Home » “आमचा अतुल गेला….” राज ठाकरेंची भावुक पोस्ट

“आमचा अतुल गेला….” राज ठाकरेंची भावुक पोस्ट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Atul Purchure
Share

मराठी मनोरंजनविश्वातील प्रतिभावान आणि हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. अतुल यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अतुल यांना लिव्हरचा कॅन्सर झाला होता. मात्र मागच्या यावर्षी त्यांनी या आजारावर मात केली आणि ते बरे झाले होते. पण मागील पाच दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने पुन्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अतुल यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीतून आणि राजकीय विश्वातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

अतुल यांची अकाली एक्सिट सामान्य लोकांसोबतच कलाकार आणि नेते मंडळींना देखील चटका लावून गेली. आपल्या जिवंत अभिनयाने प्रत्येक पात्र सजीव करणारे अतुल परचुरे आज आपल्यात नाही ही बाब कोणालाच पचत नाही. अनेक लोकं सोशल मीडियावर व्यक्त होत त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत अतुल यांच्या आठवणीं सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “आज आमचा अतुल गेला…. एक उमदा नट आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं अतुलचं होतं. आम्ही सगळे बालमोहन शाळेचे विद्यार्थी. आम्ही शाळेत असतानाचा काळ असा होता की सिनेमाच्या जगातले राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे आमचे शाळेबाहेरचे हिरो पण अर्थात आमच्यापासून मैलांवरचे असलेले हिरो किंवा आम्ही त्यांचे चाहते म्हणू. पण शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे. तो त्या काळात बजरबट्टू नावाच्या नाटकात काम करायचा . शाळेत असताना पण तो उस्फुर्त आणि उमदा नट. अतुल हा जन्मजात अभिनेता असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

शाळेत असताना त्याचा आणि माझा फारसा मैत्र नव्हता, पण आमच्या साठी तो तेव्हाच एक सेलिब्रिटी होता ! कॉलेजला गेल्यावर जरी आमची कॉलेजेस वेगळी होती तरी आमची मैत्री झाली आणि ती घट्ट पण होत गेली. अतुल हा खरा रंगकर्मी. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली अशा नाटकांमध्ये अतुलने जे काम केलं अफाट होतं. बरं अतुल इतका नशीबवान अभिनेता की, त्याचं व्यक्ती आणि वल्ली मधलं काम पु.ल. देशपांड्यांनी फक्त पाहिलं नाही तर त्याला दाद देखील दिली.

मी जेंव्हा पक्ष स्थापन केला, तेंव्हा अतुलने पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म देखील भरला होता. तेंव्हाच्या राजकीय परिस्थितीत एखाद्या कलाकाराने असं पाऊल उचलणं हे धाडस होतं, पण ते त्याने दाखवलं. तो पुढे माझ्या कुटुंबाचा भाग बनला होता. कायम आनंदी, जरा जास्तच गुटगुटीत असा हा आमचा मित्र, ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो, असा अतुल जेंव्हा कर्करोगाशी झुंज देऊन बाहेर आला, आणि जेंव्हा तो खंगला होता, तेंव्हा तो आमच्या मित्रांपैकी कोणालाच बघवत नव्हता. पण अशा अवस्थेत सुद्धा तो आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होता.

मी म्हणलं तसं अतुल हा प्रतिभावान कलावंत होता आणि वृत्तीने आनंदी होता. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपट केले, टीव्ही मालिका केल्या, हिंदीत पण त्याने अनेक टीव्ही शो केले पण अतुल हा खरा रंगकर्मी. त्याचा रंगमंचावरचा वावर, त्याच्या विनोदाच्या टाईमिंगचा असलेला सेन्स सगळंच अप्रतिम होतं. अभिनयावर कमालीचं प्रेम असलेल्या अतुलने अकाली ‘एक्झिट’ घेतली, पण जाताना रंगभूमीपासून, सर्व मित्रांच्या आयुष्यातलं काही तरी निखळलं ही भावना ठेवून गेला.

आमच्या या मित्राला माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.”

=======

हे देखील वाचा : अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांची कारकीर्द

=======

दरम्यान अतुल परचुरे यांना कॅन्सर झाला होता. मात्र डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे तो बळावला. तरीही त्यातून ते बरे झाले होते. मात्र आता पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर अतुल यांनी रंगभूमी, टीव्ही, चित्रपट सर्वच माध्यम गाजवली. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बरेच काम केले होते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.