सांगितले की, तुझे पेमेंट आम्ही वाढवतोय…पण प्लीज या पेमेंटला तरी कर. कारण आम्हाला तू हवीच आहेस. तेव्हा माझ्या जवळ माझा एक मित्र बसला होता. तो मला म्हणाला, ‘अगं तू का करत नाही? एवढे चांगले पैसे देता आहेत तुला’ मी त्याला तेव्हा सांगितले की, ‘अरे मला नाही करायचे… मला नाही जमणार ते. तो लगेच म्हणाला, ‘हे तू केल्याशिवाय कसे म्हणतेस? एक शेड्यूल करून बघ. नाही जमले तर नको करू.”
पुढे प्राजक्ता म्हणाली, “तेव्हा मला माझ्या मित्राने सांगितलेला मुद्दा पटला. खरे ना केल्याशिवाय मला समजणार नाही…ही गोष्ट मला सुद्धा माहिती होती. आधी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तर शोमध्ये माझे पाय थरथरायचे. कारण, समोर प्रसाद ओक बसलेले असायचे. ते चुका काढतील अशी भिती वाटायची. सुरुवातीचे दिवस कठीण गेले पण, नंतर मी रुळले. आता मला प्रतिक्रिया येतात…तुला हसताना पाहून आम्हाला खूप छान वाटते.”
=======
हे देखील वाचा : हे’ स्टार्स आहेत प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडचे मालक
=======
आता प्राजक्ताशिवाय हास्यजत्रा या शो ची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. हास्यजत्रा म्हटले की, प्राजक्ताचा प्रसन्न हसरा चेहरा डोळ्यासमोर लगेच येऊन जातो. प्राजक्ताच्या कामाबद्दल सांगायचे तर तिने काही मालिकांमध्ये काम केले असून, तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेने तिला अमाप लोकप्रियता दिली आणि घराघरात ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले. शिवाय ती वेबसिरीजमध्ये देखील झळकली आहे.