श्रीकांत नारायण
“भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे ब्रिटिशांकडे ‘भीक मागून’ मिळालेले आहे. भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ साली म्हणजे नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळाल्यापासूनच मिळाले” असे वादग्रस्त विधान अलीकडेच अभिनेत्री कंगना राणावत हिने केले. ‘पद्म’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर कंगना हिने हे वादग्रस्त विधान केल्यामुळे साहजिकच तिच्यावर टीकेचा भडीमार झाला. या टीकेमुळे उडालेला धुरळा खाली बसायच्या आतच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही कंगना राणावत हिच्या सुरात आपला सूर मिसळल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचा, कंगनाला (Kangana Ranaut) पाठिंबा देण्याचा नेमका हेतू कोणता असावा याचे कोडे अनेकांना उलगडले नसावे त्यामुळे आता त्यांच्यावरही टीका सुरू झाली आहे. अर्थात त्याचे त्यांना सोयरसुतक नसावे असे त्यांनी विधानाचे समर्थन करतांना केलेल्या वक्तव्यावरून वाटते. नाही तरी विक्रम गोखले नेहमीच वेगळी वाट चोखाळणारे ‘अभिनेते’ आहेत हे आतापर्यंत अनेकांना ठाऊक आहे.
ते केवळ नाटकांत व चित्रपटांत अभिनय करीत नाहीत तर सार्वजनिक जीवनात वावरतांना त्यांचा ‘अभिनय’ पाहण्याजोगा असतो यावरही अनेकांचे ‘एकमत’ आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे वेगळी वाट चोखाळताना केलेला ‘अभिनय’ असेच एका वाक्यात, त्यांनी कंगनाला दिलेल्या पाठिंब्याचे वर्णन करावे लागेल.
पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्या मेळाव्यात विक्रम गोखले यांचा त्यांच्या वयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन केले. वास्तविक आपल्याकडे ‘साठी बुद्धी नाठी’ अशी एक म्हण आहे. वयाची साठी आली की माणसाचे आपल्या विवेकबुद्धीवर नियंत्रण राहत नाही त्यामुळे तो काहीतरी विक्षिप्तपणे वागायला वा बोलायला लागतो असे म्हणतात. विक्रम गोखले यांनी वयाची साठी ओलांडून पंधरा वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे आता ते वृद्धत्वाकडे झुकले आहेत. आपल्याकडे वृद्धत्वाकडे झुकलेला माणूस जेंव्हा आपली विवेकशक्ती गमावून बसतो आणि काहीही बरळायला लागतो त्यावेळी आपण त्याला ‘म्हातारचळ’ लागलंय असेही म्हणतो.
विक्रम गोखले यांनीही कोणताही सारासार विचार न करता कंगनाला पाठिंबा दिला असावा असे त्यांच्या वक्तव्यावरून वाटते. मात्र त्यांनी असे का केले असावे? याचे उत्तर त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीत मिळते. त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.
मात्र हिंदुत्ववादी विचारसरणी बाळगताना देखील आपले मत व्यक्त करताना त्यांनी आपल्या सारासार विवेकबुद्धीचा वापर करणे आवश्यक होते कारण विक्रम गोखले हे काही सोयीनुसार मते बदलणारे ‘धंदेवाईक’ राजकारणी नाहीत. ते एक कलावंत आहेत आणि एक कलावंत म्हणून जनमानसामध्ये त्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे. त्यामुळे आपले मत सार्वजनिक करतांना त्यांनी दोन्ही बाजूंचा विचार करण्याची गरज होती. कंगनाप्रमाणे ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे करण्याची आवश्यकता नव्हती.
श्री विक्रम गोखले यांनी वयाची पंचाहत्तरी गाठली आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य त्यावर्षी मिळाले त्यावेळी ते पाळण्यात असतील त्यामुळे साहजिकच त्यांना स्वातंत्र्यचळवळ माहीतही नसेल. (मात्र एक कलाकार म्हणून स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास माहित असायला हरकत नसावी) त्यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते (कै.) चंद्रकांत गोखले यांनी तरी स्वातंत्र्याची चळवळ नक्कीच पाहिली असेल. स्वतः चंद्रकांत गोखले यांना देशाविषयी खूपच अभिमान होता.
दरवर्षी दिवाळीत ते आपल्या सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांच्या परिवारासाठी आवर्जून मदत पाठवीत असत. हेच जवान १९४७ साली स्वातंत्र्य मिळालेल्या भारताचे संरक्षण करीत होते. आणि विक्रम गोखले यांना त्याचा सार्थ अभिमान होता. असे असताना स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अजिबात माहित नसलेल्या आणि उठसुठ वादग्रस्त विधान करून प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या कंगनासारख्या ‘छचोर’ अभिनेत्रींच्या सुरात सूर मिळविणे हे कितपत योग्य आहे ?
भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. लोकमान्य टिळक यांनी तर ‘स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी घोषणा करून स्वातंत्र्यचळवळीचे रणशिंग फुंकले. (विक्रम गोखले यांना हे मान्य नाही का ?) लोकमान्य टिळकांनंतर स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. त्यांचा अहिंसा चळवळीवर अधिक विश्वास होता. त्यामुळे सामान्य जनतेचा त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळाला.
दुसरीकडे क्रांतिकारकानींही आपला वेगळा मार्ग निवडला होता. दोघांचे मार्ग भिन्न असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकवेळ समन्वय नसेल मात्र परस्परांना विरोध असेल असे वाटत नाही. यासंदर्भात अलीकडेच अभिनेते शरद पोंक्षे यांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तुरुंगातून सोडविण्यासाठी खुद्द महात्मा गांधी यांनी प्रयत्न केले असे विधान केले आहे. (त्याचे पुरावेही आहेत असे ते म्हणतात) विक्रम गोखले यांना पोंक्षे यांचे हे विधान मान्य नसावे असे दिसते कारण ते म्हणतात क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी तत्कालीन नेत्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत.
याशिवाय विक्रम गोखले यांना नजीकच्या काळात भारत ‘हिरवा’ होण्याची भीती वाटते (म्हणजे त्यांचा सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारवरही विश्वास नाही). विक्रमजी, तुम्हाला एवढेच सांगावेसे वाटते की, तुम्ही भारताच्या इतिहासाचे थोडे तरी सिंहावलोकन करा, ज्या मोगलांनी भारतावर साडेतीनशे-चारशे वर्षे राज्य केले त्यावेळीही भारत ‘हिरवा’ झाला नव्हता. महाराष्ट्रासारख्या मोठ्या प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगली सत्तेविरुद्ध एकाकी लढत देत ‘भगवा’ फडकावीत ठेवला होता.
या इतिहासाचे बहुधा विक्रमजींना (वाढत्या वयोमानानुसार) विस्मरण झालेले असावे त्यामुळेच त्यांनी इतिहास विसरून कंगनासारख्या निर्बुद्ध अभिनेत्रींच्या मताशी आपण सहमत असल्याची कबुली दिली असावी. आणि जी माणसे ‘इतिहास’ विसरतात त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी वृथा काळजी करू नये एवढाच (अनाहूत) सल्ला विक्रमजींना यानिमित्ताने द्यावासा वाटतो.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.